पुण्यात जाॅब करत करत टिळक विद्यापीठात पत्रकारितेचा 2007 ला कोर्स सुरू होता. पत्रकारितेच्या करियरच्या स्वप्नाबरोबर आयुष्यालाही काही स्वप्ने हवी असतात. यासाठी स्वप्न दाखवणारे सिनेमे हवीहवीशी वाटतात. असाच एक 9 ते 12 चा सिनेमा पाहून रुमवर परतत होतो. गस्तीवरील पोलीस नेहमीप्रमाणे दक्ष होते. दोन पोलिसांनी आम्हाला अडविले. माझ्याबरोबर दुसरा एक मित्र होता. त्यांनी नाव विचारले अन आम्ही तिकिटे दाखवायला सुरुवात केली. मी श्रीकांत पवार हे नाव सांगताच तो पोलीस हबकला. तो दुस-या पोलिसाला म्हणाला, हा जेलमधून कधी सुटला आहे? तेव्हा पोलिसाने सांगितले अरे हा श्रीकांत पवार तो नाही. तो अल्पवयीन आहे. त्याने हाफ मर्डर केलाय. त्याने जाण्यास सांगितले, तेव्हा जीव भांड्यात पडला.
जरा संघर्षाचा काळ होता, तेव्हा फार कोणाच्याच संपर्कात नव्हतो. दुरच्या नात्यातील कुटिलोद्योग करणा-यान सगळ्यांना सांगितले श्रीकांत पवार हा तोतया पोलीस म्हणून सापडलाय. माणसाला चांगले समज व्हायला खूप वेळ लागतो. गैरसमज व्हायला काहीच वेळ लागत नाही. तोतयागिरी करणा-या पोलिसाची मी जेव्हा वृत्तवाहिनीवर बातमी पाहिली तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. त्या आरोपीचे संपूर्ण नाव अन् माझे नाव ऐकून हैराण झालो. म्हणजे आपल्याच नावाचा गंभीर गुन्हेगार अस्तित्वात होता तर...
2013 ला आॅनलाईन पत्रकारिता सुरू केली तेव्हा सहज सर्च केला. Shrikantpawar नावाची वेबसाईट सुरू होती. साहेब ते मोठे संशोधक होते. माझ्या नावाची महती, त्यांना जास्त कळाली असावी. वेबसाईटचे नावही त्यांनी शिल्लक ठेवलेले नव्हते.
पत्रकारिता करताना बिननावाचे लेख छापायचे हौस होती. आपले नाव नाही झाले तर चालेल पण चांगले मांडावे ही भूमिका होती. एका मासिकाच्या संपादकाचा क्रमांक सहका-याने दिला. काॅल केल्यावर संपादक म्हणाले, फोन कशाला करतोस थेट ये. मी गेल्यावर त्यांनी प्रश्न विचारला काय काम होत? मासिकात लेख लिहायचे सांगितल्यावर त्यांनी काही विषय दिले. मी तुम्हाला फोन केला होता श्रीकांत पवार माझे नाव सांगितले. मग संपादक मोठ्याने हसले. अरे श्रीकांत पवार हा मित्र आहे. तो गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे. मला वाटले ब-याच दिवसाने त्याने काॅल केला. बरयं, गुन्हेगार जगतातच नाही तर सामाजिक कार्यातही डंका होतो.
फेसबुक पेजवर नंबर टाकल्याने कधीकधी पेज लाईक करणारे सहज फोन करतात. असाच एक नंबर आला.
मी- कोण बोलतय?
काॅलर-पवार बोलतोय.
मी - अहो, मीपण पवारच आहे.
काॅलर - मी श्रीकांत पवार आहे.
मी - माझेही नाव श्रीकांत पवार आहे.
काॅलर - अहो, मी लातूरचा आहे.
मी- अरेच्या किती योगायोग! मी पण लातूरचा आहे.
कुणी जेव्हा तुच्छतेने बोलतं. तेव्हा ही नावाची गोष्ट आठवते. एकसे बढकर एक है यहाँ! चांगल्या गुणवान लोकांहून अजून चांगली लोक असतात. एवढेच नव्हे आपल्या नावाची लोकही असतात. काहीही असो तुमच्या नावाची जबाबदारी तुमच्यावर आहे. नावात काय आहे, हे म्हणून चालणार नाही!