Friday, January 10, 2020

माणसातले प्रोग्रॅमिंग आणि नवा व्हायरस...

सरकारने आणललेला नवा कायदा झालाच पाहिजे. या घोषणा देताना  आशिष कार्यकर्त्यांना घेवून विद्यापीठासमोर थांबला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी त्यांना भडकावणे आशिषला महत्त्वाचे वाटत होते. पण भरदुपारी १२ वाजता उन्हामुळे कार्यकर्त्यांना नीटसे उभा राहवत नव्हते. त्यात कॅमेरामॅन आणि सतत फिरणाऱ्या फोटोग्राफरमुळे त्यांना अलर्ट राहावे लागत होते. ढिले राहून जमणार नव्हते  ओढूनताणून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची दमछाक सुरू होती. तेवढ्यात एका वृत्तवाहिनीचा पत्रकार व कॅमेरामॅन तिथे पोहोचला. आशिषसाठी तो हक्काचा माणूस होता. कारण मोर्चात कमी माणसे असली तरी गर्दी दाखविणारे व्हिज्युअल्स काढण्याची कॅमेरामॅनची हातोटी होती. कॅमेराकडे पाहत कार्यकर्त बेंबीच्या देठापासून ओरडत होते. पक्षाचे वरिष्ठ नेते खूष होतील अशा विचाराने आशिषला कष्टाने चीज झाल्यासारख वाटत होते.

सवयीने त्याने स्मार्टफोन हातात घेवून चाळवायला सुरुवात केली. त्याच्या पक्षाचे फॉलोअर्स नेते व कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवर काय अपडेट आहे का, हे तो पाहत होता. त्याने आंदोलनातील काही फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकले. काहीजणांनी त्याला लाईकचे इमोजी टाकत दिलासा दिला.
'सरकार हायहाय'च्या घोषणा त्याच्या कानावर पडल्या. सगळे कॅमेरामॅन व पत्रकार त्या दिशेने धावत सुटले. आशिषने स्मार्टफोन ठेवावा, तसा विचार करेपर्यंत एका ग्रुपवर ट्विटलिंक असलेली आदिती या कार्यकर्तीचा फोटो टाकला होता. आशिषने ती लिंकवर टिचकी मारुन पाहिले, हातात लोकशाही वाचवा लिहिलेला तो फलक होता. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लोकशाहीला वाचवा म्हणणारी ही कोण?

आशिषने हॅशटॅग केलेले तिचे अकाउंट शोधून काढले . पण त्यावर फोटो स्पष्ट दिसत नव्हता. तिच्या आंदोलनातील अपडेट पोस्टखाली अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्याला खूप बरे वाटले. काहीजणांना शिव्या देताना बरे वाटते, हे तो गेल्या काही वर्षात पक्षात आल्यापासून शिकला होता. सरकार मुर्दाबाद, लोकशाही बचाव आदिती आणि तिच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू होत्या. आशिष त्यांच्या मोर्चावर चालून जाण्यासाठी विचार करत होता.

'ये काय बघताय घ्या दगडं अन् फोडा यांची डोकी. सरकारपेक्षा त्यांना जास्त कळतय का'.
काही समजायच्या आत आंदोलन करणाऱ्या आदितीच्या डोक्यात दगड बसला. डोक्यातून रक्त सांडायला लागल्यानंतर आजूबाजूचे कार्यकर्ते चवताळले. त्यांनी दगड हातात घेण्यास सुरुवात केली. आदितीने जखमी अवस्थेत त्यांना सांगितले की, तुम्हाला तुमच्या आदिती ताईची शपथ आहे. एकानेही दगडफेक करायची नाही. आपले आंदोलन अहिंसेने झाले पाहिजे.

इकडे आशिष आणि त्याचे कार्यकर्ते जिंकल्याच्या आनंदात होते. आपण यांना आंदोलन मागे घ्यायला भाग पाडू, असा आशिषला विश्वास वाटू लागला. गर्दीतील एका कार्यकर्त्याने आदिती पाटील हम तुम्हारे साथ है,  असा हातात फलक घेत घोषणा चालू केल्या. यावेळी आशिषला दोन गोष्टींचा धक्का बसला. त्या आंदोलकांना दगडांची  भीती वाटत नव्हती.  दुसरे म्हणजे सर्वात धक्क्याची गोष्टी म्हणजे आदिती पाटील या नावाची!


११ वी विज्ञान शाखेत आल्यापासून सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगणारी आदिती त्याला आठवली. पण ही आदिती तर कोणत्यातरी सामाजिक संघटनेची कार्यकर्ती दिसत होती. माणूस वयाने व पदाने कितीही मोठा झाला तरी त्याला जुन्या आठवणी व प्रिय माणसे एक अदृश्य शक्तीने बांधून टाकतात.  लहान मुलाने धाव घ्यावी तशी त्याने आदितीच्या दिशेने धाव घेतली. एका झाडाच्या बुंध्याखाली डोके गच्च धरून ती  बसली होती. चेहऱ्यावर वेदना होत्या. पण संघर्षाचे तेज चेह-यावर दिसत होते. जवळपास १५ वर्षानंतर ते दोघे समोरासमोर भेटत होते.

आशिषचे केस विरळ झाले असली तरी लांबसडक नाक ही त्याची ओळख होती. तर आदितीचे मोठे डोळे पाडून दाक्षिणात्य अभिनेत्रीसारखा तिचा लूक वाटत होता. पण नजर एकमेकांना भीडली. तर दोघांनाही एकमेकांची ओळख पटली. खरेच डोळ्यांची भाषा आणि कधीच विसरणारी नसते.
आशिष- तू
आदिती-  तू
आशिष - अरे हा, प्रश्न
आदिती - हो, हा  प्रश्न जावू दे. काय आंदोलन करतोस तू हे...
आशिष ० सॉरी तुझ्या डोक्याला दगड लागला आहे. माझे फॅमिली डॉक्टर जवळच राहतात. तुझ्यावर मलमपट्टी करू.
आदिती-मलमपट्टी माझ्या डोक्याला नाही, सरकारच्या डोक्याला करायची आहे. ती रागाने म्हणाली.
आशिष- हे बघ, तुझ्यासारखेची मुलीने स्वत:ची काळजी घ्यायला हवी.
आदिती - आशिष, अरे पण दगडफेक तुझ्याच बाजूने झाली. तू काय करतोस तिथे तुझ्यासारखा सुसंस्कृत मुलगा अशा गावगुंडात कसा मिसळला. हेच कळत नाही.

आदितीचे ते शब्द ऐकून आशिष जागेवरच थबकला. त्याला आठवले, देश व धर्माचे गोडवे गाताना कधी कट्टरवादी लोकांकडे वळलो, हेच कळाले नाही. दुसऱ्या धर्माच्या कट्टरवादाकडे नाव ठेवता ठेवता आपणही तसचे झालो आहोत, याची पुसटशी जाणीव झाली.  कंत्राटदार म्हणून सरकारी कामे मिळविताना त्याने
पक्षाची कामे सुरू केली.
 आदिती  - काय विचार करतोस तू? मला वाटतं तुझे वक्तृत्व गुण पाहून त्यांनी तुला बोलाविले असेल येथे.
आशिष- मी आता या पक्षाचे  काम करते आहे अन् तू?
आदिती - मी जस ठरवले, तशी सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले. पण आठवत का, तुला? भारतीय लोकशाही जगात श्रेष्ठ या विषयावर केलेले तुझे भाषण.. आज सॉफ्टवेअर अभियंता म्हणून असले तरी भारतीय आहे. तुझे भाषण आजही जसेच्या तसे आठवते.

आशिष वरमला. तो बदलला पण आदिती आजही तशीच होती.
आदितीने हातात स्मार्टफोन घेतला. तिच्या लोकशाहीवरच्या पोस्टवरील अपडेट कमेंट ती वाचत होती. त्याखाली आशिषने शिव्यांची लाखोली वाहिलेली होती. ते पाहून आदितीला धक्काच बसला.

आदिती- आशिष हे बघ, माणूस हा पहिल्यांदा भारतीय असतो. सोशल मीडियावरून त्याबाबत मत बनवू नये. तुला शंका आहे का माझ्या देशभक्तीबद्दल?
आशिषला काय बोलावे हे सूचेना. घामाने डबडबलेला चेहरा त्याने रुमालाने पुसला. भलीमोठी वेगाने होणारी बांधकामे झरझर वेगाने कुणीतरी दोघांमध्ये निर्माण करत असल्यासारखा त्याला भास झाला.
त्या प्रचंड इमारतीच्या ओझ्याखाली दबतोय, अशा भावनेने त्याला तिथे थांबणे शक्य होत नव्हते. एका
कार्यकर्त्याने त्याला कानात हळूच सांगितले, केंद्रीय मंत्र्यांचा उद्या मतदारसंघात दौरा आहे. त्यामुळे उद्या कार्यक्रमासाठी माणसे वेगाने गोळा करावी लागणार होती.
आशिषने नमस्कार करत तिचा निरोप घेतला. माणसांचे प्रोग्रॅमिंग करता येत नाही. पण चांगली नाती ही पुलासारखी आयुष्याचा प्रवाह अखंड धरून ठेवतात. आदिती बदलेल्या आशिषला जाताना पाहून विचार करत होती, माणसांचे प्रोग्रॅमिंग एवढे किचकट कोण करते आहे, हा तिला प्रश्न सतावत होता. एखादा मालवेअर माणसाच्या मेंदूत शिरल्यासारख्या आशिषला पाहून ही भेट झालीच नसती तर बरेच झालेच असते, असे तिला वाटू लागले.

3 comments:

Unknown said...

Very nice article

Unknown said...

Yes. Such types of comments has start in socity.one purson thinking and another has thinking so much same but its type is not right so understand. So time is going on. Whats time to do namely. Actual time second time nots coming. So time is fast going. So fact is should with thinks.
Good Night

Admin said...

धन्यवाद,आपली प्रतिक्रिया खूप अनमोल आहे.

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....