Wednesday, January 9, 2019

शबरीमालाच्या दर्शनाने कोणाचे उघडणार डोळे?

कोणतीही समस्या अथवा वाद राजकारणाच्या वळणावर  पोहोचला तर मूळ समस्या काय याचा अधिक गुंता होतो. त्यात आपल्याला भारतीय म्हणून भावनिक जास्त तर्काच्या चष्म्यातून कमी पाहण्याची सवय यामुळे शबरीमालातील दर्शनाचा विषय आंधळ्याने पाहिलेला हत्ती झाला आहे.

शबरीमाला म्हणजे अय्यपा स्वामींचं मंदिर! अय्यपा स्वामींचे भक्त अत्यंत कठोर व्रत करत एकेक पायर्या करत शेवटी दर्शन करतात. व्रत करताना अनेकांना केवळ पायर्याचे दर्शन घेताना काही वर्ष लागतात, तेव्हा दर्शनाची गोष्ट म्हणजे आव्हान असते. म्हणजे व्रत करणार्या भाविकांनी स्वत:वरच श्रद्धेने कठोर बंधन घातलेले असते. यालाच  बुद्धिवादी कर्मठपणा म्हणतात. मात्र या काळात जसे आपल्याकडे वारकरी  माऊली म्हणतात, तसे हे अय्यपा भक्त प्रत्येकाला स्वामी म्हणतात. मग स्त्रीयांकरिता मंदिर प्रवेशाचा वाद कोठून येतो ?

स्रीयांवर अन्याय होतो व त्यांना समान हक्क डावलला जातो, असा आरोप केला जातो. त्यासाठी मी टूसारख्या चळवळी केल्या जात आहेत. प्रत्यक्षात अशा गोष्टी चुकीच्या ठिकाणी लागू केल्याने अतिरेक होताना दिसत आहेत. मंदिरात स्रियांना प्रवेश नाही, म्हणजे अन्याय नसून श्रद्धेचा भाग आहे. आपल्याकडे हनुमानाच्या मंदिरात अजूनही स्रिया जात नाहीत. कारण हनुमान हा ब्रह्मचारी असल्याची भावना आहे. दुर्दैवाने श्रद्धेचे निकष हे वैज्ञानिक निकषावर पाहता येत नाहीत. त्यामुळे या दरीचा राजकीय आणि समाजकंटक पुरेपूर गैरवापर करतात. समाजातील प्रतिगामी आणि पुरोगामी यांच्यातील विषाची बीजे येथेच रोवली आहेत.
गंमत म्हणजे देशातील काही मंदिरात पुरुषांना प्रवेश नाही. पण पुरुषांनी आम्ही राक्षसं अन् स्रिया या फक्त देवी असा वाद करत आंदोलने केली नाहीत.

मग हा वाद सोडवायचा कसा?
कर्मठ लोकांना मंदिरातील महिला प्रवेश नाकारणे हा सुधारणांना विरोध करण्याची संधी वाटत असेल तर हा प्रयत्न हाणून पाडायला पाहिजे. त्याचबरोबर  भाविकांच्या श्रद्धेचा आदर राखला पाहिजे. किमान व्रताच्या निमित्ताने अनेकजण व्यसनमुक्तीच्या मार्गाला लागत असतात.राहिला प्रश्न मंदिरातील महिला प्रवेशाचा! महिलावर अन्याय करणारी बाब नाही ही समजून घेतले पाहिजे. उद्या बारमध्येही आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी केल्यास त्यावरची प्रतिक्रिया काय असेल हे निश्चित करावे लागेल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच मंदिरात प्रवेश नाकारल्याने महिलावर अन्याय होत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. दुसरीकडे इतर धर्मात महिलांना प्रार्थनास्थळात प्रवेश नाकारला जातो, यावर सर्वोच्च न्यायालयाचेदेखील मौन आहे.

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....