घूमानच्या निमित्ताने
मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट...
२) श्रीमंताच्या घरचे लग्न असले की कितीही चांगला मेनू दिला किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले तरी कमीच असल्याची कुरबुर असते. तिथेही आपुलकी व स्नेह असला तरी बहुतेकांचे लक्ष श्रीमंती थाटाकडे असते.
साहित्य संमेलन म्हणजे लग्नसोहळ्यासारखे प्रतिभाशक्ती व वाचकांच्या आवडीचे असेच मनोमिलन होत असते. मराठी साहित्यप्रेमी वाचकांना खरेतर काय हवे आहे ? चांगली पुस्तके पहायला मिळावीत... साहित्यप्रवाहात भर घालणारे नवीन तसेच जुन्या नामवंत प्रकाशन स्टॉलला भेट द्यावी...
साहित्यावर काहीतरी चांगले कानावर पडावे...! हे कधीच कुणी विचारत नाही. जो तो उठसूठ साहित्य संमेलनावर आणि अनेक हुशारमंडळी टीका करतात. सगळेच व-हाडी होत असल्याने मात्र प्रतिभाशक्ती व वाचकांच्या आवडीला कोणीच वाली राहत नाही....!
साहित्यसंमेलनात प्रवासव्यवस्था झाली नाही किंवा वेळेवर बुकिंग झाले नाही असे मुलभुत समस्या चांगल्या व्यवस्थापनाने सोडवणे आवश्यक आहे. याची चर्चा चव्हाट्यावर करून साहित्य संमेलनाचे अवमूल्यन रोखले पाहिजे. अन्यथा साहित्य रसिकांनाही गांभीर्यही राहत नाही व सगळी यंत्रणाच हास्यास्पद ठरण्याची भीती असते. प्रत्येक साहित्य संमेलनाला हे घडत आहे.घूमान साहित्यसंमेलन पंजाब मध्ये संत नामदेवांच्या कर्मभुमी घुमानमध्ये आयोजित केल्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. भाषा ही माणसाला मिळालेले सर्वात श्रेष्ठ वरदान आहे. यामध्ये मिळालेले ज्ञान व अभिव्यक्ती, प्रतिभेतून खुललेला साहित्याचा खजिना हा अनमोलच असतो. मात्र आपण माणस ही भाषा संकुचित करून टाकतो. मराठीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी पुस्तके कसलेल्या राजदुताची भुमिका बजावत आहेत. त्यामुळे चांगल्या लेखकांना व प्रकाशनांना प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण व्हावे.यासाठी साहित्य संमेलन आवश्यकच आहेत. साहित्य संमेलनातून मात्र वाचकांच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. शेतात भाजीपाल्यांचे मळे पिकवत साहित्य लेखन-वाचन करणारा वर्ग आहे. तसाच आयटीतील वाचकवर्ग आहे. पण याची दखल कोण घेणार ? बुध्दीवादी म्हणवणारे अनेक लोक उगीच आपली मक्तेदारी दाखवितात. त्यांनीही आपण केवळ साहित्याची पालखी वाहणारे भोई ( विनम्र सेवेकरी) आहोत अशी भावना व्यक्त करायला हवी.
अनेक वाचनालय अजूनही साठ-सत्तरच्या दशकात आहेत. हायटेकच्या जमान्यात ती बदलणे आवश्यक आहे . मराठी पुस्तकांची अनेक वाचनालये बहुतेक कागदोपत्रीच असून अनुदान लाटत आहेत.
वि.स.खांडेकर यांची ययाती चीनी भाषेतही भाषांतरीत केली तर त्यालाही चीनी जाणकार साहित्यिकातून स्वागतच केले जाईल. किमान भारतीय मातीत असणा-या भाषांना एकत्रित करणारे असे सशक्त व्यासपीठ का नाही ? ही खंत एक भारतीय म्हणुन वाटते . मराठी वाचवा ही मोहिम आवश्यक आहे. पण त्यातून केवळ वैफल्य दाखविण्यापेक्षा मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी पाऊले टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी साहित्य म्हणजे ललित, कथापुरते मर्यादीत राहू नये.अनेक विषयावरचे ज्ञान उपलब्ध करून देणारे भांडार झाले तर मराठीचा कायापालट होईल.घूमानच्या निमित्ताने मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट अधिक पसरत जावा हीच सदिच्छा !
No comments:
Post a Comment