दिदेशात धर्म हे राजकारणाचं महत्त्वाचे चलन बनत आहे. मग भाजपचे हिंदूत्व असो की एमआयएमचे मुस्लिम धर्म खतरेमेची आरोळी! जनसंघाने आताच्या भाजपने रथयात्रा काढून राम हे राजकारणातील खणखणीत नाण बनवले. दोन वेळा पोट भरले नाही तरी चालेल राममंदिराचे स्वप्न पाहा हा विचार तरुणांना पहायला प्रवृत्त केले.
सध्याअयोध्येतील रामाचे मंदिर हे भाजपचे मोठे भांडवल आहे. या राजकारणाने एवढी हीनपातळी घातली आहे की आता रामाचा सेवक म्हणणारा हनुमानही भाजपने सोडला नाही. हनुमान दलित, आदिवासी व मुस्लिम असल्याची सुमार दर्जाची विधाने भाजप नेत्यांनी केली आहेत. देवावरच जातीचा अन् धर्माचा शिक्का मारला की भाजपचे राजकारण सोपे होते. एकतर भाजप म्हणतोय त्या पद्धतीने देवाला माना अथवा तुम्ही धर्मद्रोही असा प्रचार सुरू होतो.
रामानंतर भाजपने हनुमान का निवडला?
रामाच्या नावाने राजकारण केल्यानंतर यश मिळू शकते, हे सत्ताधारी भाजपने यापूर्वीच दाखवून दिले आहे. पण ही व्होटबँक केवळ शहरापुरतीच आहे. अयोध्येत राममंदिर होण्याची शक्यता धूसर होत आहे. हा मुद्दा निसटत जाताना नव्या नाण्याची गरज भाजपला वाटत आहे. त्यामुळेच चाणक्यनीतीतून हनुमानाचे नवे चलन भाजपने काढले आहे. ग्रामीण भागात हनुमानाला चिरंजीव मानत असल्याने भाविकांची संख्या अधिक आहे. तसेच शक्तिचा देव असल्याने बहुजनामध्ये अधिक मान्यता आहे.महाराष्ट्रात बल आणि विद्येच्या उपासनेची शिकवण देत रामदास स्वामींनी हनुमानाची मंदिरे गावोगाव मंदिरे बांधली आहेत. भविष्यकाळात हीच मंदिरे राजकारणाचे अड्डे झाले तर आश्चर्य वाटायला नको.