वृत्तकथा - भाग-1
आनंदी शेतकऱ्याचा चेहरा-
पंजाबचे अभिनेते हरप्रीत सिंह यांचा शेतकरी वेशभुषेतील फोटो भाजपने सोशल मीडियावर परस्पर वापरला आहे. विशेष म्हणजे हे हरप्रीत सिंह शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले असतानाच भाजपच्या आयटी सेलचा खोडसाळपणा समोर आला आहे. यावरून प्रेरणा घेत आहे वृत्त कथा लिहिली आहे.
हरप्रीत सिंह हे अभिनेते असल्याने त्यांना फोटो काढायला आवडते. आजकाल, प्रत्येकाला सोशल मीडियामुळे फोटो काढण्याची हौस झालेली आहे. त्यात हरप्रीत हे अभिनेता असल्याने त्यांचे फोटो सेशन एक पाऊल पुढे असते. शेतामध्ये काम करणारा शेतकरी म्हणजे आपल्याला आभाळाकडे टक लावणारा नाही तर फाशीवर लटकलेला शेतकरी पाहण्याची सवय माध्यमांनी लावलेली आहे. थोड्याफार फरकाने शेतकरी सतत नापिकी आणि कर्ज, अस्मानी व सुलतानी संकटातून सामोरे जात होते. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू असलेले फोटो तसे दुर्मीळच..
मग, त्यांनी ठरवले असेच फोटो काढायचे. ठरल, शेतात फोटो सेशन करण्याचे! हातामध्ये खोऱ्या, डोलणारी पिके आणि सोसाट्याचा वारा असे त्यादिवशी दिलखुश करणारे वातावरण होते. हातात खोऱ्या आणि अभिनयाची झलक दाखवित असताना त्यांनी स्माईल केल्यावर मित्राने त्यांचा छानसा फोटो काढला. फोटो पाहून पंजाब दी पुतर... खूश झाले. पंजाबचा शेतकरी खूश नाही, पण खूश असल्याचा फोटोही त्यांना समाधानकारक वाटला. कारण, त्यात कुठेतरी सकारात्मकतेचा कवडसा दिसत होता. उद्याच्या सुखी जीवनाचे स्वप्न दिसत होते. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी पसंती दर्शविली.
मध्यंतरी जवळपास सहा-सात वर्षे उलटली... रक्ताचे पाणी करूनही कष्टाला दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले. थंडीने गारठून तर कुणी ह्रदयविकाराच्या झटक्याने ऐन आंदोलनात प्राण सोडले. कन्याकुमारी ते जम्मूपर्यंत शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनाच्या वेदना ओळखल्या. साहजिकच पंजाबमधील खेळाडू असो की सेलिब्रिटी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला..
इकडे हरप्रीत सिंहदेखील आंदोलनात उतरले होते. शेतकरी बांधवाच्या भावना ओळखून आंदोलनात उतरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. पण, अचानक त्यांना ट्विटरवर दिसला आनंदी शेतकऱ्याचा चेहरा.. तो चेहरा त्यांचाच होता.. हे कसे शक्य आहे? याचा अर्थ आपल्यातील कलेचा वापर हा राजकारणासाठी केला जातो. तसेच आपल्या फोटोसाठी परवानगी घेण्यात न आल्याने त्यांचा संताप झाला.
त्यांनी स्वत:शीच प्रश्न विचारला, खरेच आनंदी शेतकऱ्याचा फोटो एवढा दुर्मीळ झाला आहे का? सोशल मीडियाचा वापर करून किती लोकांना भरकटविले जात आहे. यामध्ये कलाकार म्हणून त्यांना होणारी घुसमट थांबत नव्हती...आंदोलनाच्या घोषणा सुरू झाल्यानंतर त्यांची घुसमट अधिकच उफाळून आली. कलाकारातील सच्चेपणा जिवंत असल्याचे हे उदाहरण होते.