Monday, March 1, 2021

मशीन लर्निंग -2050

धडधड...धडधड...जेसीबीचा आवाज सुरू होता...ऑफिसला जाताना अमेयनं पाहिलं...मशीनवर चालवणारा ऑपरेटर जसं मान फिरवित होता...तसतसा जेसीबीचा पंजा फिरत होता...पूर्वीच्या काळात लोक जेसीबी कशी काम करत होती? पण, 2050 मधील लोक आजही गर्दी करून जेसीबीचे काम पाहत आहेत. माणसाला या मशीनमध्ये काय आजही निराळ वाटतंय...मशीन..माणसाचा सगळ्यात मोठा सहकारी तेवढाच कट्टर स्पर्धक...छे कट्टर स्पर्धक म्हणावं, तर हातात घालून फिरावं..तसं 2050 मधील माणूस आणि मशीन हे डोक्यात डोके घालून आहेत..त्याचे समोर उदाहरण पाहताना अमेयला इंजिनियअर असल्याचे कौतुक वाटले. जेसीबीचा ऑपरेटर किती शिताफीने मान जेसीबी चालवित होता. त्याचं प्रत्येकाला कौतुक वाटत होतं...नाही तर मान हलविण्याची सवय ही मशीनच्या युगात विसरून गेलाय..तुम्ही हो, म्हण्याआधी मेंदुतील चिपच सांगते, तुमचा होकार आहे की नकार... जेसीबी ऑपरेटर डोक्यातील चीपमुळे मशिन चांगला ऑपरेट करू शकत होता..त्याच्या मालकाला मोबाईलवर जेसीबीच्या कामाची अपडेट मिळत होते. माणसाच्या मेंदुत बसविणाऱ्या चीपमुळे माणूस कितीतरी सक्षमपणे काम करत असताना क्रांती घडत असल्याचा देशभरात प्रचार सुरू असताना अमेयलाही अभिमान वाटत होता..
मशीनच्या चीपमुळे माणसावर दुष्परिणाम होतात, हे त्याला मान्य करायच नव्हतं. कारण, मशिन नियंत्रित करणाऱ्या चीपमध्ये तो वरिष्ठ अभियंता होता. कितीतरी अवघड कामे या चीपमुळे सोपे होतात, हे त्याने अनेकदा कंपनीद्वारे होणाऱ्या सेमीनार व प्रोजक्टमध्ये सांगितले होते. त्याला करियरमधील चढ-उतार आठवता आठवता त्याला आठवलेली चांगली पुस्तके आठवली. सगळी चांगली पुस्तके ही एखाद्या चांगल्या प्रोग्रॅमिंगसारखी वाटत होती. पण, आता, ही प्रोग्रॅमिंगही हळूहळू डोक्यातून कधी निघून गेले, हे समजलेच नाही. तेवढ्यात ऑफिसजवळ आल्याचे मोबाईलमधील अपचे रिमांडर वाजले. त्याने आयकार्डला लावलेली चिप काढून एअरब्लूटूथला लावली. कंपनीने खास त्याच्यासाठी युनिक चिप बनवलेली होती. कंपनीमध्ये येताच त्याचे स्वत:चे विचार संपूर्णपणे संपणार होते..फक्त कंपनीमधील प्रोजक्ट आणि विविध आयडियाच त्याच्या डोक्यात तरळणार होत्या. एकूणच त्याच्या मेंदूवर कंपनीचे पूर्णपणे नियंत्रण होते. सगळं कसं त्याच्या मनासारखं होते. कंपनीला त्याची पूर्णक्षमतेने बुद्धिमत्ता वापरता येत होती. अमेयला कंपनीकडून इंटरनेट ऑफ मशिन्सचे उपकरणांनी सुसज्ज घर आणि इलेक्ट्रिक कार मिळाली होती. कधी कधी कंपनीकडून त्याला ऑफलाईन राहण्याची परवानगी मिळालेली होती. कंपनीमधील कोणत्याच कर्मचाऱ्याला सोशल मीडियावरून ऑफलाईन राहण्याची परवानगी नव्हती. इंटरनेटशी कनेक्टेड कर्मचारी म्हणजे एकनिष्ठ कर्मचारी अशी बहुतांश कंपन्यांची पॉलिसी असल्याने अमेयला महिन्यातून एक दिवस इंटरनेटशिवाय राहण्याची परवानगी दिल्याने ट्रिपची मोफत तिकीटे मिळाल्याचा आनंद वाटत होता. जणू त्याच्या मनाचीच त्याच्या मनाशीच भेट घडत नव्हती. पण, तशी भेट घडण्याचा दिवस त्याला नेहमीच आणावा लागणार होता..घडलही तसंच...त्याचा बॉस टेस्लाने प्रोजेक्टसाठी घातलेली अट! हे बघ, हा प्रोजक्ट खूप मोठा आहे. तू हेड असणार आहेस. आपल्याला इमोशनल इंटेलिजन्सवर काम करायचे आहे? म्हणजे मशीनलाही भावना असतील, अशा पद्धतीने प्रोग्रॅमिंग करायची आहे. हा जगातील पहिलाच प्रोजक्ट असणार आहे. हा जर प्रोजक्ट यशस्वी झाला तर गुगल, फेसबुकदेखील आपले प्रोडक्ट विकत घेतील..पण लक्षात घे..त्यासाठी तुला इमोशनल व्हावे लागेल..हसावे लागेल, रडावे लागेल..तेही इमोजी न वापरता.. हे ऐकून अमेयला प्रचंड संतापला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला.. सर, तुम्हाला माहित आहे, तीस वर्षापूर्वीपासून कोरोनाच्या काळानंतर डिजीटल युगाला सुरुवात झाली. तसं माणसामधील भावना या धूसर झाल्या आहेत. आपण हसणे आणि रडणे यासाठी व्हाईस अप वापरतोय. डोळ्यात प्रत्येक मेसेजमध्ये इमोजी वापरतो. पण, त्यासाठी चेहऱ्यावर आनंद व दु:ख दाखविण्याची गरजच राहिली नाही. पुढे तो ब्लँक झाला..अमेयला काहीच आठवत नव्हत. कारण, त्याच्या ब्लूटुथमधील मेमरीमध्ये कंपनीविरोधात बोलण्याची सोय नव्हती. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर चीपद्वारे आपोआप नियंत्रण आले. टेस्ला सरांनी आठवलं..अमेय चिप लावण्यानंतर नाही, तर नैसर्गिरित्याच खूप शांत होता. त्याने चीप काढल्यानंतरही कधीच राग, आनंद व दु:ख या भावना चेहऱ्यावर दिसू शकल्या नाहीत. शेवटी हाच प्रोफेशनलिझम झाला आहे, कारण माणसाने मशिन आणि कॉम्पुयटरप्रमाणेच घडविले तरच तो टिकणार आहे. पण, अचानक मशिनमध्येही इमोशनल आणण्याच्या प्रोजक्टमुळे सगळ्यांनाच भावनिक गुंतागुंतीचा सामना करावा लागत आहे. हे बघ, अमेय..तुला कंपनीकडून मेंदुतील चिपमध्ये काही खास अडव्हान्सड प्रोग्रॅम करून दिले जाईल. पण.. एवढ्यावरच टेस्ला सर थांबले. त्यांच्या बोलण्यात एक कठोरपणा आणि निर्णायकपणा होता.. पुढे टेस्ला सर म्हणाले, कंपनीमधून देण्यात येणाऱ्या अडव्हान्सड प्रोग्रॅमला मर्यादा आहेत. शेवटी भावनीक निर्देशांक वाढविला तरच हा प्रोजेक्ट दिला जाईल. नाही तर नवीन माणूस घेणार आहोत. तो प्रोग्रॅमिंगसह कवीही आहे. कंपनीला विश्वास आहे, कवी असेल तर त्याचा भावनिक निर्देशांक शाबूत राहतो. नाहीतर कंपनीच्या चिपमुळे भावनिक निर्देशांक जवळपास शून्यावर पोहोचतो. कंपनीसाठी तुला भावनिक निर्देशांक वाढवावा लागेल, नाहीतर... अमेयला प्रचंड राग आला. त्याला स्वत:चेच आश्चर्य वाटले..गेल्या पंधरा वर्षात त्याने राग, आनंद व दु:ख या भावना चिपमुळे control alt, shift चे बटन दाबून कायमच्या काढाव्या तशा काढल्या होत्या. सगळीकडे अशा लोकांना सर्वाधिक प्रोडक्टिव्ह मानत होते. कंपनीही त्याच्या कामगिरीवर खूश होते...पण, आता हीच गोष्ट अडथळा ठरत होती..कंपनीला इमोशनल इंटेलिजन्स हवा होता.. अमेय, तुला कंपनीकडून काय सपोर्ट हवा आहे, का नक्की सांग. मी अरेंज करून देईन...काही वेळ आनंद व दु:ख वाटू शकेल असे अलर्ट देणारे सबस्क्रीप्रश्न कंपनीकडून देण्यात येईल..म्हणजे दिवसातून कितीवेळ आनंद व दु:ख वाटले, याचे रेकॉर्ड कंपनीकडून मोजण्यात येईल. आनंदाचे प्रमाण कमी झाले तर त्याचे आनंदाचे अलर्ट व दु:खाचे कमी झाले तर आनंदाचे अलर्ट पाठविण्यात येतील. हे सगळे ऐकताना अमेयच्या चेहऱ्यावर एकही रेष नव्हती. काय करावे, हे त्याला सूचत नव्हते. ऑफिसला बाहेर पडण्यापूर्वी डोळ्यांनी रेटिना दाखवून त्याने आउटपंच केले. ब्ल्यूटूथची चीप काढून हातात घेतली. एक क्षण, ती चीप त्याला भिरकावून द्यावीसी वाटली...पण, दुसऱ्याच क्षणात त्याने चीप आयडीमध्ये ठेवून दिली. दीर्घ श्वास घेत तो कारमध्ये बसला. अलेक्सा, मला सांग, मी रडण्यासाठी काय सांगू... दुसऱ्याच मिनिटात अलेक्साने निसर्गाच्या प्रकोपाच्या बातम्या सांगायला सुरुवात केली. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी ऐकताना पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी तरळले...केवळ दुर्बलतेनेच पाणी डोळ्यात येते, हा त्याचा समज खोटा ठरला. त्याला एकेक गोष्टी आठवू लागल्या..महापुरात लहानपणी अडकलेला असताना मानवी साखळी करून त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले होते. निसर्गाच्या प्रकोपाच्या बातम्या ऐकताना त्याला लहानपणीच्या पुराची आठवण आली...पुन्हा हमहमसून रडू लागला..त्याला आठवले की आपण कितीतरी वर्ष बाहरेच्या जगाकडेच पाहिले नाही..या पंधरा वर्षात आपण फक्त आपण आपल्याच जीवनात जगलो. आपले आयुष्य फक्त आपलेच होते, पण खरेच तसे असते का? जगाबरोबर कनेक्ट होताना त्याला जाणवलं की भावनिक निर्देशांक शून्य नाही. तर कनेक्शन फक्त तुटलेले आहे, जगाबरोबरचे..त्याला हे समजताच हसू आले..पुराच्या बातम्या सुरुच होत्या..ते ऐकताना मध्येच रडू आले...हास्य अश्रू..अश्रू व हास्य..आपण मनाने मशिनच्या जगात मेलेलो नाही, हे समजताच तो आनंदाने रडू लागला अन् म्हणाला...अलेक्सा.. suggest me shopping for emotions..अलेक्सा काहीच म्हणणार नव्हती. पण, त्याला कळालं होत, मशीनमध्ये भावनिक निर्देशांक टाकण्याआधी माणसाला स्वत:च्या इमोशनच्या प्रोग्रॅमिंग खूप जाणून गरजेचे आहे. डिजीटलच्या चक्रव्युहातून बाहेर पडण्याची कुणालाही न गवसलेली इमोशनल प्रोग्रॅमिंगची किल्ली त्याला मिळाली होती.

Wednesday, December 23, 2020

वृत्तकथा भाग-1 शेतकऱ्याचा आनंदी चेहरा- हरप्रीत सिंह

  वृत्तकथा - भाग-1


आनंदी शेतकऱ्याचा चेहरा-


पंजाबचे अभिनेते हरप्रीत सिंह यांचा शेतकरी वेशभुषेतील फोटो भाजपने सोशल मीडियावर परस्पर वापरला आहे. विशेष म्हणजे हे हरप्रीत सिंह शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले असतानाच भाजपच्या आयटी सेलचा खोडसाळपणा समोर आला आहे. यावरून प्रेरणा घेत आहे वृत्त कथा लिहिली आहे. 



हरप्रीत सिंह हे अभिनेते असल्याने त्यांना फोटो काढायला आवडते. आजकाल, प्रत्येकाला सोशल मीडियामुळे फोटो काढण्याची हौस झालेली आहे. त्यात हरप्रीत हे अभिनेता असल्याने त्यांचे फोटो सेशन एक पाऊल पुढे असते.  शेतामध्ये काम करणारा शेतकरी म्हणजे आपल्याला आभाळाकडे टक लावणारा नाही तर फाशीवर लटकलेला शेतकरी पाहण्याची सवय माध्यमांनी लावलेली आहे. थोड्याफार फरकाने शेतकरी सतत नापिकी आणि कर्ज, अस्मानी व सुलतानी संकटातून सामोरे जात होते. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू असलेले फोटो तसे दुर्मीळच..

मग, त्यांनी ठरवले असेच फोटो काढायचे. ठरल,  शेतात फोटो सेशन करण्याचे!  हातामध्ये खोऱ्या, डोलणारी पिके आणि सोसाट्याचा वारा असे त्यादिवशी दिलखुश करणारे वातावरण होते.  हातात खोऱ्या आणि अभिनयाची झलक दाखवित असताना त्यांनी स्माईल केल्यावर मित्राने त्यांचा छानसा फोटो काढला. फोटो पाहून पंजाब दी पुतर...  खूश झाले.  पंजाबचा शेतकरी खूश नाही, पण खूश असल्याचा फोटोही त्यांना समाधानकारक वाटला. कारण, त्यात कुठेतरी सकारात्मकतेचा कवडसा दिसत होता. उद्याच्या सुखी जीवनाचे स्वप्न दिसत होते. त्यांनी  सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी   पसंती दर्शविली.     

 मध्यंतरी जवळपास सहा-सात वर्षे उलटली... रक्ताचे पाणी करूनही कष्टाला दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले. थंडीने गारठून तर कुणी ह्रदयविकाराच्या झटक्याने ऐन आंदोलनात प्राण सोडले. कन्याकुमारी ते जम्मूपर्यंत शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनाच्या वेदना ओळखल्या. साहजिकच पंजाबमधील खेळाडू असो की सेलिब्रिटी यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला..

इकडे हरप्रीत सिंहदेखील आंदोलनात उतरले होते. शेतकरी बांधवाच्या भावना ओळखून आंदोलनात उतरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. पण, अचानक त्यांना ट्विटरवर दिसला आनंदी शेतकऱ्याचा चेहरा.. तो चेहरा त्यांचाच होता.. हे कसे शक्य आहे? याचा अर्थ आपल्यातील कलेचा वापर हा राजकारणासाठी केला जातो. तसेच आपल्या फोटोसाठी परवानगी घेण्यात न आल्याने त्यांचा संताप झाला. 

त्यांनी स्वत:शीच प्रश्न विचारला, खरेच आनंदी शेतकऱ्याचा फोटो एवढा दुर्मीळ झाला आहे का? सोशल मीडियाचा वापर करून किती लोकांना भरकटविले जात आहे. यामध्ये कलाकार म्हणून त्यांना होणारी घुसमट थांबत नव्हती...आंदोलनाच्या घोषणा सुरू झाल्यानंतर त्यांची घुसमट अधिकच उफाळून आली.  कलाकारातील सच्चेपणा  जिवंत असल्याचे हे उदाहरण होते. 

 





Tuesday, December 22, 2020

कोरोना आवडे सर्वांना?

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोनाचे संकट जात असतानाच अजून पुन्हा अनिश्चितेचे सावट पसरण्याची भीती आहे. हे असे का घडत आहे?
कोरोना मार्चपासून हाहाकार करत असताना  मला काही हॉलिवूडमधील  सिनेमांची आठवण येत आहे. रोगराई पसरणे हे काही औषधे कंपन्या तसेच काही जागतिक नेत्यांसाठी फायदेशीर आहे. त्यासाठी  ही मंडळी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता असते.
आपण पाहिलंच आहे की कोरोनाच्या काळात  चीनने स्वतःची आर्थिक भरभराट निर्यात करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच कोरोना हा मानवनिर्मित आहे की नैसर्गिक यावर प्रश्नचिन्ह तयार होत आहे.  चीनचे आजपर्यंत व्यवहार ही तसेच संशयास्पद झाले आहेत. मग  नव्या कोरोनाचे बिल कुणाच्या खात्यावर फाडण्यात येणार आहे? 
कोरोनाची लस बाजारात आणण्यासाठी अनेक औषधे कंपन्यांची धडपड सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग आपोआप आटोक्यात आल्यास या कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे भांडवल वाया जाणार नाही का? माणसांमधली भीती हीच  बाजारपेठ मिळविण्याची सर्वात मोठी शक्ती असते. कोरोनाची भीती जगामधून जाणे हे औषधी कंपन्यांना परवडणारे नाही. त्यामुळे जोपर्यंत कंपन्यांच्या लसी विविध सरकारकडून खरेदी होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या भीतीचे मार्केट जोरदार चालणार आहे. याचा
असा अर्थ नाही की कोरोनाचा नवा प्रकार खोटा आहे? किंवा करोना प्राणघातक नाही. पण, त्यावर इलाज करण्याबरोबरच भीती निर्माण करण्याचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न होत आहेत. दुष्काळ हा कुणालाच नको, हे खरे आहे का? पाण्याची टँकर लॉबी असो की विविध अनुदान लागणारे लोक त्यांच्यासाठी दुष्काळ एक वरदान असते. तसेच कोरोनाचे संकट हे काही कंपन्या उद्योग तसेच  सरकारसाठीही फायदेशीर असते.
 सुज्ञास अधिक सांगणे न लगे...

Saturday, October 3, 2020

अबिराज किचन-लातुरमधील पहिले क्लाउड किचन

मनात ठरवले तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे भक्कमपणे पाय रोवू शकता. याचे उदाहण लातूरमध्ये क्लाऊड किचनची सुरुवात करणारे सुमित पाटील हे आहेत.

थोडसं मागे जावू...पुण्यात कोरोनाची भयावह स्थिती असताना त्यांनी तीन महिन्यांपूर्वी लातूरमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. बायोमेडिकल कंपनीत एचआरमध्ये चांगल्या  पदावर असताना त्यांनी नोकरीला रामराम ठोकला अन् लातूरमध्ये परतले. पण, कोणता व्यवसाय सुरू करायचा असा त्यांच्यासमोर प्रश्न होता.  तेव्हा त्यांच्या लक्षात केले की, कोरोनाच्या काळात लोक बाहेर जाण्याचे टाळत आहेत. पण, अनेकांना योग्य  किमतीत चविष्ट अन्न खाण्याची इच्छा आहे. तेव्हा त्यांनी या संकटात हीच संधी आहे, हे ओळखून क्लाऊड किचनची सुरुवात केली. आम्ही त्यांना विचारले, तुम्ही महिलांची मक्तेदारी असलेल्या फुडच्या उद्योगात कसे आलात..तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर हे खूप प्रांजळ आणि कोणत्याही कौटुंबिक मनाच्या व्यक्तीला माणसाला आवडेल असे आहे.

सुमित पाटील सांगतात, पत्नीचे स्वप्न आहे, की स्वत:चे रेस्टॉरंट सुरू करावे. तर माझे स्वप्न आहे, स्वत:ची कोचिंग संस्था असावी. पण लॉकडाऊनमुळे अलिबागमधील थोडेसे नियोजन बदलावे लागले.

विशेष म्हणजे सुमित पाटील आजही विद्यार्थ्यांना ऑनलाईन फिजिक्स शिकवितात. त्यावेळी त्यांना कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य मिळते.    

कसा चालतो किचन  क्लाउडचा व्यवसाय?

क्लाउड किचन ही संकल्पना सध्या खूप रुजत आहे. यामध्ये  ग्राहकांकडून  ऑनलाईन ऑर्डर घेतल्या जातात. त्यांना घरपोहोच अन्न दिले जाते. घरगुती आणि इतर समारंभासाठीही सुमित पाटील ऑर्डर घेतात.

फूड डिलिव्हरी देतातना संपर्कविरहित म्हणजे कॉन्टॅक्टलेस ऑर्डर दिली जाते. स्वच्छतेचे आणि सध्याच्या काळात आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करून फूड दिले जात. याबात सुमित पाटील सांगतात, पुण्यात असे किचन फॅसोस, लंचबॉक्स असे किचन क्लाऊडचे फूड देणाऱ्या कंपन्या आहेत.

खवय्यांसाठी आहे भरगच्च मेन्यू-

आम्ही घरात किचन सेटअप केला आहे. खवय्यांसाठी 25 ते 30 प्रकारचे मेन्यू आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी चॉकलेट सँडविच, मराठा प्लॅटरमध्ये थाळी सिस्टिमसाठी मेथी भाकर असे खास महाराष्ट्रीयन जेवण आहे. पंजाब –पनीर बटर मसाला असे प्रकारही आहेत. बिर्याणीचे विविध प्रकार आहेत.

सुमित यांच्याशी गप्पा मारताना तुम्हाला त्यांचे उत्तम नियोजन लक्षात येते. ग्राहकांना चविष्ट फूड देताना फार खर्च येत नाही, हे ते सांगतात. यामधून मिळणारा नफाही पुरेसा असल्याचे प्रांजळपणाने सांगितले. क्वचितच एखादा उद्योजक क्वचितच एवढ्या प्रामाणिकपणाने आपल्या फायद्याचे गणित सांगेल.. त्यांनी एक उदाहणच दिले. सुमित सांगतात..समजा पुण्यात एखादा फूड आयटम हा 250 रुपयांना आहे. तो आमच्याकडे 100 रुपयांना आहे. गुणवत्तेबाबत आम्ही उलट जास्त चांगले आहोत, असा त्यांनी दावा केला आहे.

भविष्यात त्यांना फ्रँचाईजी द्यायचा आहेत. पण, तीन वर्षांपर्यत ते लातूरमध्ये लक्ष केंद्रित करणार आहेत.

त्यांना हा फुड बिझनेस सुरू करताना अनेक अडचणी आल्या आहेत. सुमित म्हणाले, आपले संपर्क सुरुवातीला मर्यादित असल्याने अडचणी येतात. पण नवीन लोकांना जोडावे लागते. सुरुवातीला ग्राहक  विश्वास ठेवत नाहीत. पण, ग्राहकांना गुणवत्तेची खात्री झाली तर खूप फरक पडतो. चीज हे अमुलचेच खाद्यपदार्थात गावरान तुप अशी ते क्वालिटी देतात


उद्योगाला किती अडचणी येतात असे विचारले असता सुमित सांगतात, आम्ही सुरुवात गणेश चतुर्थीला उकडीच्या मोदकापासून केली. तांदळाची उकड अथवा पिठ्ठी मिळाली नाही. ती तयार करण्यासाठी गिरणीत जावे लागले. ग्राहकांकडून चांगल्या ऑर्डर आल्या होत्या, पण ऐनवेळी लोडशेडिंगमुळे चार ऑर्डर रद्द कराव्या लागल्या.


काय आहे उद्योजकांना सल्ला..

फुडच्या व्यवसायात असाल तर वेळेचे नियोजन खूप आवश्यक आहे. अनेकांना खूप भूक लागलेले असते. त्यांना लगेच फूड हवे असते. त्यामुळे आधी आम्हाला तयार असावे लागते. वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. आम्ही ग्राहकांना फूड देण्यासाठी नेहमी तयार असतो.

 स्टार्टअपला सुरुवातीला यश मिळेलच असे नाही. संयम ठेवल्यास हळूहळू तुम्ही नक्की झेप घेऊ शकता. सर्वात प्राधान्य हे व्यस्थापना द्यावे, असा सल्ला सुमित पाटील यांनी दिला आहे.


सध्या, बाहेरून अन्न मागविणे का मागवावे असा अनेकांना प्रश्न पडतो. पण रेस्टॉरंटसारखे जेवण तेही वाजवी दरात मिळण्यासाठी अभिराजने चांगला पर्याय दिला आहे. तुम्ही फूड ऑर्डर करू शकता..


 काॅपिराईट,@श्रीकांत पवार

 

 

  

Friday, January 10, 2020

माणसातले प्रोग्रॅमिंग आणि नवा व्हायरस...

सरकारने आणललेला नवा कायदा झालाच पाहिजे. या घोषणा देताना  आशिष कार्यकर्त्यांना घेवून विद्यापीठासमोर थांबला होता. कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी त्यांना भडकावणे आशिषला महत्त्वाचे वाटत होते. पण भरदुपारी १२ वाजता उन्हामुळे कार्यकर्त्यांना नीटसे उभा राहवत नव्हते. त्यात कॅमेरामॅन आणि सतत फिरणाऱ्या फोटोग्राफरमुळे त्यांना अलर्ट राहावे लागत होते. ढिले राहून जमणार नव्हते  ओढूनताणून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची दमछाक सुरू होती. तेवढ्यात एका वृत्तवाहिनीचा पत्रकार व कॅमेरामॅन तिथे पोहोचला. आशिषसाठी तो हक्काचा माणूस होता. कारण मोर्चात कमी माणसे असली तरी गर्दी दाखविणारे व्हिज्युअल्स काढण्याची कॅमेरामॅनची हातोटी होती. कॅमेराकडे पाहत कार्यकर्त बेंबीच्या देठापासून ओरडत होते. पक्षाचे वरिष्ठ नेते खूष होतील अशा विचाराने आशिषला कष्टाने चीज झाल्यासारख वाटत होते.

सवयीने त्याने स्मार्टफोन हातात घेवून चाळवायला सुरुवात केली. त्याच्या पक्षाचे फॉलोअर्स नेते व कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवर काय अपडेट आहे का, हे तो पाहत होता. त्याने आंदोलनातील काही फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकले. काहीजणांनी त्याला लाईकचे इमोजी टाकत दिलासा दिला.
'सरकार हायहाय'च्या घोषणा त्याच्या कानावर पडल्या. सगळे कॅमेरामॅन व पत्रकार त्या दिशेने धावत सुटले. आशिषने स्मार्टफोन ठेवावा, तसा विचार करेपर्यंत एका ग्रुपवर ट्विटलिंक असलेली आदिती या कार्यकर्तीचा फोटो टाकला होता. आशिषने ती लिंकवर टिचकी मारुन पाहिले, हातात लोकशाही वाचवा लिहिलेला तो फलक होता. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. लोकशाहीला वाचवा म्हणणारी ही कोण?

आशिषने हॅशटॅग केलेले तिचे अकाउंट शोधून काढले . पण त्यावर फोटो स्पष्ट दिसत नव्हता. तिच्या आंदोलनातील अपडेट पोस्टखाली अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्याला खूप बरे वाटले. काहीजणांना शिव्या देताना बरे वाटते, हे तो गेल्या काही वर्षात पक्षात आल्यापासून शिकला होता. सरकार मुर्दाबाद, लोकशाही बचाव आदिती आणि तिच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू होत्या. आशिष त्यांच्या मोर्चावर चालून जाण्यासाठी विचार करत होता.

'ये काय बघताय घ्या दगडं अन् फोडा यांची डोकी. सरकारपेक्षा त्यांना जास्त कळतय का'.
काही समजायच्या आत आंदोलन करणाऱ्या आदितीच्या डोक्यात दगड बसला. डोक्यातून रक्त सांडायला लागल्यानंतर आजूबाजूचे कार्यकर्ते चवताळले. त्यांनी दगड हातात घेण्यास सुरुवात केली. आदितीने जखमी अवस्थेत त्यांना सांगितले की, तुम्हाला तुमच्या आदिती ताईची शपथ आहे. एकानेही दगडफेक करायची नाही. आपले आंदोलन अहिंसेने झाले पाहिजे.

इकडे आशिष आणि त्याचे कार्यकर्ते जिंकल्याच्या आनंदात होते. आपण यांना आंदोलन मागे घ्यायला भाग पाडू, असा आशिषला विश्वास वाटू लागला. गर्दीतील एका कार्यकर्त्याने आदिती पाटील हम तुम्हारे साथ है,  असा हातात फलक घेत घोषणा चालू केल्या. यावेळी आशिषला दोन गोष्टींचा धक्का बसला. त्या आंदोलकांना दगडांची  भीती वाटत नव्हती.  दुसरे म्हणजे सर्वात धक्क्याची गोष्टी म्हणजे आदिती पाटील या नावाची!


११ वी विज्ञान शाखेत आल्यापासून सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगणारी आदिती त्याला आठवली. पण ही आदिती तर कोणत्यातरी सामाजिक संघटनेची कार्यकर्ती दिसत होती. माणूस वयाने व पदाने कितीही मोठा झाला तरी त्याला जुन्या आठवणी व प्रिय माणसे एक अदृश्य शक्तीने बांधून टाकतात.  लहान मुलाने धाव घ्यावी तशी त्याने आदितीच्या दिशेने धाव घेतली. एका झाडाच्या बुंध्याखाली डोके गच्च धरून ती  बसली होती. चेहऱ्यावर वेदना होत्या. पण संघर्षाचे तेज चेह-यावर दिसत होते. जवळपास १५ वर्षानंतर ते दोघे समोरासमोर भेटत होते.

आशिषचे केस विरळ झाले असली तरी लांबसडक नाक ही त्याची ओळख होती. तर आदितीचे मोठे डोळे पाडून दाक्षिणात्य अभिनेत्रीसारखा तिचा लूक वाटत होता. पण नजर एकमेकांना भीडली. तर दोघांनाही एकमेकांची ओळख पटली. खरेच डोळ्यांची भाषा आणि कधीच विसरणारी नसते.
आशिष- तू
आदिती-  तू
आशिष - अरे हा, प्रश्न
आदिती - हो, हा  प्रश्न जावू दे. काय आंदोलन करतोस तू हे...
आशिष ० सॉरी तुझ्या डोक्याला दगड लागला आहे. माझे फॅमिली डॉक्टर जवळच राहतात. तुझ्यावर मलमपट्टी करू.
आदिती-मलमपट्टी माझ्या डोक्याला नाही, सरकारच्या डोक्याला करायची आहे. ती रागाने म्हणाली.
आशिष- हे बघ, तुझ्यासारखेची मुलीने स्वत:ची काळजी घ्यायला हवी.
आदिती - आशिष, अरे पण दगडफेक तुझ्याच बाजूने झाली. तू काय करतोस तिथे तुझ्यासारखा सुसंस्कृत मुलगा अशा गावगुंडात कसा मिसळला. हेच कळत नाही.

आदितीचे ते शब्द ऐकून आशिष जागेवरच थबकला. त्याला आठवले, देश व धर्माचे गोडवे गाताना कधी कट्टरवादी लोकांकडे वळलो, हेच कळाले नाही. दुसऱ्या धर्माच्या कट्टरवादाकडे नाव ठेवता ठेवता आपणही तसचे झालो आहोत, याची पुसटशी जाणीव झाली.  कंत्राटदार म्हणून सरकारी कामे मिळविताना त्याने
पक्षाची कामे सुरू केली.
 आदिती  - काय विचार करतोस तू? मला वाटतं तुझे वक्तृत्व गुण पाहून त्यांनी तुला बोलाविले असेल येथे.
आशिष- मी आता या पक्षाचे  काम करते आहे अन् तू?
आदिती - मी जस ठरवले, तशी सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले. पण आठवत का, तुला? भारतीय लोकशाही जगात श्रेष्ठ या विषयावर केलेले तुझे भाषण.. आज सॉफ्टवेअर अभियंता म्हणून असले तरी भारतीय आहे. तुझे भाषण आजही जसेच्या तसे आठवते.

आशिष वरमला. तो बदलला पण आदिती आजही तशीच होती.
आदितीने हातात स्मार्टफोन घेतला. तिच्या लोकशाहीवरच्या पोस्टवरील अपडेट कमेंट ती वाचत होती. त्याखाली आशिषने शिव्यांची लाखोली वाहिलेली होती. ते पाहून आदितीला धक्काच बसला.

आदिती- आशिष हे बघ, माणूस हा पहिल्यांदा भारतीय असतो. सोशल मीडियावरून त्याबाबत मत बनवू नये. तुला शंका आहे का माझ्या देशभक्तीबद्दल?
आशिषला काय बोलावे हे सूचेना. घामाने डबडबलेला चेहरा त्याने रुमालाने पुसला. भलीमोठी वेगाने होणारी बांधकामे झरझर वेगाने कुणीतरी दोघांमध्ये निर्माण करत असल्यासारखा त्याला भास झाला.
त्या प्रचंड इमारतीच्या ओझ्याखाली दबतोय, अशा भावनेने त्याला तिथे थांबणे शक्य होत नव्हते. एका
कार्यकर्त्याने त्याला कानात हळूच सांगितले, केंद्रीय मंत्र्यांचा उद्या मतदारसंघात दौरा आहे. त्यामुळे उद्या कार्यक्रमासाठी माणसे वेगाने गोळा करावी लागणार होती.
आशिषने नमस्कार करत तिचा निरोप घेतला. माणसांचे प्रोग्रॅमिंग करता येत नाही. पण चांगली नाती ही पुलासारखी आयुष्याचा प्रवाह अखंड धरून ठेवतात. आदिती बदलेल्या आशिषला जाताना पाहून विचार करत होती, माणसांचे प्रोग्रॅमिंग एवढे किचकट कोण करते आहे, हा तिला प्रश्न सतावत होता. एखादा मालवेअर माणसाच्या मेंदूत शिरल्यासारख्या आशिषला पाहून ही भेट झालीच नसती तर बरेच झालेच असते, असे तिला वाटू लागले.

Friday, July 5, 2019

केंद्रिय अर्थसंकल्प काय घडणार

आलिशान कार उत्पादकांसह सोने आयात करणार्या व्यापार्यांनी व सर्वच क्षेत्रातून कर सवलतीची मागणी होत आहे. दुसरीकडे वित्तीय तूट वाढत असल्याने अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव निर्माण होत आहे. अशावेळी सरकारी खर्च कमी करणे तर सर्वच क्षेत्रांवर निर्यातवाढीची जबाबदारी येते.

प्रत्यक्षात देशातील मोठी बाजारपेठ आपल्या उद्योगांना सहज उपलब्ध असल्याने त्यांना निर्यातीची भूक नाही.
कर सवलती देवू, पण आधी निर्यात वाढवा असे धोरण राबविण्याचे धाडस अर्थसंकल्प दाखवणार का?
उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष सुरजित भल्रा यांनी निर्यात वाढीसह विदेशी गुंतवणुकीच्या नियमात सुलभता आणण्याचे उपाय सुचविले आहेत. या उपायांची सरकारने अमंलबजावणी करावी, अशी शिफारस आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आली आहे.

तंबाखूसह इतर उत्पादनांवर सिन टॅक्स लावण्यात येतो. देशातील तंबाखू ही उच्च दर्जाची आहे. चीनमधून मागणी असून ही बाजारपेठ खुली होण्यासाठी केंद्रिय वाणिज्य मंत्रालय प्रयत्न करत आहे. त्यामुळे तंबाखू निर्यातीला प्रोत्साहन देणारी घोषणा होवू शकते.
जीएसटी परिषदेकडे वस्तू व सेवा करात बदलण्याचे अधिकार आहेत.

केंद्रिय अर्थसंकल्पात निर्यात वाढीला प्रोत्साहन देणा-या विविध योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. सूक्ष्मजलसिंचनावर वाढीव अनुदान

Tuesday, May 21, 2019

नथूराम हे तर निमित्त आहे,खरा उद्देश्य वेगळाच

नथुरामची बाजू घेताना इतिहासाचा आणि मुख्य म्हणजे त्या काळातील राजकारणाचा विचार करायला हवा.
1) इंग्रजाचे फोडा आणि राज्य करा असे धोरण होते. त्यानुसार इंग्रजांनी जात-धर्मातील भेदभाव वाढतील असे धोरण राबवून स्वातंत्र्यासाठी एकी होवू दिली नव्हती.
2) महात्मा गांधींच्या युगात मुस्लिमांनी स्वातंत्र्य चळवळीतील हिरिरीने भाग घेतला. त्यांच्या नेतृत्वाने सर्व समाज व देशाला एकसंघ केले.
3) जसजसे स्वातंत्र्य दृष्टीपथात येवू लागले. तसे बॅ.अली जीना यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली . याला सुरुवातीपासून महात्मा गांधींचा विरोध होता.
4)नेमस्तपणाने मागण्या मान्य होत नाहीत, हे लक्षात आल्यावर जीनांनी आपल्या अनुयायांना आक्रमक होण्याचे आदेश दिले.
5) त्याचा परिणाम म्हणून बंगालसारख्या राज्यात दंगली भडकाविण्यात आल्या. दोन्ही समाजातील दंगली केवळ पाकिस्तानच्या निर्मितीनंतर थांबवू शकतात, हे जीनांनी चित्र तयार केले.
6) तेव्हाचे गव्हर्नर यांनीही पाकिस्तान निर्मितीला मंजुरी दिली होती. पेटलेला देश पाहून गांधींनी पाकिस्तान होण्याला परवानगी दिली.
7) गोपाळ  गोडसेंचे 55 कोटींचे बळी हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना भ्रमित करण्यासाठी पुरेसे आहे. भारताने पाकिस्तानला करारानुसार 55 कोटी देणे भाग होते. स्वतंत्र भारताचा हा पहिला करार देशाने पाळला नाहीतर जगात प्रतिष्ठा राहणार नाही, अशी गांधीजींची भूमिका होती. पाकिस्तानबरोबर भारताची युद्धे झाली. तरीही भारताने कित्येकवर्ष पाकला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा दिला होता. तेही कोट्यवधींचे नुकसान सहन  करुन!

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....