शिवसेना अजूनही सत्तेत आहे का हे रोज वर्तमानपत्रात पाहावे लागते. कारण सत्तेत असणारी सेना रोजच सामनातून आणि पक्षाध्याक्ष उद्धव ठाकरे न चुकता विरोधी पक्षाहून अधिक प्रखर टीका करत आहे. तरीही सत्तेचा मोह सोडत नाही.
त्यांचे नाते म्हणजे भांडणा-या पती आणि पत्नीचं तर कधी चोरून प्रियकर, प्रेयसी असल्याची टीका होत आहे. हे नाते कसेही असो पण ते भविष्यात विलग होणार असल्याने चर्चा तर होणारच! अर्थात शिवसेना धनुष्यबाण ताणून सातत्याने स्वतंत्र निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने शिवसेनेचा रुसवा काढून त्यांच्याबरोबर युती करू असे जाहीर केले आहे. मुळात अशी परिस्थिती का ओढवली याची राजकीय मांडणी जाणून घेतली पाहिजे.
भाजप प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व फारसे मानत नाही अथवा ठेवत नाही. प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करण्यापेक्षा त्यांच्या मुंडक्यावर बसून राज्यात मजबूत होण्याची भाजपची रणनीती आहे.यामुळेच ओरिसातील बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक थोडे लांबच थांबून भाजपशी संधान साधतात. दक्षिणेकडील तेलंगणा, तामिळनाडू राज्यांना भाजप प्रादेशिक अस्मितेवर घाला येईल ही भीती सतावते. अशा परिस्थितीत शिवसेनेला भाजपची युती म्हणजे असंगाशी संग वाटली नाही तर नवल काय?
भाजपच्या विरोधात शेतक-यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याचा फटका आगामी निवडणुकामध्ये बसू नये यासाठी शिवसेना काळजी म्हणून भाजपवर टीका करत आहे. सर्वसामान्याबरोबर शेतक-यांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.त्याचबरोबर विरोधी पक्षाची धार कमी केली जात आहे. शिवसेनेला एकाचवेळी सत्ता उपभोगून विरोधी पक्षाची भूमिका वठवायची आहे, हे दुधारी तलवारीसारखे आहे.
शिवसेनेचा मराठीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाताळायला सुरुवात केली. या मुद्द्यावर कधीही नव्हे ते शिवसेनेला स्पर्धक तयार झाली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेहून अधिक भाजपची पकड आहे. या मुद्द्यावर भाजप महाराष्ट्रातील खुंट्या अधिक बळकट करत आहे. यातून भविष्यात शिवसेनेला आव्हान निर्माण केले जावू शकते. शिवसेना आणखी पावले उचलणार असेल तरच अस्तित्व टिकणार आहे.
No comments:
Post a Comment