‘कागदी काटे’चे येत्या शनिवारी प्रकाशन
बातमीदारातील धावपळ...या धबडग्यात बाजूला पडणारे पत्रकारांचे प्रश्न...त्याचबरोबर पत्रकारितेतील मूल्यांची होत असलेली घसरण...अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ले...बाजारू वृत्तीचा शिरकाव अन् पत्रकारितेतील विविध पैलू आता
कवितांमधून उलगडणार आहेत.
‘सहित प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात येणाऱया कवी आणि पत्रकार प्रशांत चव्हाण यांच्या ‘कागदी काटे’ या काव्यसंग्रहातून वृत्तपत्रसृष्टीतील ही आतील बाजू रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. चव्हाण यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह
असून, तो संपूर्णपणे पत्रकारिता विषयाशी संबंधित आहे. याकाव्यसंग्रहामध्ये 50 कवितांचा समावेश आहे. पत्रकारांचे वेतन, भाषाज्ञान, या क्षेत्रात शिरलेल्या अनिष्ट प्रवृत्ती याचे दर्शन चव्हाण यांच्या या कवितांमधून घडणार आहे. यातून
वृत्तपत्राचे जगच वाचकांसमोर येईल.
या विद्वानांना कधी कळलंच नाही..;
चांगला पत्रकार होण्यासाठी..
आधी चांगला ‘माणूस’ व्हावं लागतं....!
अशा शब्दांत ‘माणूसपण’ अधोरेखित करणारी ही कविता उपहास, विडंबन, अशा अंगाने फुलत जाऊन प्रसंगी काटेरी व बोचरीही झाली आहे. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी साकारले असून, मलपृष्ठ लेखन अजय कांडर यांनी केले आहे. कवितासंग्रहाचे प्रकाशन येत्या 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुण्यातील बॅ. नाथ पै. सभागृहात (एस. एम. जोशी फौंडेशन आवार, चवथा मजला, नवी पेठ, 30) ‘तरूण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर व 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे आणि कवी अजय कांडर हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘सहित प्रकाशन’चे संपादक किशोर शिंदे यांनी दिली.