मित्रांनो, मी इयत्ता चौथीपासून ईश्वर आणि मानवाने कोणत्या धर्माचे आचरण करावे या विषयी वाचन करत आहे. या विषयी वाचनासाठी एवढा झपाटून गेलो होतो की पार वैदिक सिध्दांत, उपनिषद वार्ता,गीता,तसेच सर्वच कथासार आणि योगवसिष्ठ, पंतजली योगसुत्र असे ग्रंथ नववीपर्यंत वाचून काढले. कुंडलिनी शक्ती साठी तर मी जंगजंग पछाडले.
अर्थात बुवा, महाराज नव्हे तर स्वतः अनुभवातून ज्ञान घ्या या विचाराप्रमाणेच अनुभव घेतला.मला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण अनेक प्रश्न निर्माण होवून गुंतागुंत निर्माण झाली.मनाला पडलेले प्रश्न हे शिक्षण सोडवू शकत नाही याचा रागच निर्माण झाला. सुरूवातीला हुशार असणारा मी हळूहळू अभ्यासात मागे पडू लागलो.
हिंदू शीख,मुस्लीम,ख्रिश्चन यांच्या धर्मग्रंथाचे मराठीतील भाषांतरे वाचूनही समाधान नव्हते. मुळात मी आस्तिक आहे, पण आंधळेपणाने भक्ती मला मान्य नाही. त्यामुळे प्रत्येक विचाराशी मी पुर्णपणे सहमत नव्हतो. कुणीतरी येवून परिपुर्ण विचार सांगावा ही इच्छा होती.....
महात्मा बसवेश्वरांच्या जंयतीनिमीत्त मी पुस्तके वाचायला घेतली आणि सुखद धक्का बसला. त्यांचे विचार व परिपुर्ण आहेत याची खात्री पटली.
महात्मा बसवेश्वरांनी भक्तीच्या कोंदणात कर्माचा हिरा बसवून त्यांनी सर्वसामान्य माणसाला आयुष्य उलगडून दाखविले आहे.देव हा सगुण की निर्गुण व जडत्व, चैतन्य म्हणजे काय अशा कल्पनामध्ये भक्तीलाच बांधून टाकण्यात आले. सहज भक्तीभाव , स्पष्ट विचार , व्यहारिक बुध्दीचा वापर करून कर्माचा कोणत्याही पध्दतीने त्याग न करता ईश्वरप्राप्तीचा सांगितलेला मार्ग कोणालाही हवाहवासा वाटणाराच आहे.
धर्मातील किचकट तत्वज्ञानाने गोंधळून गेलेल्या सामान्यांना सहज समजेल व त्याचे आयुष्य उत्तमरीत्या व्यतीत होईल असा लिंगायत धर्म आहे. त्यातील बसव वचन म्हणजे आपल्या मनातील आणि विचारातील जळमटे काढून टाकण्याचे काम करतात.
अश्या महात्मा बसवेश्वरांना मनोमन वंदन....!
====================================================
मुळात आपल्याकडे सर्वच जातीच्या संघटना समाजाला संकुचीत बनवत आहेत. एकप्रकारे संघटना मार्केटींग करणा-या एजन्सीप्रमाणे आपला विचार खपवू लागल्या आहेत. पुरोगामी, सनातनी, मुलनिवासी, विद्रोही सगळेच नुसते शो केस मधील डिस्प्ले खेळणी आहेत. त्यांचा तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात शून्य फायदा होतो. आजच्या युवकांना नवी आव्हाने पेलायची आहेत, जबाबदा-या पार पडायच्या आहेत. हे त्यांच्या खिजगणतीत हि नसते.. माणसाची जात वाईट नसते तर वृत्ती वाईट असते. ती बदलायची असेल तर आपण माणुस आहोत हे आधी लक्षात ठेवावे.
No comments:
Post a Comment