Monday, May 4, 2015

Buddha in Marathi

बुध्दं शरणं गच्छामि... .कारण हे सर्व प्राप्त करावे असेच आहे.....

पत्रकारिता करत असताना कधी कधी अधिकारीवर्गाशी वेगवेगळ्या विषयावर चांगलीच चर्चा होते. प्रशासन व माध्यम ही दोन्ही टोके जरी विरूध्द वाटत असली तरी ती माणसेच आहेत.
एका अधिका-याने बोलत बोलत मला सत्यनारायण गोएंका यांचे विपश्यनेवरील पुस्तक वाचले का असे विचारले ? मुळात वाचायची खूप आवड पण धार्मिक वाचन जरा जपूनच करत असतो.
कारण हिंदू धर्मातील उपनिषद वार्ता, कुंडलिनी शक्ती , पतंजली योग सुत्रे अशी असंख्य पुस्तके वाचून मी ठरवले की बास्स ! आता वाचन जास्त केल्याने विचारांची गुंतागुंत होत आहे.तरीही ते विपश्यनेवरील पुस्तक मी घेतले आणि धन्य पावलो. बुध्द धर्मामुळे माणसाला कसा विचार करावा हे शास्त्रोक्त पध्दतीने समजले.
आज बुध्द पौर्णिमा आहे. बुध्दाविषयी त्यांच्या विचाराविषयी मला खूप प्रेम आहे. माणुस मनाचा गुलाम असतो. मनाला जाणले तर माणुस चांगल्याप्रकारे आयुष्य जगू शकतो. त्यासाठी बुध्दधर्म प्रज्ञा, शील, करूणा याची शिकवण देते. जनसंज्ञापन शिकणा-या प्रत्येकाने विपश्यनेचे तत्वज्ञान माहित करून घ्यावे असे माझे मत आहे. वर्तमानकाळात जगणे सर्वात महत्वाचे असते. माणसाचे मन नेहमीच भूत-भविष्यात गढलेले असते. त्यामुळेच माणुस दुःखी होतो. आपण प्राप्त माहितीवर संवेदना काय देतो यावरच त्या माध्यमाचा परिणाम अवलंबून असतो. 
आपण या माध्यमांच्या प्रभावाखाली राहतो आणि गुलाम होतो. आपले विचार , भावना कधीच कोनाड्यात जावून बसलेल्या असतात.
 विपश्यना म्हणजे एक प्रकारे अन्टीव्हारसच आहे. डोक्यात येणारे असंख्य विचार , त्याकडे पहाणे, त्याला लेबल देणे, वर्गीकरण करणे, नको असलेले विचार काढून टाकणे, चांगल्या येणा-या विचारासाठी जागा ठेवणे यामुळे माणुस ताजा टवटवीत राहतो. बुध्द सर्वात आवडायचे कारण त्यांनी बुध्दीला आणि मनाच्या निर्मळतेला महत्व दिले आहे. बुध्दीला पटेल तेच स्विकारा. स्वतः अनुभवा. 
सगळ्यात जास्त इंटरेस्टींग म्हणजे नोटींग ! म्हणजे असे करायचे की आपल्या मनात येणा-या प्रत्येक विचाराची नोंद करायची. मी त्यासाठी युक्ती केली आहे की एक रफ पेपरवर डोक्यात विचार आला की उभी रेष मारतो. त्यामुळे येणारा विचार आपण नियंत्रीत करण्याचे कौशल्य मिळवू शकतो. ही खूप अफलातून कला आहे.
कुठेही कर्मकांड नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता नसते त्या विचारांचा फाफटपसारा याविषयी मौन बाळगले आहे. ही सुध्दा मला गोष्ट आवडते. उदा. पुनर्जन्म, आत्मा अशा गोष्टी कळाल्या किंवा नाही कळाल्या तरी तुम्हाला तुमचे कर्म करावेच लागते. उगाच गोंधळ उडविणा-या आणि ध्येयापासून विलग करणा-या कल्पना सोडून देणे इष्टच ! बुध्दांना विष्णुचा अवतार मानणे हे थोतांड आहे.  
बौध्द धर्मात जीवन दुःखमय आहे, असे सांगितले आहे. याबाबत मात्र मी पुर्णपणे सहमत नाही. जरी असले तरी दुःखात का जगायचे ? संगीत, कला, क्रीडा अशा विविध गुणांचा विकास करीत जगावे असे वाटते.बहुतेक बुध्दांना प्रथम टप्प्यात माणसाने मनावर विजय मिळवण्यात निपुण व्हावे असे अपेक्षित असावे आपण एकाच मार्गावरील प्रवासी आहोत. आपले जीवन मंगलमय होवो. 

कधी कधी बुध्दांचे विचार वाचून मी   डायरीत काही लिहतो.  त्यापैकी एक विचार!
राग व गर्व या दोन गोष्टी जगात सर्वात जास्त महागड्या आहेत.  जेव्हा आपण राग व गर्व बाळगतो आपल्याजवळील चांगले गुणही गमावून बसतो. अनेक कष्टानंतर प्राप्त झालेले यश व चांगले गुण हे अमुल्य असतात. त्याचा खर्च राग व गर्व एवढ्या सहजतेने करतात की महागड्या हि-याची किंमतही क्षुल्लक ठरावी. त्यामुळे माणसाने राग व गर्व बाळगून उधळपट्टी करू नये. राग व गर्व येत असल्यास थोडी कंजुषी दाखवावी.

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....