Saturday, December 15, 2018

राफेलबाबत गोंधळ किती खरा किती खोटा?

राफेलचे प्रकरणाबाबत काँग्रेसने राळ उडविली तेव्हाच बरेचसे चित्र स्पष्ट झाले होते. सत्ताधारींना राफेल हा फक्त पारदर्शकतेचा विषय देशहिताआड झाकायचा होता. सर्वोच्च न्यायालयाने हीच बाजू मानल्याचे चित्र आहे. सरकारने लोकपाल समितीकडे राफेल करार आणलाच नाही या आरोपाने राफेल खटल्याला वेगळे वळण लागल्याच चित्र आहे.

दुसरीकडे याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने राफेलवर संशयाचे ढग निर्माण झालेत. काँग्रेसने संसदीय चौकशीची मागणी केल्याने राफेलच वादळ पुन्हा घोंगावणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे. मात्र राफेलच्या वादाने काही मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत.

1)  सरकार लोकलेखा समितीसारख्या घटनात्मक बाबींचा आदर का करत नाही?
2) प्रत्येक घोटाळ्यात रिलायन्सचे नाव का येते?
3) देशहित आणि पारदर्शकता यांचा सरकार मेळ का घालू शकत नाही?
4) सर्वोच्च न्यायालय संरक्षण कराराचे परीक्षण करण्यास असमर्थ असेल तर स्वतंत्र संरक्षण न्यायालय का असू नये?

राफेलची दिशा ही आगामी निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्याचबरोबर देशाच्या सरंक्षणासाठी महत्त्वाचा आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण भारताकडे पुरेसे लढाऊ विमाने नाहीत.

Friday, December 14, 2018

आरबीआयची लिटमस परीक्षा

आरबीआय आणि सरकारमधील वाद धुमसता धुमसता गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खुर्चीखाली जाळ काढत होता. याची धग पटेलांना बसली नसती तर नवल! शेवटी किती भाजून निघायचे हा विचार करत त्यांनी राजीनामा पसंत केले. पण हा वाद होण्याचे कारण काय हे जाणून घेतले तर आपल्याला समजेल सत्ताधार्यांच नाणं किती खणखणतय? वादाचे काही मुद्दे
1) एनपीए वाढलेल्या सरकारी बँकावर आरबीआयने लादलेले नियम
सरकारची बाजू - आरबीआयने नियम शिथील करावेत. कारण अर्थव्यस्थेत पुरेसा कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे.
आरबीआयची बाजू- बँकांवरील वाढत्या एनपीएचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे.
2) आरबीआयकडील राखीव भांडवल असलेले 3.6 लाख कोटी सरकारला हवेत.
सरकारची बाजू- आरबीआयकडे किती राखीव भांडवल असावा याबाबत कमिटीने अहवाल द्यावा. जास्त असलेला निधी सरकारकडे द्यावा.
आरबीआयची बाजू - राखीव भांडवल हे चलनाच्या स्थिरतेसाठी आवश्यक आहे.
नुकताच निवृत्त झालेले डेप्युटी गव्हर्नर विराल आचार्य यांनी सरकार व आरबीआय संबंधावर केलेली टीका पुरेशी बोलकी आहे. ते म्हणाले
राजकीय नेत्यांना म्हणजे सरकारला टी-20 प्रमाणे निर्णय घेतयं. तर आरबीआय ही कसोटी सामन्यासारखे निर्णय घेत.
नवीन गव्हर्नर हे अर्थतज्ज्ञ नाहीत. त्यांच्याकडे ईतिहासाची पदव्युत्तर पदवी आहे. तरीही त्यांच्यावर सरकारची मेहेरबानी बरंच सांगून जाते.

Monday, August 13, 2018

आरक्षण नव्हे समाजाची शस्त्रक्रिया

मराठा आरक्षणावरून ५६ आंदोलने झाल्यानंतरच खरेतर राज्य सरकारला समाजातील अस्वथता समजायला हवी होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही आंदोलने शांततेने पार पडली यातच केवळ धन्यता मानली. सरसकट मराठा समाज सुबत्तेत असल्याचा समज करून देण्यात येत आहे. मराठवाड्यातील मराठ्यांची काय परिस्थिती आहे? दुष्काळामुळे जगता येईना, आरक्षणामुळे शिकता येईना असा शेतकर्यांच्या मुलासमोर प्रश्न आहे.

विकासाच्या संधी हव्यात
विकासाच्या संधी हिरावून घेतल्याचे खरेतर दुखणे सर्वच समाजासमोर आहे. आरक्षणाच्या मागणीकडे एका समाजाचा प्रश्न म्हणून पाहू नये. विकास करण्यात आपले राज्यकर्ते मागे पडले आहेत. प्रशासनातही खूप गतीची गरज आहे.

जातीची एकी  प्रश्न सोडविण्यासाठी
कोणतीही जात असो त्यांच्यात एकी असायलाच हवी. या एकीचा वापर दुसर्यांना कमी लेखण्यासाठी करायची मुळीच आवश्यकता नाही. पण तसच घडते. जातीच्या संघटना नेहमी दुसर्या जातीबद्द्ल द्वेष करतात. त्यांचा  संघर्ष जातीमधील गरिबी, बेरोजगारी विरोधात का असू नये. पण त्याबाबत जातीच्या संघटना का लढत नाहीत.

Saturday, August 11, 2018

सनातन आणि संमोहन

ज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने न केल्यास किती विपरीत घडू शकते याचे चांगले उदाहरण म्हणजे सनातन संस्था. या संघटनेचे मालक संमोहनतज्ज्ञ आहेत. संमोहनाचा वापर व्यक्तीमत्व विकासासाठी होऊ शकतो, हे जगजाहीर आहे. याचा वापर केल्यास माणूस प्रेरीत होऊन अवघडातील अवघड कामे  आत्मविश्वासाने करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सनातनमध्ये संमोहनातून घातक रसायनाचा माणूस घडविण्याचे काम होत आल्याचे दिसून आले आहे. कसे होते हे काम? मुस्लिम दहशतवाद्यांचे जसे ब्रेनवाॕश केले जाते, तसेच ब्रेनवाॕश सनातनमध्ये केले जाते. कधी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे कोण ठरविणार? जर  आपला मेंदू दुसरा नियंत्रित करणार असेल तर त्यासारखा दुर्बलपणा नाही. स्वामी विवेकानंद यांनी सामर्थ्य हेच जीवन तर दुर्बलता म्हणजे मृत्यू म्हटले होते. मग हिंदू जनजागृतीच्या नावाखाली सनातनला नेमके काय साध्य करायचे आहे? जर कोणी जहाल हिंदुत्ववादी याला समर्थन देत असेल तर त्याने पाकिस्तानकडे पहावे. धर्मांधता हा व्यवस्थेला नाशाकडे  नेणारा आहे. 

*बुद्धीची पाटी कोरी नको
आपली श्रद्धास्थाने नष्ट करणे आणि त्यांचे खरे विचार समाजासमोर येऊ नये, हा त्यांचा उद्देश्य असतो.  असे  केले की आपल्या डोक्यात हवे तसे ते घालू शकतात. कारण तुमच्या बुद्धीची पाटी कोरी असते. म्हणून तर शिवाजी खरा कोण होता हे सांगणार्या पानसरेंना संपविले जाते. विज्ञानाधिष्ठीत समाज आन् तर्कसंगत विचार करायला शिकविणे यात आयुष्य व्यतीत करणार्या नरेंद्र् दाभोलकरांना भरदिवसा संपविले. परखड लिहिणार्या गौरी लंकेश यांनाही संपवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दहशतवादी संघटनांना स्वतंत्र विचार करणारी पिढी नको आहे. त्यासाठी त्यांचा आटापिटा आहे.

*स्वतंत्र विचारसरणी  हवी
आपण स्वतंत्र विचार करायला शिकायला हवे. मेंढरासारख सगळे जग करतय म्हणून आपण तसेच करावे याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीचे कारण समजून घेतले पाहिजे. धर्माच्या नावाखाली कोणालाही वापर करू देऊ नये.

Wednesday, August 8, 2018

बलात्कार आणि माणूस नावाची जात.

न्यायदेवतेच्या मंदिरात जाण्याआधीच तिला मानसिक रुग्ण ठरवून तिचा बळी घेण्यात आला. ३ प्राध्यापक डाॕक्टरांनी मेडीकल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ती थोडीच मुकी शेळी होती ? येथवर थोडेच थांबणार होते.

न्याय मागण्याचीही तिला किंमत मोजावी लागली. तिला प्रात्याक्षिक परीक्षेत नापास करण्यात आले. न्याय तर मिळालाच नाही. उलट बलात्कार प्रकरणाची चौकशी करणार्या चांडाळचौकडीनेही तिला आणखीनच उद्ववस्त केले. ज्या हातांनी रुग्णसेवेचे व्रत घेण्याचे स्वप्न पाहिले, त्याच हातांनी गळफास घेत तिने आपले आयुष्य  संपविले. तिचे हात थरथरले नसतील का? धनदांडग्यापुढे तिचा आवाज एवढा क्षीण झाला होता का तिने कायमचीच वाचा  बंद करुन घेण्याचा निर्णय घेतला. खरतर बलात्कार करणार्या या नराधमांचा माणसांचा दर्जा काढून घ्यायला हवा. त्यांना हिंस्त्र प्राण्यांच्या कळपात सोडून जाणीवा करुन द्यायला हवी.
कधीतरी माणसाने आपली माणूसपणाची जातही तपाली पाहिजे.

जाता जाता ः देवी फोटोतच आहे, प्रत्यक्षात दिसली  असती तर माणसाने कदाचित बलात्कारी गुण दाखविले असते. ही सोशल मीडियातील पोस्ट थेट स्त्रिया  किती असुरक्षित आणि माणूस किती खालच्या स्थराला जातोय हे सांगते . 

Tuesday, August 7, 2018

गरिबीने चिपाड होणारी माणसं

रस्त्यावर एक गाडा आहे.नेहमीसारखीच तिथं वर्दळ आहे. मच्छी फक्त ३०,४० अन् ५० रुपयांना आहे. खरेतर हा दर कुणालाही परवडणारा आहे. नवरा बायको अन त्यांची लेकरे दोघांजवळ आहेत. भिरभिरणार्या नजरेने त्या गाड्यावरील पदार्थ पाहणारी कदाचित त्याची मेहुणीही आहे. दोन्ही लेकरांच्या डोळ्यातील भुकेचा उसळलेला डोंब लपू शकत नाही. तो घासाघीस करत राहतो. त्याला २० रुपयात मच्छी हवी आहे. पण गाडेवाल्याच म्हणण २रुपये मिळतात. त्यातही घासाघीस परवडत नाही. हे ऐकून दोघींच्याही चेहर्यावर दिसणारी दुर्बलता. याचे उत्तर आरबीयच्या रेपोकडे नाही की जागतिक बँकेने भारताच्या विकासाच्या आकडेवारीत. गाडेवाल्याच लक्ष फक्त आता मच्छी तळण्याकडे आहे. मलातर सगळे विकासाचे अहवाल कढईत गेलेले दिसू लागतात. तेवढ्यात एक कुत्र काहीतरी खाण्याच्या उद्देशाने येते. गिर्हाईक त्याला हाकलून देण्यासाठी किरकाळतात.मग कुत्रा कसबस निघत. तिकडे हा माणूसही निघतो. मध्येच गाडेवाला पोर्याला ओरडतो. कामे नीट कर म्हणून. तो केवळ हाडाचा सापळा झालेला. घागर उचलताना स्पष्ट दिसत. गरिबीमुळे चिपाड झालेल्या  शरीरात अवसान पुन्हा भुकेनेच आणलेले असते. भुकेला भारत रात्रीच्या अंधारात मिस्टर इंडियासारखा गायब होत जातो.

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....