Friday, January 11, 2019

शिवसेना अन् भाजप युतीचा जांगडगुंता

शिवसेना अजूनही सत्तेत आहे का हे रोज वर्तमानपत्रात पाहावे लागते. कारण सत्तेत असणारी सेना रोजच सामनातून आणि पक्षाध्याक्ष उद्धव ठाकरे न चुकता विरोधी पक्षाहून अधिक प्रखर टीका करत आहे. तरीही सत्तेचा मोह सोडत नाही.

त्यांचे नाते म्हणजे भांडणा-या पती आणि पत्नीचं तर कधी चोरून प्रियकर, प्रेयसी असल्याची टीका होत आहे. हे नाते कसेही असो पण ते भविष्यात विलग होणार असल्याने चर्चा तर होणारच! अर्थात शिवसेना धनुष्यबाण ताणून सातत्याने स्वतंत्र निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने शिवसेनेचा रुसवा काढून त्यांच्याबरोबर युती करू असे जाहीर केले आहे. मुळात अशी परिस्थिती का ओढवली याची राजकीय मांडणी जाणून घेतली पाहिजे.

भाजप प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व फारसे मानत नाही अथवा ठेवत नाही. प्रादेशिक पक्षांबरोबर हातमिळवणी करण्यापेक्षा त्यांच्या मुंडक्यावर बसून राज्यात मजबूत होण्याची भाजपची रणनीती आहे.यामुळेच ओरिसातील बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक थोडे लांबच थांबून भाजपशी संधान साधतात. दक्षिणेकडील तेलंगणा, तामिळनाडू राज्यांना भाजप प्रादेशिक अस्मितेवर घाला येईल ही भीती सतावते. अशा परिस्थितीत शिवसेनेला भाजपची युती म्हणजे असंगाशी संग वाटली नाही तर नवल काय?
भाजपच्या विरोधात शेतक-यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याचा फटका आगामी निवडणुकामध्ये बसू नये यासाठी शिवसेना काळजी म्हणून भाजपवर टीका करत आहे. सर्वसामान्याबरोबर शेतक-यांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे.त्याचबरोबर विरोधी पक्षाची धार कमी केली जात आहे. शिवसेनेला एकाचवेळी सत्ता उपभोगून विरोधी पक्षाची भूमिका वठवायची आहे, हे दुधारी तलवारीसारखे आहे.

शिवसेनेचा मराठीचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाताळायला सुरुवात केली. या मुद्द्यावर कधीही नव्हे ते शिवसेनेला स्पर्धक तयार झाली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेहून अधिक भाजपची पकड आहे. या मुद्द्यावर भाजप महाराष्ट्रातील खुंट्या अधिक बळकट करत आहे. यातून भविष्यात शिवसेनेला आव्हान निर्माण केले जावू शकते. शिवसेना आणखी पावले उचलणार असेल तरच अस्तित्व टिकणार आहे.

Wednesday, January 9, 2019

शबरीमालाच्या दर्शनाने कोणाचे उघडणार डोळे?

कोणतीही समस्या अथवा वाद राजकारणाच्या वळणावर  पोहोचला तर मूळ समस्या काय याचा अधिक गुंता होतो. त्यात आपल्याला भारतीय म्हणून भावनिक जास्त तर्काच्या चष्म्यातून कमी पाहण्याची सवय यामुळे शबरीमालातील दर्शनाचा विषय आंधळ्याने पाहिलेला हत्ती झाला आहे.

शबरीमाला म्हणजे अय्यपा स्वामींचं मंदिर! अय्यपा स्वामींचे भक्त अत्यंत कठोर व्रत करत एकेक पायर्या करत शेवटी दर्शन करतात. व्रत करताना अनेकांना केवळ पायर्याचे दर्शन घेताना काही वर्ष लागतात, तेव्हा दर्शनाची गोष्ट म्हणजे आव्हान असते. म्हणजे व्रत करणार्या भाविकांनी स्वत:वरच श्रद्धेने कठोर बंधन घातलेले असते. यालाच  बुद्धिवादी कर्मठपणा म्हणतात. मात्र या काळात जसे आपल्याकडे वारकरी  माऊली म्हणतात, तसे हे अय्यपा भक्त प्रत्येकाला स्वामी म्हणतात. मग स्त्रीयांकरिता मंदिर प्रवेशाचा वाद कोठून येतो ?

स्रीयांवर अन्याय होतो व त्यांना समान हक्क डावलला जातो, असा आरोप केला जातो. त्यासाठी मी टूसारख्या चळवळी केल्या जात आहेत. प्रत्यक्षात अशा गोष्टी चुकीच्या ठिकाणी लागू केल्याने अतिरेक होताना दिसत आहेत. मंदिरात स्रियांना प्रवेश नाही, म्हणजे अन्याय नसून श्रद्धेचा भाग आहे. आपल्याकडे हनुमानाच्या मंदिरात अजूनही स्रिया जात नाहीत. कारण हनुमान हा ब्रह्मचारी असल्याची भावना आहे. दुर्दैवाने श्रद्धेचे निकष हे वैज्ञानिक निकषावर पाहता येत नाहीत. त्यामुळे या दरीचा राजकीय आणि समाजकंटक पुरेपूर गैरवापर करतात. समाजातील प्रतिगामी आणि पुरोगामी यांच्यातील विषाची बीजे येथेच रोवली आहेत.
गंमत म्हणजे देशातील काही मंदिरात पुरुषांना प्रवेश नाही. पण पुरुषांनी आम्ही राक्षसं अन् स्रिया या फक्त देवी असा वाद करत आंदोलने केली नाहीत.

मग हा वाद सोडवायचा कसा?
कर्मठ लोकांना मंदिरातील महिला प्रवेश नाकारणे हा सुधारणांना विरोध करण्याची संधी वाटत असेल तर हा प्रयत्न हाणून पाडायला पाहिजे. त्याचबरोबर  भाविकांच्या श्रद्धेचा आदर राखला पाहिजे. किमान व्रताच्या निमित्ताने अनेकजण व्यसनमुक्तीच्या मार्गाला लागत असतात.राहिला प्रश्न मंदिरातील महिला प्रवेशाचा! महिलावर अन्याय करणारी बाब नाही ही समजून घेतले पाहिजे. उद्या बारमध्येही आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी केल्यास त्यावरची प्रतिक्रिया काय असेल हे निश्चित करावे लागेल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच मंदिरात प्रवेश नाकारल्याने महिलावर अन्याय होत असल्याचे चित्र रंगविले जात आहे. दुसरीकडे इतर धर्मात महिलांना प्रार्थनास्थळात प्रवेश नाकारला जातो, यावर सर्वोच्च न्यायालयाचेदेखील मौन आहे.

Saturday, December 29, 2018

आरोग्यरथ- टेलिमेडीसीनद्वारा आरोग्यसेवेत आशादायी पहाट

आॅनलाईन आणि तंत्रज्ञानाने ग्रामीण भागातील नागरिकांना किती फायदा होवू शकतो, हे पाहायचे असेल तर लातुरचा आरोग्यरथ पाहा!

बहुधा देशातील पहिलीच एवढी अद्ययावत गावोगाव, दुर्गम सेवा देणारी टेलिमीडिसनची सेवा असेल. ग्रामीण भागात अनेकांना शहरात यायचे असेल तर केवळ तिकीटासाठी पैशांची जुळवाजुळव करावी  लागते. तेव्हा दवाखान्याचा खर्च , तपासण्या आणि औषधांचा खर्च तर त्यांना अक्षरश: चैनीची गोष्ट वाटते. त्यामुळे काहीजण अंगावर दुखणे काढतात. आजार, विकार बळावल्यास शेवटी घरातले लोक कर्ज काढून उपचार करतात. अशी परिस्थिती ओढवताना काही करता येईल का तर याचे ठोस उत्तर आरोग्यरथने दिले आहे.

गावात येणारा आरोग्य रथ म्हणजे प्रशिक्षीत नर्स, डाॅक्टर आणि अद्ययावत रुग्ण तपासणीची उपकरणे असलेले वाहन!या सेवेतून केवळ दहा-वीस रुपयात  डाॅक्टर रुग्णांना तपासतात. रुग्णांना शहरात जाण्यासाठी तिकीट खर्च नाही अन्  अल्प दरात तपासणी यामुळे रुग्णांना चांगला फायदा होत आहे. अनेक तज्ज्ञ डाॅक्टर त्वचारोग, दमा अशा विविध आजारावर आरोग्यरथाच्या माध्यमातून शिबीर घेत  आहेत.

डेक्कन हेअल्थ सर्व्हिसेस तर्फे मोफत अस्थिविकारासारखे विविध तपासणी शिबीर संपन्न पार पडत आहेत.

DHS संस्था  संचलित आरोग्यरथ या उपक्रमादवारे आरोग्याबद्दल जनजागृती, सर्वसाधारण रुग्ण तपासणी, व टेलिमेडिसिन या तंत्रज्ञानदवारे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्यतपासणी शिबीर घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रात  प्रथमच आरोग्यरथतर्फे  Realtime  टेलिमेडिसिन हे तंत्रज्ञान उपलब्ध  करून दिल्यामुळे , रुग्णांना त्यांच्या त्यांच्या घराजवळच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला  मिळत आहे. तसेच तज्ज्ञांना सुद्धा अगदी त्याच्या OPD मध्ये बसून दूरचे patient चेक करता येत आहेत. त्यामुळे लातूरच्या आरोग्यसेवेत मोलाची भर पडत आहे.

या आहेत आरोग्यसुविधा
  १. कॉम्पुटराइज्ड नोंदणी ( EMR ) नोंदणी यामध्ये रुग्णाचे  सर्व आरोग्य विषयक 

    नोंदणी करून हेल्थ कार्ड

  २. BP तपासणी 

  ३. इलेकट्रॉनिक स्टेथो द्वारा हृदयाची तपासणी

  ४. ECG - करून टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर तज्ज्ञाचा सल्ला 

  ५. रक्तातील साखर BSL - 

  ६. spo2 - रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे.

  ७. Foetal Doppler दवारे गर्भातील बाळाच्या हृदयाचे स्पंदन तपासणे.

  ८. स्पायरोमेट्री फुफूसाच्या कार्यक्षमतेची तपासणी ( दमा,श्वासनलिका )
 
9  हाडांच्या व मणक्याचे आजार
इत्यादी तपासण्या.

या  टेलिमेडिसिन हे तंत्र प्रथमच आरोग्यरथ उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे व याचा फायदा सर्वसामान्य जनतेला व्हावा यासाठी  आठवड्याला एक मोफत आरोग्यशिबिर घेत असल्याचे  डॉ. अविनाश समुद्रे, डॉ दत्ता आंबेकर यांनी सांगितले.

आरोग्यरथात फार्मसिस्ट विष्णु, डॉ किरण खेर्डेकर यांचाही सहभाग असतो.

या आरोग्यसेवेसाठी संस्थेचे सहसंस्थापक डाॅ. दत्ता अंबेकर हे स्वत: रुग्ण तपासणी करतात. यापूर्वी पानगावला त्यांनी केलेली रुग्णसेवा पंचक्रोशीतील नागरिक विसरले नाहीत. अनेकदा ताटावरुन उठून ते पेशंटला तपासण्यासाठी गेले आहेत. दिवस-रात्र केवळ व्रतासारखे काम करताना त्यांनी लातूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. गरिबांना अल्पदरात रुग्णसेवा देण्याची तळमळ मात्र कमी झाली नाही.

डाॅ. अविनाश समुद्रे हे एमएनसी कंपनीत उच्चपदावर आहेत. ते खास आरोग्यरथ उपक्रमासाठी दुबईतून  भारतात येतात. आपल्या भागातील लोकांसाठी ज्या काही उत्कृष्ट सेवा आहेत, त्या आरोग्यरथातून देण्याचा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल स्वदेस सिनेमाची तुम्हाला आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

डेक्कन हेल्थ सर्व्हिसेसच्या आरोग्यरथाचा अनेक गरजू, गरीब रुग्ण लाभ घेत आहेत. आनंदाची बाब म्हणजे अनेक डाॅक्टर यातून शिबीरे घेत रुग्णसेवेचा परीघ वाढवित आहेत. यात वरचेवर वाढ होत जाऊन गरजू, गरीब रुग्ण असेल हे निर्वावाद!

लातूर परिसरात मोफत आरोग्यशिबिर घ्यायचे असल्यास ८३८०९८११०० या क्रमांकावर संपर्क करावा.

डाॅ. दत्ता अंबेकर
निर्मल हाईटस, तिसरा मजला,
अंबाजोगाई रोड लातूर

बरं... तुझं, नाव श्रीकांत पवार आहे तर!

पुण्यात जाॅब करत करत टिळक विद्यापीठात पत्रकारितेचा 2007 ला कोर्स सुरू होता. पत्रकारितेच्या करियरच्या स्वप्नाबरोबर आयुष्यालाही काही स्वप्ने हवी असतात. यासाठी स्वप्न दाखवणारे सिनेमे हवीहवीशी वाटतात. असाच एक 9 ते 12 चा सिनेमा पाहून रुमवर परतत होतो. गस्तीवरील पोलीस नेहमीप्रमाणे दक्ष होते. दोन पोलिसांनी आम्हाला अडविले.  माझ्याबरोबर दुसरा एक मित्र होता. त्यांनी नाव विचारले अन आम्ही तिकिटे दाखवायला सुरुवात केली. मी श्रीकांत पवार हे नाव सांगताच तो पोलीस हबकला. तो दुस-या पोलिसाला म्हणाला, हा जेलमधून कधी सुटला आहे? तेव्हा पोलिसाने सांगितले अरे हा श्रीकांत पवार तो नाही. तो अल्पवयीन आहे. त्याने हाफ मर्डर केलाय.  त्याने जाण्यास सांगितले, तेव्हा जीव भांड्यात पडला.

जरा संघर्षाचा काळ होता, तेव्हा फार कोणाच्याच संपर्कात नव्हतो. दुरच्या नात्यातील कुटिलोद्योग करणा-यान सगळ्यांना सांगितले श्रीकांत पवार हा तोतया पोलीस म्हणून  सापडलाय. माणसाला चांगले समज व्हायला खूप वेळ लागतो. गैरसमज व्हायला  काहीच वेळ लागत नाही. तोतयागिरी करणा-या पोलिसाची मी जेव्हा वृत्तवाहिनीवर बातमी पाहिली तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. त्या आरोपीचे संपूर्ण नाव अन् माझे नाव ऐकून हैराण झालो. म्हणजे आपल्याच नावाचा गंभीर गुन्हेगार अस्तित्वात होता तर...

2013 ला आॅनलाईन पत्रकारिता सुरू केली तेव्हा सहज सर्च केला. Shrikantpawar नावाची वेबसाईट सुरू होती. साहेब ते मोठे संशोधक होते. माझ्या नावाची  महती, त्यांना जास्त कळाली असावी. वेबसाईटचे नावही त्यांनी शिल्लक ठेवलेले नव्हते.

पत्रकारिता करताना बिननावाचे लेख छापायचे हौस होती. आपले नाव नाही झाले तर चालेल पण चांगले मांडावे ही भूमिका होती. एका मासिकाच्या संपादकाचा क्रमांक सहका-याने दिला. काॅल केल्यावर संपादक म्हणाले, फोन कशाला करतोस थेट ये. मी गेल्यावर त्यांनी प्रश्न विचारला काय काम होत? मासिकात लेख लिहायचे सांगितल्यावर त्यांनी काही विषय दिले. मी तुम्हाला फोन केला होता श्रीकांत पवार माझे नाव सांगितले. मग संपादक मोठ्याने हसले. अरे श्रीकांत पवार हा मित्र आहे. तो गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे. मला वाटले ब-याच दिवसाने त्याने काॅल केला. बरयं, गुन्हेगार जगतातच नाही तर सामाजिक कार्यातही डंका होतो.

फेसबुक पेजवर नंबर टाकल्याने कधीकधी पेज लाईक करणारे सहज फोन करतात. असाच एक नंबर आला.
मी- कोण बोलतय?
काॅलर-पवार बोलतोय.
मी - अहो, मीपण पवारच आहे.
काॅलर - मी श्रीकांत पवार आहे.
मी - माझेही नाव श्रीकांत पवार  आहे.
काॅलर - अहो, मी लातूरचा आहे.
मी- अरेच्या किती योगायोग! मी पण लातूरचा आहे.

कुणी जेव्हा तुच्छतेने बोलतं. तेव्हा ही नावाची गोष्ट आठवते. एकसे बढकर एक है यहाँ! चांगल्या गुणवान लोकांहून अजून चांगली लोक असतात. एवढेच नव्हे आपल्या  नावाची लोकही असतात. काहीही असो तुमच्या नावाची जबाबदारी तुमच्यावर आहे. नावात काय आहे, हे म्हणून चालणार नाही!

Thursday, December 20, 2018

हिंदूंना कळालेला अन् भाजपला न समजलेला हनुमान

दिदेशात धर्म हे राजकारणाचं महत्त्वाचे चलन बनत आहे. मग भाजपचे हिंदूत्व असो की एमआयएमचे मुस्लिम धर्म खतरेमेची आरोळी! जनसंघाने आताच्या भाजपने रथयात्रा काढून राम हे राजकारणातील खणखणीत नाण बनवले. दोन वेळा पोट भरले नाही तरी चालेल राममंदिराचे स्वप्न पाहा हा विचार तरुणांना पहायला प्रवृत्त केले.

सध्याअयोध्येतील रामाचे मंदिर हे भाजपचे मोठे भांडवल आहे. या राजकारणाने एवढी हीनपातळी घातली आहे की आता रामाचा सेवक म्हणणारा हनुमानही भाजपने सोडला नाही. हनुमान दलित, आदिवासी व मुस्लिम असल्याची सुमार दर्जाची विधाने भाजप नेत्यांनी केली आहेत. देवावरच जातीचा अन् धर्माचा शिक्का मारला की भाजपचे राजकारण सोपे होते. एकतर भाजप म्हणतोय त्या पद्धतीने देवाला माना अथवा तुम्ही धर्मद्रोही असा प्रचार सुरू होतो.

रामानंतर भाजपने हनुमान का निवडला?
रामाच्या नावाने राजकारण केल्यानंतर यश मिळू शकते, हे सत्ताधारी भाजपने यापूर्वीच दाखवून दिले आहे. पण ही व्होटबँक केवळ शहरापुरतीच आहे. अयोध्येत राममंदिर होण्याची शक्यता धूसर होत आहे. हा मुद्दा निसटत जाताना नव्या नाण्याची गरज भाजपला वाटत आहे. त्यामुळेच चाणक्यनीतीतून हनुमानाचे नवे चलन भाजपने काढले आहे. ग्रामीण भागात हनुमानाला चिरंजीव मानत असल्याने भाविकांची संख्या अधिक आहे. तसेच शक्तिचा देव असल्याने बहुजनामध्ये अधिक मान्यता आहे.महाराष्ट्रात बल आणि विद्येच्या उपासनेची शिकवण देत रामदास स्वामींनी हनुमानाची मंदिरे गावोगाव मंदिरे बांधली आहेत. भविष्यकाळात हीच मंदिरे राजकारणाचे अड्डे झाले तर आश्चर्य वाटायला नको.

Tuesday, December 18, 2018

कृषी कर्जमाफी आणि विकासाच्या गंगेचा शोध

कर्जमाफीचे राज्यात अजूनही गु-र्हाळ असताना सत्तेवर आलेल्या काँग्रेसने मध्यप्रदेशमध्ये तासाभरातच शेतक-यांचे कर्जमाफ केले. यानंतर देशभरात शेतक-यांच्या कर्जमाफीचा विषय चर्चेत आला आहे. देशभरात कर्जबाजारीपणामुळे लाखो शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.

कर्ज- शेतमालाचे अत्यल्प दर-वाढलेली महागाई- नैसर्गिक संकट अशा दुष्टचक्रात शेतकरीवर्ग सापडला आहे. सरकारचे कोणतेही प्रभावी कृषी धोरण नसल्यामुळे यामध्ये शेतकरी गाळासारखा वरचेवर फसत आहे.  अशी परिस्थिती का ओढवली याचा विचार करायला कोणीच तयार नाही. प्रमुख घटक कोणते जबाबदार याचा घेतलेला हा मागोवा!

जलसिंचन -
राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे अधिक वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे नद्यांचे प्रमाण कमी असूनही मराठवाड्याला जलसंधारणाच्या कामात हवा तितकासा वाटा मिळाला नाही. त्यामुळे अपुरा पाऊस झाल्यास मराठवाड्यातील शेतक-यांचे जगणे अधिकच कठीण होते.

बदलते हवामान-
लहरी मान्सून वेळेवर येईल आणि पुरेसा पाऊस होईल याची शाश्वती राहिलेली नाही. कोरडवाहू शेतक-यांचे केवळ पावसावरच जगणे अवलंबून असल्यामुळे दुष्काळासारखे संकट त्याला जगण्या-मरण्याच्या सीमेवर आणून सोडते. यावर कृत्रिम पाऊसासारखे कमी प्रभावी आणि मर्यादित पर्याय आहेत.

संशोधनाचा अभाव-
महागडे बीटी कापूस बियाणे घेऊनही बोंडअळीची लागण झाली. यामुळे कापूस उत्पादक  शेतक-यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले. रासायनि खत व कीटकनाशक यांच्या वापर केल्याने नापीक जमिनीचे प्रमाण वाढत आहे. कृषी विद्यापीठ आणि बियाणे कंपन्या शेतक-यांचा फायदा होईल याविषयी फार कमी संशोधन करतात. ईस्त्राईल देशाने ज्या गोष्टी संशोधनातून शक्य केल्या आहे, त्या ईस्रोसारख्या संस्था असणा-या भारताला शक्य नाही का? अनेक भारतीयात विटामिनचा अभाव आहे. अधिक पोषणमुल्य असणारी भाजीपाला, फळभाज्या विकसित केल्यातर शेतक-यांना अधिक पैसा मिळू शकेल. हवामान खात्याचा अंदाज तर विनोदाचा विषय झाला आहे. केवळ बी-बियाणे कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी हवामान विभाग चुकीचा अंदाज वर्तवित तर नाही ना असा संशय अलीकडच्या काळात व्यक्त होत आहे. यातही सुधारणेला खूप वाव आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव -
राजकीय  नेते केवळ सवंग प्रसिद्बीसाठी कर्जमाफी, वीजबिल असे निर्णय घेतात. मात्र हाच निधी शेतमालाला भाव, तंत्रज्ञानासारख्या इतर सुविधा दिल्या असत्या तर शेतक-यांसमोर एवढे संकट उभे ठाकले नसते. कृषी खाते केवळ यशोगाथा अन् आकडेवारीच्या खेळात मग्न आहे. याचा प्रत्यक्षात शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. कर्जमाफी ही केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरणार आहे. पुन्हा येणा-या मागल्या...

काय आहे रामबाण उपाय?
शेतक-यांना जगण्यासाठी नवा पर्याय दिला पाहिजे. कौशल्य शिक्षण देऊन त्यांना कंपन्यामध्ये रोजगार दिला पाहिजे. याच स्वस्तातील मनुष्यबळाच्या जोरावर चिनी कंपन्यांना भारत आव्हान देऊ शकेल.

Monday, December 17, 2018

चीनचे व्यापारी आक्रमण आणि कठपुतळे ग्राहक

चीनच्या सीमेवरील कुरापती आणि पाकला देणारी चिथावणी आपल्या देशाला नवी नाही. उलट याला तोंड देणे हे देशाच्या परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची बाब झाली आहे. खरेतर चीनने आपल्या देशातील बाजारपेठेवर एवढा कब्जा घेण्यास सुरुवात केली की आर्थिक गुलामगिरीचे संकट भेडसावत आहे. हे कसे आपण विस्ताराने जाणून घेऊ..

सुरुवातीला कात्री, नेलकटर अशा चीनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. सुरुवातीला वापरा अन् फेका अशा सुमार दर्जाच्या वस्तुंना भारतीयांनी कमी लेखले. पण हळूहळू या उत्पादनांनी मोठी बाजारपेठ काबीज केली, हे कुणालाच कळले नाही. खेळणी ते दिवाळीचे आकाश कंदिल असा चिनी उत्पादनांनी भारतीयांच्या जीवनात शिरकाव केला.
याचा दुष्परिणाम आपल्या उद्योगक्षेत्रावर झाला आहे.

कानपूर हे दर्जेदार चप्पल आणि कुलुपांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या उत्पादनांची जागा स्वस्तातील उत्पादनांनी घेतली. याचा परिणाम म्हणून कानपूर शहराची जुनी ओळख पुसत आहे. अनेक कारागिर बेकार झाले आहेत. जुन्या विणकामगारासह  कापड उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांना लपेटून टाकले आहे.
चीनी आक्रमण एवढ्यावरच थांबले नाही. डिजीटल प्रगतीची फळे भारतीयांबरोबर शिओमी, ओप्पो मोबाईल कंपन्या खात आहेत. शिओमीने तर एका दिवसात 1000 दुकाने ग्रामीण भागात सुरू करुन रोजगारावर हात मारायला सुरुवात केली. एवढेच नव्हेतर आगामी काळात चप्पल, कापड उद्योगातही पाय रोवण्याचा निर्णय घेतला आहे. मेक ईन ईंडिया केवळ नावाला असताना हजारो लघु उद्योग बंद पडले आहेत. अशा परिस्थितीला जबाबदार कोण? सरकार, आळशी व्यावसायिक  आणि स्वस्ताईला भुलणारा तुम्ही आम्ही ग्राहकवर्ग!!

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....