भारत महाशक्ती होण्यासाठी आरोग्य, शिक्षण,संरक्षण, शेती, उद्योग,लघुउद्योग, संशोधन, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात एक व्हिजन दूरगामी धोरण ठेवून प्रयत्न आखणे गरजेचे आहे.
या क्षेत्रामध्ये सर्वो्च्च असे मनुष्यबळ विकसीत करणे व त्यांचा वापर करून देशाच्या विकासाचा रथ जोरात चालविणे शक्य होणार आहे. सर्वात आश्चर्याची आणि हास्यास्पद
एक गोष्ट आपल्या देशात पहायला मिळते. भारत महाशक्ती कसा होणार नाही हे सांगण्यासाठी अनेक विविध क्षेत्रातील विद्वान त्यांची बुध्दीमत्तापणाला लावतात. पण जे तज्ञ भारत महाशक्ती होण्यासाठी नेमके काय करता येईल हे सांगू शकत नाहीत. त्यांचे ज्ञान काय कामाचे ? त्यामुळे ज्ञानाचे उपयोजन ( अप्लाईड नॉलेज) करता येणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही खूप हुशार असतात. पण त्यांना पैलू पाडण्याचेच काम होत नाही. आपल्याकडे केवळ घोकमपट्टीचे शिक्षण शिकविले जाते. सध्याचा जमाना हा नावीन्यपुर्ण आणि संशोधनवृत्ती असलेल्या तरूणाईचा आहे. रोज बदलणारे तंत्रज्ञान, नवीन लागणारे शोध यांचा मारा एवढा आहे की त्यासाठी आपण अपडेट तर राहिलेच पाहिजे. शिवाय हे सर्व आपण का करू शकत नाही याचा विचार करायला हवा. किती दिवस मॅकोलेचे कारकुनी शिक्षण, पोटभरणारे रोबोटिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या माथी मारणार आहोत. रामानुजनच्या वाटेवर जाणारे गणीतज्ञ विद्यार्थी का तयार होत नाहीत ?
विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक वृत्ती वाढवायची सोडून शिक्षक, पालकवर्गही पास व्हायचे असेल तर जास्त विचारू नकोस. परिक्षेत मार्क घ्यायचे आहेत ना ? मग जास्त विचारू नकोस असा सल्ला देतात. विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, चाकोरीबाह्य विचारसरणीचे शिक्षण दिले जात नाही. याला काय कारण आहे ? एखादा नवा जिल्हा झाला हे माहित असूनही परिक्षेत मात्र पुस्तकातील जिल्ह्यांची संख्या विद्यार्थ्यांना लिहणे अनिवार्य असते. ही आपली शिक्षणपध्दती !टीका करण्यापलीकडे जावून सांगायचे झाले तर विद्यार्थ्यांचे ज्ञान , आवड लक्षात घेवून तसे त्याचे व्यक्तीमत्व खुलवायला हवे. बोन्साय झाड नको तर वटवृक्ष व्हावा. कारण खुंटलेला विद्यार्थी आयुष्यभर नकारात्मकतेचे ओझे वाहत राहतो. समाजच त्याच्यासाठी गुन्हेगार बनतो.
आपल्याला चीन, हिंदुस्थान व अमेरिका या तीन देशाचे मॉडेल वापरावे लागणार आहे. अमेरिकेचे सूत्र आहे. सर्वोत्तम ज्ञान , संशोधन याला चालना देणे. त्यामुळेच भारतातील अत्यंत हूशार संशोधक, विद्यार्थी तसेच यांचे ज्ञान भारताला कसे उपयोगी पडू शकेल यासाठी थिक टॅंकची उभारणी करावी लागणार आहे.
चीन हे नेहमी प्रतिस्पर्धी देशाच्या तुलनेत नेहमी तीन ते चार पटीत पुढे जा व विकास किती झाला आहे याचे प्रदर्शन करण्याऐवजी नेहमीच त्याला बेसावध ठेवा.
आंतराराष्ट्रीय व्यापार अत्यंत आक्रमतेने करून देशाची आर्थिकव्यवस्था डळमळीत करणे व संबधीत देशाला विस्तारवादी धोरण व व्यापार अशा दुहेरीचक्रात गुंतवून ठेवणे हा आहे.
जग खरेच युध्दाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते. भारतीय जगात जेथे जातात. तिथील देशाशी कधीच बेईमानी करत नाहीत. दुस-यांचा आदर व सन्मान करतात. हिंदुस्थानी सर्व साहित्य, संगीत, नृत्य, तसेच विविध खाद्यसंस्कृती , सण म्हणजे मानवी जीवनातील अत्यंत उच्चकोटीचा आविष्कार आहे. भले आपल्याला त्याची किंमत नसेल, पण जगात सर्वत्र त्याचे चाहते आहेत.
जागतीकीकरणाच्या रेट्यात अस्सल अशा गोष्टीचे महत्व वाढत आहे.
योग, विपशना अशा सर्व गोष्टींचे आपण ब्रॅडींग केलेच पाहिजे. अन्यथा इतर देश कालांतराने त्याचे श्रेय घेतील. उदाहरणार्थ योग हा आता कितीतरी परदेशी नागरीकांचाही व्यवसाय झाला आहे.
त्यातील अनेक गोष्टीचा वापर करून सकारात्मक जगण्याचे कोर्सेस त्यांनी सुरू केले आहेत. मुळात संस्कृती हा पिढ्यान पिढ्या जतन करायचा ठेवा असतो. ही संस्कृती आपण जपली नाही तर येणा-या पिढ्याकडे केवळ पाश्चिमात्य संस्कृतीच असेल. त्यामुळे आपले अस्तित्व टिकण्यासाठी हिंदुस्थानी ठेवा जपायला हवा. चीनने त्यामुळेच ख्रिसमस हा सण साजरा करायला बंदी घातली आहे. भारत हा त्यामुळे उदार आणि महान देश आहे. पण चीनी आकाशकंदिल विकत घेवून दिवाळी साजरा करणे हा आपल्या समाजाचा पराभव आहे.
भारतात सगळ्यात जास्त खुर्ची व पदाला किंमत दिली जाते. याउलट जपानसारख्या देशात त्याच्या कामाला किंमत दिली जाते. साफसफाई करणारा कामगार हा महिना तीस हजार रूपये कमवित असला तरी आपण त्याकडे कमीपणाने का पाहतो ? श्रमप्रतिष्ठा जपली नसल्यामुळे समाजातील निम्नस्तर कायम खचलेला असतो. तर उच्चस्तर समाजातील नम्रता व विसंवाद हरवल्यामुळे समाजाच्या विकासाची गती ही नेहमीच एकांगी बनते.त्यामुळेच जमीनीच्या थरामध्ये जशा पोकळ्या निर्माण व्हाव्या तसा समाजातील थर ढासळलेले आहेत.
लवकरच पुढील भाग प्रकाशित करू.................................