Friday, September 16, 2016

Ashtapailu Magzine- दिवाळी अंक

Ashtapilu-Sarjanshil,paripurntekade......


अष्टपैलू या  नाविन्यपुर्ण व वैशिष्टपुर्ण ठरणा-या दिवाळी अंकाविषयी..
उत्तम संवाद हा कोणत्याही कंपनीला, संस्थेला, व्यवसायाला मजबूत करतो. या प्रयत्नांची संजीवनी म्हणजे दिपावलीच्या आनंदमय प्रसंगी होणारे अष्टपैलू हे मासिक !
‘वर्तमानात  आधीपेक्षा अधिक जोमाने एका मोठ्या चित्राला दुसऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने, लवकर व उत्तम प्रकारे प्रसारित करण्याची गरज आहे’.
कार्यातील सजीवता, संपर्क, आणि उर्जेचा एक भाव  असतो त्यामुळेच यशाची उत्तुंग भरारी आपण घेत असतो.
ही गरज ओळखून विविध क्षेत्रातील प्रसिध्द यशस्वी व्यक्तींच्या
मुलाखती प्रसिध्द करणार आहोत.  उद्योजकता, व्यवस्थापन, बुध्दीमत्ता अशा विषयाचा भरगच्च मजकूर असणारा 'अष्टपैलू'  दिवाळी अंक साधारणतः १ ऑक्टोबरला प्रसिध्द केला जाणार आहे. हा बौध्दीक मेजवानीचा अंक महाराष्ट्रभर हजारो चोखंदळ वाचकापर्यंत  पोहोचणार आहे.  देश-विदेशातील वाचकासाठी या अंकाची हार्डकॉपीबरोबर ई- आवृत्ती  उपलबध करून दिली जाणार आहे.
दिपावली हा सण  निराशा, अंधार दूर करून प्रकाशाने आयुष्य तेजोमय करणारा  आहे.  अष्टपैलू मासिक परिवाराकडून आपल्याला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!


जाहीराती व इतर माहितीसाठी संपर्कः
संपादक                                                     
डॉ.डी.एस.अंबेकर             श्रीकांत पवार
8380981100                   
पत्रकारीता (पीएचडी)      वृत्तपत्र व जनसंज्ञापन पदवी 


ऑफीस- निर्मल हाईटस, तिसरा मजला ए विंग, ४०५, नंदी स्टॉप, औसा रोड लातूर

Thursday, June 16, 2016

उडता पंजाब... Udata Panjab

उडता पंजाब...
सामाजिक प्रश्नाला हात घालीत मनोरंजनाची फोडणी टाकून वास्तवाचे चटके देणारे चित्रपट काढणे ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची आजपर्यंतची खासियत राहिलेली आहे. उडता पंजाबवर सेन्सॉरबोर्डाच्या वादग्रस्त निर्णयामुळे  वाद निर्माण झाला.
पण यामुळे खरेतर चित्रपटाचा मुळविषय दुर्लक्षित राहू शकतो. म्हणुन याविषयी थोडेसे  ....
देशाच्या विकासात विशेषतः सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी व सैनिकामध्ये पंजाबमधील तरूण सर्वाधिक संख्येत सहभागी होतात. याशिवाय ख-या अर्थाने पंजाब म्हणजे भारताचे बलदंड बाहूच आहेत. अशा परिस्थितीत एकाकी पंजाब व हरियाणा या राज्यामध्ये ड्र्ग्जमध्ये तरूणाई स्वतःचा नाश करू लागलेली आहे.  हे कसे घडले ?

प्रथम लक्षात घ्यावे लागेल, पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेशी लागून असलेले राज्य असून पंजाबमधील आएएसआएने नेहमीच खलिस्तानसारख्या विषाला खतपाणी घालण्याचे काम केलेले आहे. याच आयएसएने दाऊदशी हातमिळवणी करून त्याचे नेटवर्क वापरून भारतात अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या आहेत. भारताचे सामर्थ्य लक्षात घेता पाकिस्तान सरळ सरळ लढण्यापेक्षा तरूणाईला पोखरून काढण्यासाठी पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्ज माफियांनी चांगलेच हात पसरविले आहेत. जिथे अमाप  पैसा तिथे राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही  सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्जचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. याकडे स्थानिक राजकीय पक्षाचे  दोन्ही राष्ट्रीय पक्षाने सत्तेसाठी लाड केलेले आहेत. यामुळे नाशाकडे जाणारी तरूणाई स्वतःचे आयुष्य कापरासारखे उडवत आहेत, पर्यायाने उडता पंजाबचे भविष्यही अंधातरीच राहिलेले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत तर कधी पदमश्री , साहित्यिक पुरस्कार किंवा मंडळ, समित्यावर नियुक्ती देवून विषय झाकण्याचे दिवस आता सरलेत. कारण तरूणाईलाही उडत्या पंजाबाची चांगलीच कळू लागली आहे. असे चित्रपट येतात तेव्हा समाधान वाटते. कोणीतरी जिवंत आहे बॉलीवूडमध्ये ज्याला तरूणाईची भाषा कळते व समाजाचे प्रश्न आहे. दिगदर्शक अनुराग कश्यप यांच्या बंडखोरीला सलाम......

Sunday, May 8, 2016

विदर्भातील तेलंगणाच्या प्रकल्पाविषयी राज्यपालांचे व विदर्भवाद्यांचे मौन का ?

 तुमचे घर-शेतजमीन अचानकपणे प्रकल्पामध्ये जाण्याचे नियोजन चालू आहे अन त्याची कोणतीही सूचना तुम्हालाही नाही. तर तुमची काय प्रतिक्रिया असेल...पण जरा थांबा.... असा प्रकल्प शेजारील राज्यसरकार तुमच्या घरादाराला बुडवून करत असताना आपले सरकार गप्पच आहे... तर काय म्हणाव ...असाच अनुभव विदर्भातील २१ गावे घेत आहेत. त्यांचा आवाजही दबलेला आहे.   त्यांच्या दुःखाला आता सरकारही वाली राहिला असता तर अशी वेळ आली असती का ?अशावेळेस केक कापून महाराष्ट्राचे तुकडे करणारे मान्यवर कुठे गेले आहेत, हेच विदर्भातील जनतेला कळत नाही.वेगळ विदर्भ असावा अशी मागणी करणारे   विदर्भवादीनेत्यांनी महाराष्ट्राविषयी नाही किमान विदर्भाच्याहिताबाबत जागरूक असायला हवे. पण तसे होत नाही. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे विदर्भातील सुमारे २१ गावे तेलंगणाच्या दडपशाहीच्या प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार आहेत,  तरीही मौन बाळगणे. भरीस भर म्हणजे याप्रकरणात भाजपचेच असलेले राज्यपाल विद्यसागर हे तेलंगणाबाबत अधिक करूणासागर बनून असल्यामुळे मंत्रालयातही दबाव आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तेलंगणचे रहिवासी असलेले राज्यपाल सी विद्यासागर यांनी तेलंगणात पाणी मिळवून देण्याचे  हैद्राबादेत आश्वासन दिले होते. मूळात राज्यपाल असताना कोणत्या आधारावर हे आश्वासन देण्यात आले होते, हा प्रश्न पडतो. कारण राज्याचे राज्यपाल त्या राज्यालाच किमान न्याय्य ठरेल अशी भूमिका आपले मुळ राज्य व कार्यक्षेत्राचे राज्य यामध्ये घेणे उचीत आहे.  महाराष्ट्रीय जनतेने कधी आढेवेढे घेतले नाहीत याचा अर्थ ' दिली ओसरी, घरभर हात-पाय पसरी' असाच प्रकार होत आहे असे म्हणले तरी वावगे ठरू नये.गोदावरी लवादानूसार गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाण्यावर तेलंगणाचा हक्क आहे. त्याचा आधार घेत सीमावर्ती भागात अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. दोन राज्यांनी आंतरराज्यीय प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी मंडळ स्थापन केले आहे. तेलंगणा मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मेडीगट्टा प्रकल्पाचे भूमिपुजन केले आहे. व त्यासाठी ८०० कोटींचा निधी जाहीर केला. या प्तकल्पामुळे गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील २१ गावे विस्थापीत होणार आहेत. या प्रकरणी राज्य शासन व सर्वपक्षीय नेत्यांनी ठोस भूमिका न घेतल्याने भविष्याच्या कल्पनेने धास्ती निर्माण झाली आहे.  राज्यपालांनी त्यांच्याबद्दल निर्माण झालेली अस्पष्टता दुर करणे आवश्यक  आहे.  महाराष्ट्राचे तुकडे करणारे असो की महाराष्ट्रप्रेमी अशा सर्वांनी एकत्र न येणे ही खटकणारी बाब आहे.या प्रकरणी काय करायला हवे.१) केंद्राकडे याबाबत तक्रार करून तेलंगणा प्रकल्पाबाबत कठोर बंधने घालून द्यावी.२) तेलंगणाने असे प्रकल्प करू नये यासाठी स्वतंत्र देखरेख ठेवणारी , अथवा त्याबाबत अपडेट ठेवणारी माहितीयंत्रणा जलसिंचन खात्यात असावी.३) राज्य हित पूर्ण करताना कालबाह्य संकुचीत पक्षीय धोरणे, प्रशासकीय आडमुठेपणा, सुस्त कारभार होत असेल तर पिढ्यानपिढ्या लाखो नागरिकांना अब्जावधी कोटींचा फटका बसणार आहे. याची जबाबदारी कोण घेणार ?  काही दुखणी असतात की ती झाली की माणुस तब्येतीकडे जास्तीचे लक्ष देवू लागतो. आता असे समजायला हरकत नाही. एकसंध महाराष्ट्र व्हायला अजून किती दिवस लागतात यावरच तेलगंणासारखी अजून रांगणारी राज्ये काळजावर घाव घालण्याचे प्रमाण ठरवतील. 

Wednesday, April 20, 2016

शनिशिंगणापुर नंतर पुढे काय ?

शनिशिंगणापुर नंतर पुढे काय ? भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन करून शनिशिंगणापुरच्या चौथ-यावर महिलासाठी प्रवेश मिळवून दिला ही स्वागतार्हबाब आहे. परंतू धार्मिक परंपरा बदलत असताना विनम्रतेचा अवलंब झाला असता तर अधिक सकारात्मकतेचे दर्शन सर्वसामान्यांना झाले असते. परंतू यानिमित्ताने धर्मप्रेमी म्हणवणारे परंतू उग्रविचारांच्या लोकांना उगीचच आयते कोलीत देवून काय साध्य झाले कुणास ठाऊक . एक गोष्ट मात्र खरी असे बदल आता मुस्लीम, ख्रिश्चन , जैन अशा सर्वच धर्मात झाले तर या आंदोलनाचा खरा फायदा सर्व समाजाला होवू शकतो. नेहमीच सर्वसामान्यांची धुळफेक करणारे राजकीय नेते, तर केवळ दलालातीत मग्न असणारे धर्मपंडीत यांनी शनिमंदिराच्या आंदोलनाच्यावेळी ठामपणे भुमिका न घेतल्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले आहे. यापुढील काळात सर्वसामान्य लोकांनी धर्म सुधारणेचे बदल आपणहून स्वीकारणे इष्ट राहणार आहे. अन्यथा धर्म ही मुदत संपलेले औषध होईल व ते फेकुन देण्याची वेळ येईल. मुस्लिम धर्मातील शरीयत कायद्यामुळे महिलांना पोटगी मिळणे सुध्दा कठीण होते. केवळ तलाक तलाक मिळाल्याने फोनवरही घटस्फोट देता येत असेल तर लग्न आहे हा की पोरखेळ ? कदाचीत जुन्या जमान्यात तेव्हा विचार योग्य असतील परंतु काळाप्रमाणे बदल न केल्यास आपले अमानवी आयुष्य त्या श्रेष्ठ निर्मिकाला तर स्वीकार होईल का?

Sunday, January 24, 2016

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचे गुढ उकलले पण..

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचे गुढ उकलले पण... नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे इतिहाससंशोधकांना नेताजींच्या अंतिम दिनांसंदर्भातील गुढ उकलण्यास सहाय्य होईल अशी आशा आहे. नेताजींसदर्भात उपलब्ध असलेला समग्र सरकारी दस्तावेज डिजिटल स्वरुपात संग्रहित करण्यात आला आहे. हा दस्तावेज खुला करावा अशी मागणी नेताजींचे वारस तसेच सर्वसामान्य भारतीय अनेक काळापासून करत होते. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला नेताजींच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी आपल्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला असण्याची पूर्ण शक्यता आहे; परंतु आणखी काही पुरावे समोर आल्यास आपण खुल्या मनाने हे स्वीकारण्यास तयार आहोत,अशी भावना व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नेताजींशी संबंधित या फाईल्स सार्वजनिक झाल्याने आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता नाही. याऐवजी भारत सरकारने जपान सरकारच्या मदतीने रिनकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी करून घ्यावी म्हणजे या संपूर्ण वादावर पडदा पडेल. १९९७ साली अभिलेखागाराला आझाद हिंद सेनेशी संबंधित ९९० फाईल्स संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये गृहमंत्रालयाने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या खोसला आयोगाच्या १०३० फाईल्स व दस्तावेज तसेच मुखर्जी आयोगाच्या ७५० फाईल्स आणि दस्तावेज सोपविले होते. हे दस्तावेज यापूर्वीच जाहीर झाले आहेत.फाईल्स सार्वजनिक करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर गृह आणि विदेश मंत्रालयानेही त्यांच्याजवळील फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू करून त्या अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या. सुरुवातीला १०० फाईल्स सार्वजनिक करण्यात येणार असून त्यांचे डिजिटलीकरण केले आहे. या फाईल्स चांगल्या पद्धतीने सांभाळण्यात आल्या असून अभिलेखागाराने दर महिन्याला २५ फाईल्सच्या डिजिटल प्रती लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सुभाषचंद्र बोस यांचा मॄत्यु झाला असताना सरकारने याबाबबतची कागदपत्रे आजपर्यंत खुली का केली नव्हती? सुभाषचंद्र बोस हे जर्मनी व रशिया या देशातील राष्ट्रप्रमुखांची भारत स्वतंत्र होण्यासाठी मदत घेत असल्यामुळेच नेहरूंनी जाणिवपुर्वक बोस यांचे कार्य अडगळीत टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक गुमनामीबाबा हेच सुभाषचंद्र बोस आहेत अशी चर्चा सुरू झाल्यापासून सरकारची बदनामी झाली होती. स्वतः महात्मा गांधी यांनी जवाहरलाल नेहरूपेक्षा बोस यांना पंतप्रधान म्हणुन संधी दिली असती तर पाकिस्तानसारखे देशाला लागलेले दुखणे कदाचीत पहायला मिळले नसते. तसेच अत्यंत बुध्दीमान आणि त्यागी जीवन असणा-या सुभाषचंद्र बोस हे पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र बरेचसे पालटले असते असा सर्वसाधारणपणे अंदाज केला जातो. जरी ते पंतप्रधान मिळवू शकले नाहीत तरी सर्वसामान्य जनतेच्या ह्रदयात कायम विराजमान आहेत. सत्याग्रह आणि क्रांती या स्वांत्र्यप्राप्तीच्या दोन मार्गात बोस यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला . पण राजकारणामुळे क्रांतीचा मार्ग आणि त्यासाठी लढणारे वीर यांना कायमच दुय्यम लेखले गेले आहे. सुभाषबाबू अश्या हजारो क्रांतीकारकांचे मुकुटमणीच !

Sunday, January 10, 2016

दहशतवादाला अंतीम उत्तर काय असू शकते ?

लव्ह सिटी पॅरीसवर इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर एका नागरिकाची पत्नी मरण पावली. या घटनेनंतर त्या नागरिकांनी आपल्या मुलांचे संगोपन आणि दिनचर्या दुस-या दिवसापासून जशी होती तशीच चालू ठेवली आणि अतिरेक्यांना प्रसिध्दीमाध्यमातून संदेश दिला. तुम्ही माझी प्रिय व्यक्ती हिरावून घेतली. पण माझा तुमच्यावर राग नाही. आजही माझे आयुष्य तुमच्या धाकात नाहीतर माझ्या मर्जीने चालू आहे. स्वातंत्र्य , समता , बंधुत्वाचा जगाला संदेश देणारा फ्रान्स देश किती प्रखर देशभक्त आणि सशक्त आहे हे याचे बोलके उदाहरण होय. नुकताच पठाणकोट येथील हल्ल्यात निष्पाप नागरिक मरण पावले आहेत. भारतात केवळ पाच-सहा अतिरेकी येतात आणि देशाच्या लोकशाही आणि धर्माच्या नावाखाली एकतेलाच सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र मानवतेला कलंक लावणारे आहे. मुळात पाकिस्तानबरोबर सलोख्याचे संबंध तयार होताना अतिरेक्यांना भारतात हल्ले करण्याचा चेव येण्यामागे मानसशास्त्र काय आहे? कुणीही काहीही म्हणो दहशतवाद हे प्रथम लोकमानसिकतेच्या आधारावरच जास्त खेळले जाते. त्याचे असे आहे की सर्वसामान्यांच्या भावनांना धक्का बसला आणि अस्थिरता, अनिश्चितता निर्माण झाली की दहशतवाद्यांची मोहीम फत्ते होते. जागतीक पातळीवर असणा-या इसिसने भारताविरूध्दही युध्द पुकारले आहे. सगळेच देश दहशतवादाने होरपळून निघत असताना दहशतवादाला अंतीम उत्तर म्हणजे त्यांच्या भीतीला कसलीच भीक न घालणे. हिंदु-मुस्लीममध्ये दरी निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. दुसरे म्हणजे कधीही आम्ही कुठेही हल्ले करू शकतो हे दाखवून त्यांना आपले सामर्थ्य असल्याचा भ्रम तयार होतो. सध्या इसिसपाठीमागे कोणता देश कोणता विचार आहे यापेक्षा कोणत्या परिस्थितीतून हा दहशतवाद जन्माला आलाय याचा विचार केला तर इसिस काय हे कळू शकते. तेल इंधनच्या विहिरी आणि युरोपीराष्ट्रांचे युध्द आसुरी महत्वांकाक्षा आणि धर्माचा बुरखा घातला तर कुत्र्याचाही वाघ होतो हे इसिसने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. १) दहशतवादी तयार होतात. यामागे त्यांचा ब्रेनवॉश केला जातो. अशा पध्दतीचा अभ्यास करून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केला पाहिजे. २) दहशतवाद हा मुस्लीमविरोधी असून त्याला समर्थन देणा-या विद्वान मौलाना, मुस्लीम विचारवंत आणि सुधारणावादी विचारवंत, महिला यांना प्रोत्साहन द्यायला हवे. ३) दहशतवादाचे तरूणामध्ये आकर्षण असून यामुळे आयुष्य कसे उध्दवस्त होते हे युवकापर्यंत थेट पोहोचवायला हवे. ४) जे युवक अत्यंत क्रियाशील परंतू भावुक आहेत त्यांचा ओढा दहशतवादाकडे असू शकतो अशा सुशिक्षीत तरूणांची शक्ती नवनिर्मीतीकडे वळवायला हवी. उदाहरणार्थ मुस्लीमबांधवात गरीबीमुळे अनेकांना उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यांना शिकविण्यासाठी असे युवक चांगले योगदान देवू शकतात. ५) समाजात गुन्हेगारी कडे वळलेला, गरीबीमुळे त्रस्त असा युवकवर्गाला दहशतवाद हे सोपे कमविण्याचे साधन वाटू शकते, अशी वेळच येवू नये म्हणुन शासनाने त्यांना सक्तिने स्वच्छता व तत्सम सेवेस लावून अन्न, वस्त्र द्यायला हवे. दहशतवादाचा सामान्यावर कसलाच परिणाम होवू न देणे हेच अंतीम उदाहरण आहे.

Saturday, January 2, 2016

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते. पण मला काही मानू या हॉ गोष्ट समजलीच नाही. मी याबद्दल गणिताच्या त्या आदर्श ( ?) शिक्षकांना का मानायचे असा प्रश्न नम्रपणे विचारला. पण सरांचा इगो भलताच दुखावला आणि त्यांनी पाणउतारा केला. खरेतर गणीताचा विषय आवडीचा आहे. पण गणीतासारखा विषय मानू या समजू या पध्दतीने शिकावा लागत असेल तर त्यासारखे दुर्दैव विद्यार्थ्यांचे नाही. बुध्दी गहाण ठेवून का शिकावे एखादी गोष्ट का शिकत आहोत , त्याचा उपयोग कुठे होणार आहे याची माहिती कधीच दिली जात नाही. परिक्षेत पास होण्यासाठी व अधिक मार्क्स मिळविण्यासाठी परिक्षेचे तंत्र शिकूनच घ्यावे लागते. सध्याची शिक्षणपध्दतीमधून किती पॅकेज घेणारे युवक व रोजगार निर्माण होतात हीच गोष्ट समाज, पालक व विद्यार्थ्यासाठी महत्वाची आहे. या गोष्टींनाही महत्व आहे. पण विद्यार्थ्यामध्ये असणारी नैसर्गीक बुध्दीमत्ता मारून टाकणारी शिक्षणपध्दत पाहिली की मेकॉलेने रचलेली ही शिक्षणव्यवस्था किती विषारी आहे हे समजते. उदाहरणार्थ मला लिहण्याची आवड असून या शिक्षणव्यवस्थेने सुरूवातीपासूनच संधी दिली असती तर तळमळीने योग्य क्षेत्र निवडले असते. इच्छा असूनही तुम्हाला शिकता येत नाही व इच्छा असूनही शिकता येत नाही ही शिक्षणपध्दती मेकॉलेची ! भारतीय नागरीक लॉर्ड मेकॉलेने केवळ इंग्रजांची राजवट मजबूत करण्यासाठी केवळ क्लार्क तयार व्हावेत यासाठी जी शिक्षणपध्दत राबविली ती म्हणजे मेकॉले शिक्षणपध्दती. आजही आपण त्याच मेकॉले शिक्षणव्यवस्थेने शिक्षण घेतो. यामध्ये केवळ पाठांतर आणि त्यावर आधारीत परिक्षा यावरच भर असतो. मेकॉले शिक्षणपध्दतीचा सर्वाधिक फटका अत्यंत हूशार विद्यार्थ्यांना अधिक बसतो. बुध्दीमत्तेचे आठप्रकार आहेत. या शिक्षणपध्दतीत उद्योजकता, नेतृत्वगुण, देशप्रेम, आवड्त्या विषयाचे सखोल ज्ञान घेण्याची बालपणापासून मुभा या गोष्टींना का टाळले आहे ? मेकॉले ही शिक्षणपध्दती आजच्या काळात केवळ धनाढ्य उद्योजक, बडे नेते, राजकीय पक्ष यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण मेंढरासारखी केवळ एकमेकांचे अनुकरण करणारी व बुध्दी गहाण ठेवणारे युवावर्ग त्यांना हवाहवासा आहे. पिढ्यानपिढ्या बुध्दीगहाण ठेवून अशास्त्रीय पध्दतीने घेत असलेले शिक्षण म्हणजे ओझे वाहणे आहे. मेकॉलेची शिक्षणपध्दती किती दिवस समाजाने पचवायची हा प्रश्न खुप गंभीर आहे.

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....