Monday, May 4, 2015

Buddha in Marathi

बुध्दं शरणं गच्छामि... .कारण हे सर्व प्राप्त करावे असेच आहे.....

पत्रकारिता करत असताना कधी कधी अधिकारीवर्गाशी वेगवेगळ्या विषयावर चांगलीच चर्चा होते. प्रशासन व माध्यम ही दोन्ही टोके जरी विरूध्द वाटत असली तरी ती माणसेच आहेत.
एका अधिका-याने बोलत बोलत मला सत्यनारायण गोएंका यांचे विपश्यनेवरील पुस्तक वाचले का असे विचारले ? मुळात वाचायची खूप आवड पण धार्मिक वाचन जरा जपूनच करत असतो.
कारण हिंदू धर्मातील उपनिषद वार्ता, कुंडलिनी शक्ती , पतंजली योग सुत्रे अशी असंख्य पुस्तके वाचून मी ठरवले की बास्स ! आता वाचन जास्त केल्याने विचारांची गुंतागुंत होत आहे.तरीही ते विपश्यनेवरील पुस्तक मी घेतले आणि धन्य पावलो. बुध्द धर्मामुळे माणसाला कसा विचार करावा हे शास्त्रोक्त पध्दतीने समजले.
आज बुध्द पौर्णिमा आहे. बुध्दाविषयी त्यांच्या विचाराविषयी मला खूप प्रेम आहे. माणुस मनाचा गुलाम असतो. मनाला जाणले तर माणुस चांगल्याप्रकारे आयुष्य जगू शकतो. त्यासाठी बुध्दधर्म प्रज्ञा, शील, करूणा याची शिकवण देते. जनसंज्ञापन शिकणा-या प्रत्येकाने विपश्यनेचे तत्वज्ञान माहित करून घ्यावे असे माझे मत आहे. वर्तमानकाळात जगणे सर्वात महत्वाचे असते. माणसाचे मन नेहमीच भूत-भविष्यात गढलेले असते. त्यामुळेच माणुस दुःखी होतो. आपण प्राप्त माहितीवर संवेदना काय देतो यावरच त्या माध्यमाचा परिणाम अवलंबून असतो. 
आपण या माध्यमांच्या प्रभावाखाली राहतो आणि गुलाम होतो. आपले विचार , भावना कधीच कोनाड्यात जावून बसलेल्या असतात.
 विपश्यना म्हणजे एक प्रकारे अन्टीव्हारसच आहे. डोक्यात येणारे असंख्य विचार , त्याकडे पहाणे, त्याला लेबल देणे, वर्गीकरण करणे, नको असलेले विचार काढून टाकणे, चांगल्या येणा-या विचारासाठी जागा ठेवणे यामुळे माणुस ताजा टवटवीत राहतो. बुध्द सर्वात आवडायचे कारण त्यांनी बुध्दीला आणि मनाच्या निर्मळतेला महत्व दिले आहे. बुध्दीला पटेल तेच स्विकारा. स्वतः अनुभवा. 
सगळ्यात जास्त इंटरेस्टींग म्हणजे नोटींग ! म्हणजे असे करायचे की आपल्या मनात येणा-या प्रत्येक विचाराची नोंद करायची. मी त्यासाठी युक्ती केली आहे की एक रफ पेपरवर डोक्यात विचार आला की उभी रेष मारतो. त्यामुळे येणारा विचार आपण नियंत्रीत करण्याचे कौशल्य मिळवू शकतो. ही खूप अफलातून कला आहे.
कुठेही कर्मकांड नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता नसते त्या विचारांचा फाफटपसारा याविषयी मौन बाळगले आहे. ही सुध्दा मला गोष्ट आवडते. उदा. पुनर्जन्म, आत्मा अशा गोष्टी कळाल्या किंवा नाही कळाल्या तरी तुम्हाला तुमचे कर्म करावेच लागते. उगाच गोंधळ उडविणा-या आणि ध्येयापासून विलग करणा-या कल्पना सोडून देणे इष्टच ! बुध्दांना विष्णुचा अवतार मानणे हे थोतांड आहे.  
बौध्द धर्मात जीवन दुःखमय आहे, असे सांगितले आहे. याबाबत मात्र मी पुर्णपणे सहमत नाही. जरी असले तरी दुःखात का जगायचे ? संगीत, कला, क्रीडा अशा विविध गुणांचा विकास करीत जगावे असे वाटते.बहुतेक बुध्दांना प्रथम टप्प्यात माणसाने मनावर विजय मिळवण्यात निपुण व्हावे असे अपेक्षित असावे आपण एकाच मार्गावरील प्रवासी आहोत. आपले जीवन मंगलमय होवो. 

कधी कधी बुध्दांचे विचार वाचून मी   डायरीत काही लिहतो.  त्यापैकी एक विचार!
राग व गर्व या दोन गोष्टी जगात सर्वात जास्त महागड्या आहेत.  जेव्हा आपण राग व गर्व बाळगतो आपल्याजवळील चांगले गुणही गमावून बसतो. अनेक कष्टानंतर प्राप्त झालेले यश व चांगले गुण हे अमुल्य असतात. त्याचा खर्च राग व गर्व एवढ्या सहजतेने करतात की महागड्या हि-याची किंमतही क्षुल्लक ठरावी. त्यामुळे माणसाने राग व गर्व बाळगून उधळपट्टी करू नये. राग व गर्व येत असल्यास थोडी कंजुषी दाखवावी.

Wednesday, April 29, 2015

लिंगायतधर्म एक परिपुर्ण विचार -





मित्रांनो, मी इयत्ता चौथीपासून ईश्वर आणि मानवाने कोणत्या धर्माचे आचरण करावे या विषयी वाचन करत आहे. या विषयी वाचनासाठी एवढा झपाटून गेलो होतो की पार वैदिक सिध्दांत, उपनिषद वार्ता,गीता,तसेच सर्वच कथासार आणि योगवसिष्ठ, पंतजली योगसुत्र असे ग्रंथ नववीपर्यंत वाचून काढले. कुंडलिनी शक्ती साठी तर मी जंगजंग पछाडले. 
अर्थात बुवा, महाराज नव्हे तर स्वतः अनुभवातून ज्ञान घ्या या विचाराप्रमाणेच अनुभव घेतला.मला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण अनेक प्रश्न निर्माण होवून गुंतागुंत निर्माण झाली.मनाला पडलेले प्रश्न हे शिक्षण सोडवू शकत नाही याचा रागच निर्माण झाला. सुरूवातीला हुशार असणारा मी हळूहळू अभ्यासात मागे पडू लागलो.
हिंदू शीख,मुस्लीम,ख्रिश्चन यांच्या धर्मग्रंथाचे मराठीतील भाषांतरे वाचूनही समाधान नव्हते. मुळात मी आस्तिक आहे, पण आंधळेपणाने भक्ती मला मान्य नाही. त्यामुळे प्रत्येक विचाराशी मी पुर्णपणे सहमत नव्हतो. कुणीतरी येवून परिपुर्ण विचार सांगावा ही इच्छा होती.....
महात्मा बसवेश्वरांच्या जंयतीनिमीत्त मी पुस्तके वाचायला घेतली आणि सुखद धक्का बसला. त्यांचे विचार व परिपुर्ण आहेत याची खात्री पटली.
महात्मा बसवेश्वरांनी भक्तीच्या कोंदणात कर्माचा हिरा बसवून त्यांनी सर्वसामान्य माणसाला आयुष्य उलगडून दाखविले आहे.देव हा सगुण की निर्गुण व जडत्व, चैतन्य म्हणजे काय अशा कल्पनामध्ये भक्तीलाच बांधून टाकण्यात आले. सहज भक्तीभाव , स्पष्ट विचार , व्यहारिक बुध्दीचा वापर करून कर्माचा कोणत्याही पध्दतीने त्याग न करता ईश्वरप्राप्तीचा सांगितलेला मार्ग कोणालाही हवाहवासा वाटणाराच आहे.
धर्मातील किचकट तत्वज्ञानाने गोंधळून गेलेल्या सामान्यांना सहज समजेल व त्याचे आयुष्य उत्तमरीत्या व्यतीत होईल असा लिंगायत धर्म आहे. त्यातील बसव वचन म्हणजे आपल्या मनातील आणि विचारातील जळमटे काढून टाकण्याचे काम करतात.
अश्या महात्मा बसवेश्वरांना मनोमन वंदन....!
====================================================
मुळात आपल्याकडे सर्वच जातीच्या संघटना समाजाला संकुचीत बनवत आहेत. एकप्रकारे संघटना मार्केटींग करणा-या एजन्सीप्रमाणे आपला विचार खपवू लागल्या आहेत. पुरोगामी, सनातनी, मुलनिवासी, विद्रोही सगळेच नुसते शो केस मधील डिस्प्ले खेळणी आहेत. त्यांचा तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात शून्य फायदा होतो. आजच्या युवकांना नवी आव्हाने पेलायची आहेत, जबाबदा-या पार पडायच्या आहेत. हे त्यांच्या खिजगणतीत हि नसते.. माणसाची जात वाईट नसते तर वृत्ती वाईट असते. ती बदलायची असेल तर आपण माणुस आहोत हे आधी लक्षात ठेवावे.  

Sunday, April 26, 2015

देशी विचार एक राम बाण उपाय .....!



परतलेला भूकंप

नेपाळमधील भूकंपानंतर भारतातील भुकंपप्रवण क्षेत्र आणि लातुरमधील किल्लारीसारख्या विनाशकारी भुकंपाच्या आठवणी जाग्या होत आहेत.  आपण भारतीय  हवामान बदलावे तसे आपले प्रश्न प्राध्यान्याने ठेवतो. प्रत्यक्षात त्याची कधीच तड लावत नाहीत.
मुंबईसारख्या ठिकाणी २० मजल्यापेक्षा परवानगी द्यायला तज्ञांचा विरोध आहे. तर अनेक ठिकाणी भुंकपरोधक घरे म्हणजे काय असतात भाऊ... असाच प्रश्न नागरीकांना पडलेला असतो. भुकंप मापन केंद्रे जर धुळखात पडू लागली तर कोणाच्या भरवश्यावर रहावे ? जिल्ह्याच्या आपात्कालीन यंत्रणाही अशाच कागदोपत्री बळकट आहेत. अशा कार्यालयात माजी सैनीकांना आपात्कालीन यंत्रणेत कायमस्वरूपी घ्यायला हवा. त्यांच्यासारखा अनुभव व ज्ञान नागरी सेवेतील कर्मचारी अधिका-यांना नसतो.

राहुल गांधी

कॉग्रेसचे (खरेतर सर्वेसर्वा ) राहूल गांधी दीर्घ सुट्टीनंतर त्यांनी केलेले आंदोलन हा केवळ आर्विभावच वाटत आहे. ज्यावेळीस भु-सपांदन करायला होता तेव्हा नॉट रिचेबल असणारे नेते केवळ चमकोगिरी करण्यासाठी आलेले आहेत ही गोष्ट सामान्यांच्या नजरेतून निसटलेली नाही. राहुल गांधी यांनी मुळात देशात समस्या आहेत, याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांना समस्या माहित असत्या तर त्यांची चमकोगिरी उघड झाली नसती.  

मराठी चित्रपट

मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले पारितोषिक मिळत आहे, ही खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे. पण केवळ कलात्मक चित्रपटाच्या भरवश्यावर लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगणे अव्यावसायीकतेचे   लक्षण आहे.
 कोर्टमधील शाहीर जसा कोर्टात लढतो, तसेच मराठी चित्रपट जनतेच्या दरबारात लढत आहेत. पण लोकाअनुनय करणे जमत नसल्यास जनता तुम्हाला न्याय देत नाही हे कटु सत्य आहे. 

शेतकरी

शेतीच्या समस्या व आत्महत्या यावर सतत  सामाजिक मंथन नेहमीच चालू असते. मुळात हरीत क्रांतीने शेतक-यांच्या माथ्यावर मारलेली कीटकनाशके आणि हायब्रीड बियाणे यामुळे कसदार उत्पादन हद्दपार झाले आहे.
शासनाने सरसकट रासायनीक शेतीवर बंदी घालावी. सामान्य माणसानेही दर्जेदार अन्न खाण्यावर जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बेभरवशामुळे शेती कायम नफ्यात राहणे शक्य नाही. पण मंगळावर जाणारा भारत शेतीत प्रगत तंत्रज्ञान का विकसीत करू शकत नाही? 

साहित्य

मराठी भाषेचे पंजाबमधील घुमान येथे नुकताच साहित्य संमेलन पार पडले. यामध्ये देण्यात आलेल्या साहित्यिकांच्या मानधनावरून वाद निर्माण होतो आहे.  आपली भाषा आपला बाणा आहे. चांगल्या साहित्यिकांना योग्य मानधन देणे आवश्यक आहे.
उगाच सांस्कृतिक दळभद्रेपणा आपला उघडकीस येत आहे. काही चुक झाली असल्यास त्याचा मनःस्ताप समस्त साहित्यिकांना होवू नये. आधीच लेखकांना मिळणारे मानधन खूप काही नसते. त्यापेक्षा आयपीएलमधील चिअरगर्ल्स मिळवीत आहेत.  यामुळे साहित्यिकांचा पर्यायाने मराठी भाषेचा मान राखणे आवश्यक आहे.   

देशी विचार

भालंचंद्र नेमाडे यांचा देशी विचार खरेच अफलातून आहे. जुनाट सर्दी किंवा तत्सम आजारावर जिंदा तालिस्मात ही रामबाण औषधी आहे , अशी जाहिरात पाहण्यात येते.देशी विचार आत्मसात करा आणि सगळ्याच समस्येवर रामबाण उपाय मिळवा असे म्हणायला कोणाची हरकत नसावी. ( असेल तरी आम्ही देशी बाणा असल्यामुळे फरक पडणार नाही.)
देशी विचार म्हणजे मनाचा सच्चेपणा. कुणाला पटो अथवा न पटो दुस-याचे विचार पटत नसल्यास का स्वीकारायचे ?  आपल्या विचारांची नाळ आपल्या राज्य , देश, भाषेशी राहिलीच नाही.यामुळे देशी विचार सगळ्याच क्षेत्रात लागू झाले तर कायम असलेले वैचारीक गोंधळ वगैरे संपून एकदिशा तर मिळेल.  

Monday, April 13, 2015

Ghuman Marathi Sahitya Sanmelan, घूमानच्या निमित्ताने मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट...


घूमानच्या निमित्ताने
 मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट...


१) गरीबाच्या घरचे लग्न असले कि एखादा श्रीमंत माणूसही तिथे होणारा पाहूणचार पाहण्यापेक्षा त्यांची आपुलकी व स्नेहाने भरून पावतो. भले तिथले जेवण खूप चविष्ट नसले तरी साधेपणातील गोडवा जेवणातही त्याला जाणवतो.
 २) श्रीमंताच्या घरचे लग्न असले की कितीही चांगला  मेनू दिला किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले तरी कमीच असल्याची कुरबुर असते. तिथेही आपुलकी व स्नेह असला तरी बहुतेकांचे लक्ष श्रीमंती थाटाकडे असते. 
साहित्य संमेलन म्हणजे लग्नसोहळ्यासारखे प्रतिभाशक्ती व वाचकांच्या आवडीचे असेच मनोमिलन होत असते.  मराठी साहित्यप्रेमी वाचकांना खरेतर काय हवे आहे ? चांगली पुस्तके पहायला मिळावीत... साहित्यप्रवाहात भर घालणारे नवीन तसेच जुन्या  नामवंत प्रकाशन स्टॉलला भेट द्यावी...
साहित्यावर काहीतरी चांगले कानावर पडावे...!  हे कधीच कुणी विचारत नाही. जो तो उठसूठ साहित्य संमेलनावर आणि अनेक हुशारमंडळी टीका करतात. सगळेच व-हाडी होत असल्याने मात्र प्रतिभाशक्ती व वाचकांच्या आवडीला कोणीच वाली राहत नाही....! 
साहित्यसंमेलनात प्रवासव्यवस्था झाली नाही किंवा वेळेवर बुकिंग झाले नाही असे मुलभुत समस्या चांगल्या व्यवस्थापनाने सोडवणे आवश्यक आहे.  याची चर्चा चव्हाट्यावर करून साहित्य संमेलनाचे अवमूल्यन रोखले पाहिजे. अन्यथा साहित्य रसिकांनाही गांभीर्यही राहत नाही व सगळी यंत्रणाच हास्यास्पद ठरण्याची भीती असते. प्रत्येक साहित्य संमेलनाला हे घडत आहे.घूमान साहित्यसंमेलन पंजाब मध्ये संत नामदेवांच्या कर्मभुमी घुमानमध्ये आयोजित केल्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.  भाषा ही माणसाला मिळालेले सर्वात श्रेष्ठ वरदान आहे. यामध्ये मिळालेले ज्ञान व अभिव्यक्ती, प्रतिभेतून खुललेला साहित्याचा खजिना हा अनमोलच असतो. मात्र आपण माणस ही भाषा संकुचित करून टाकतो.  मराठीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी  पुस्तके कसलेल्या राजदुताची भुमिका बजावत आहेत. त्यामुळे चांगल्या लेखकांना व प्रकाशनांना प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण व्हावे.यासाठी साहित्य संमेलन आवश्यकच आहेत. साहित्य संमेलनातून मात्र वाचकांच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. शेतात भाजीपाल्यांचे मळे पिकवत  साहित्य लेखन-वाचन करणारा वर्ग आहे. तसाच आयटीतील वाचकवर्ग आहे. पण याची दखल कोण घेणार ?   बुध्दीवादी म्हणवणारे अनेक लोक उगीच आपली मक्तेदारी दाखवितात.  त्यांनीही आपण केवळ साहित्याची पालखी वाहणारे भोई ( विनम्र सेवेकरी) आहोत अशी  भावना व्यक्त करायला हवी. 
अनेक वाचनालय अजूनही साठ-सत्तरच्या दशकात आहेत. हायटेकच्या जमान्यात ती बदलणे आवश्यक आहे . मराठी पुस्तकांची अनेक वाचनालये बहुतेक कागदोपत्रीच असून अनुदान लाटत आहेत.
वि.स.खांडेकर यांची ययाती चीनी भाषेतही भाषांतरीत केली तर त्यालाही चीनी जाणकार साहित्यिकातून स्वागतच केले जाईल. किमान भारतीय मातीत असणा-या भाषांना एकत्रित करणारे असे सशक्त व्यासपीठ का नाही ? ही खंत  एक भारतीय म्हणुन वाटते .  मराठी वाचवा ही मोहिम आवश्यक आहे. पण त्यातून केवळ वैफल्य दाखविण्यापेक्षा मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी पाऊले टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी साहित्य म्हणजे ललित, कथापुरते मर्यादीत राहू नये.अनेक  विषयावरचे ज्ञान उपलब्ध करून देणारे भांडार झाले तर मराठीचा कायापालट होईल.घूमानच्या निमित्ताने मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट अधिक पसरत जावा हीच सदिच्छा ! 

Monday, March 30, 2015

INDIA SUPER POWER---- भारत होईल महाशक्ती!


भारत महाशक्ती होण्यासाठी आरोग्य, शिक्षण,संरक्षण, शेती, उद्योग,लघुउद्योग, संशोधन, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात एक व्हिजन दूरगामी धोरण ठेवून प्रयत्न आखणे गरजेचे आहे.
या क्षेत्रामध्ये सर्वो्च्च असे मनुष्यबळ विकसीत करणे व त्यांचा वापर करून देशाच्या विकासाचा रथ जोरात चालविणे शक्य होणार आहे. सर्वात आश्चर्याची आणि हास्यास्पद
एक गोष्ट आपल्या देशात पहायला मिळते. भारत महाशक्ती कसा होणार नाही हे सांगण्यासाठी अनेक विविध क्षेत्रातील विद्वान त्यांची बुध्दीमत्तापणाला लावतात. पण जे तज्ञ भारत महाशक्ती होण्यासाठी नेमके काय करता येईल हे सांगू शकत नाहीत. त्यांचे ज्ञान काय कामाचे ? त्यामुळे ज्ञानाचे उपयोजन ( अप्लाईड नॉलेज) करता येणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही खूप हुशार असतात. पण त्यांना पैलू पाडण्याचेच काम होत नाही. आपल्याकडे केवळ घोकमपट्टीचे शिक्षण शिकविले जाते. सध्याचा जमाना हा नावीन्यपुर्ण आणि संशोधनवृत्ती असलेल्या तरूणाईचा आहे. रोज बदलणारे तंत्रज्ञान, नवीन लागणारे शोध यांचा मारा एवढा आहे की त्यासाठी आपण अपडेट तर राहिलेच पाहिजे. शिवाय हे सर्व आपण का करू शकत नाही याचा विचार करायला हवा. किती दिवस मॅकोलेचे कारकुनी शिक्षण,  पोटभरणारे रोबोटिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या माथी मारणार आहोत. रामानुजनच्या वाटेवर जाणारे गणीतज्ञ विद्यार्थी का तयार होत नाहीत ?
विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक वृत्ती वाढवायची सोडून शिक्षक, पालकवर्गही पास व्हायचे असेल तर जास्त विचारू नकोस. परिक्षेत मार्क घ्यायचे आहेत ना ? मग जास्त विचारू नकोस असा सल्ला देतात. विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, चाकोरीबाह्य विचारसरणीचे शिक्षण दिले जात नाही. याला काय कारण आहे ? एखादा नवा जिल्हा झाला हे माहित असूनही परिक्षेत मात्र पुस्तकातील जिल्ह्यांची संख्या विद्यार्थ्यांना लिहणे अनिवार्य असते. ही आपली शिक्षणपध्दती !टीका करण्यापलीकडे जावून सांगायचे झाले तर विद्यार्थ्यांचे ज्ञान , आवड लक्षात घेवून तसे त्याचे व्यक्तीमत्व खुलवायला हवे.  बोन्साय झाड नको तर वटवृक्ष व्हावा. कारण खुंटलेला विद्यार्थी आयुष्यभर नकारात्मकतेचे ओझे वाहत राहतो. समाजच त्याच्यासाठी गुन्हेगार बनतो.
आपल्याला चीन, हिंदुस्थान व अमेरिका या तीन देशाचे मॉडेल वापरावे लागणार आहे. अमेरिकेचे सूत्र आहे. सर्वोत्तम ज्ञान , संशोधन याला चालना देणे. त्यामुळेच भारतातील अत्यंत हूशार संशोधक, विद्यार्थी तसेच यांचे ज्ञान भारताला कसे उपयोगी पडू शकेल यासाठी थिक टॅंकची उभारणी करावी लागणार आहे.
चीन हे नेहमी प्रतिस्पर्धी देशाच्या तुलनेत नेहमी तीन ते चार पटीत पुढे जा व विकास किती झाला आहे याचे प्रदर्शन करण्याऐवजी नेहमीच त्याला बेसावध ठेवा.
आंतराराष्ट्रीय व्यापार अत्यंत आक्रमतेने करून देशाची आर्थिकव्यवस्था डळमळीत करणे व संबधीत देशाला विस्तारवादी धोरण व व्यापार अशा दुहेरीचक्रात गुंतवून ठेवणे हा आहे.
जग खरेच युध्दाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते. भारतीय जगात जेथे जातात. तिथील देशाशी कधीच बेईमानी करत नाहीत. दुस-यांचा आदर व सन्मान करतात. हिंदुस्थानी सर्व साहित्य, संगीत, नृत्य, तसेच विविध खाद्यसंस्कृती , सण म्हणजे मानवी जीवनातील अत्यंत उच्चकोटीचा आविष्कार आहे. भले आपल्याला त्याची किंमत नसेल, पण जगात सर्वत्र त्याचे चाहते आहेत.
जागतीकीकरणाच्या रेट्यात अस्सल अशा गोष्टीचे महत्व वाढत आहे.
योग, विपशना अशा सर्व गोष्टींचे आपण ब्रॅडींग केलेच पाहिजे. अन्यथा इतर देश कालांतराने त्याचे श्रेय घेतील. उदाहरणार्थ योग हा आता कितीतरी परदेशी नागरीकांचाही व्यवसाय झाला आहे.
त्यातील अनेक गोष्टीचा वापर करून सकारात्मक जगण्याचे कोर्सेस त्यांनी सुरू केले आहेत. मुळात संस्कृती हा पिढ्यान पिढ्या जतन करायचा ठेवा असतो. ही संस्कृती आपण जपली नाही तर येणा-या पिढ्याकडे केवळ पाश्चिमात्य संस्कृतीच असेल. त्यामुळे आपले अस्तित्व टिकण्यासाठी हिंदुस्थानी ठेवा जपायला हवा. चीनने त्यामुळेच ख्रिसमस हा सण साजरा करायला बंदी घातली आहे. भारत हा त्यामुळे उदार आणि महान देश आहे. पण चीनी आकाशकंदिल विकत घेवून दिवाळी साजरा करणे हा आपल्या समाजाचा पराभव आहे.
भारतात सगळ्यात जास्त खुर्ची व पदाला किंमत दिली जाते. याउलट जपानसारख्या देशात त्याच्या कामाला किंमत दिली जाते. साफसफाई करणारा कामगार हा महिना तीस हजार रूपये कमवित असला तरी आपण त्याकडे कमीपणाने का पाहतो ? श्रमप्रतिष्ठा जपली नसल्यामुळे समाजातील निम्नस्तर कायम खचलेला असतो. तर उच्चस्तर समाजातील नम्रता व विसंवाद हरवल्यामुळे समाजाच्या विकासाची गती ही नेहमीच एकांगी बनते.त्यामुळेच जमीनीच्या थरामध्ये जशा पोकळ्या निर्माण व्हाव्या तसा समाजातील थर ढासळलेले आहेत.  
लवकरच पुढील भाग प्रकाशित करू.................................

निर्भया व्हिडिओने काय दाखविले ?BBC Nribhaya article in Marathi,


बीबीसी कोण आहे?
बीबीसी ही ब्रिटनच्या सरकारच्या मालकीचा मिडीया आहे.ही जगभरातील देशामध्ये वार्ताहर नेमून वार्तांकन करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे अर्थातच ब्रिटनचा मिडीया भारताच्या हिताच्या किंवा भारताला बळकट करेल अशी पत्रकारीता करेल ही अपेक्षा करणेच बालीशपणा आहे. बीबीसी आता पुर्वीसारखी प्रामाणिक राहिली नाही ही गोष्ट खरी आहे.पण अलीकडच्या काळात बीबीसीमध्ये पत्रकारितापेक्षा
देशाची हेरगिरी करणे व देशामध्ये अस्वस्थता निर्माण होईल अशा पध्दतीने जाणूनबूजुन काम केले जात आहे.
जागतीक मिडीयाची व्युहनीती काय आहे?
भारताची परकीय गंगाजळी अलीकडच्या काळात वाढत चालली आहे. स्थिर सरकार व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसलेल्या गुजराती व्यापा-यासारखे भारताचा
उद्योग मेक इन इंडिया सारखे महत्वांकाक्षी करत आहे. त्यामुळे जागतीक पातळीवरील पाश्चामात्य मिडीया भारताला नेहमी अपमानीत करता येईल अशाच खुराकाच्या शोधात असतो. भारतावर बलात्का-यांचा
देश (रेपीस्ट कंट्री) असा शिक्का बसला तर भारताकडे वळणारी परकीय गुंतवणुक कमी होईल असा त्यांना विश्वास आहे. तसेच भारताची बाजारपेठ वाढणारे सामर्थ्य याला अटकाव करण्यासाठी मीडीयाचा सतत वापर केला जातोय.चीनच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यामुळे चीनने त्यांच्या देशात परकीय मिडियाच्या वार्ताहरावर अत्यंत कडक नियम घातले आहेत. चीनमध्ये गुगलला सुध्दा बंदी आहे.त्यातून  युट्युब , फेसबुकसारखासोशल मिडीया हा चीनच्या बाबतीत खोडसाळपणा करू शकत नाही.

निर्भया व्हिडिओने काय दाखविले ?
दिल्लीतील बलात्कार करणा-या विकृत गुन्हेगाराची मुलाखत घेतली.क्रुरपणे गुन्ह्याची शिक्षा भोगणारा तो गुन्हेगार समाजाला -आपल्याला ठासून सांगतोय की तीने विरोध केला नसता तर तीला मारले
नसते. त्याची बायको ही आपला पती निष्पाप असल्याचा दावा करत आहे.पत्रकारिताचा उद्देश्य
जनसामान्यापर्यंत माहिती पोहोचविणे , प्रबोधन करणे व मत बनविणे, जागरूक
करणे हा आहे. बीबीसीने व्हिडिओमध्ये केवळ सर्वसामान्यांना शासनाबद्दल राग निर्माण करून जुन्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. विशेष म्हणजे निर्भयाच्या मुलीचे व पालकाचे नाव जाहीर
करून नैतीकतेला हरताळ फासला आहे. दिल्ली हायकोर्ट व केंद्र सरकारने यावर का बंदी घातली याचा कसलाही विचार न करता बीबीसीने ब्रिटनमध्ये प्रसिध्द करून भारतीयांचा अपमान केला आहे.
व्हिडिओमध्ये असे चित्र रंगविले आहे की भारत देश हा बलात्का-यांचा आहे व येथील सर्व पुरूष बलात्कारीच आहेत. भारतात ब्रिटनसारखा कारभार विनाघटना चालत नाही. द टेलीग्राफ ब्रिटनमधील
विश्वासू दैनीकाच्या आकडेवारीनुसार सन २०१३ साली २२ हजार बलात्कार केसेस दाखल झाल्या आहेत.
भारतात याच वर्षी २४ हजार केसेस दाखल झाल्या आहेत. लोकसंख्येची तुलना केली असता भारतापेक्षा ब्रिटनमध्ये बलात्कारांची संख्या अधिक आहे.
निर्भया केसपासून आपण काय शिकलो?
निर्भया बलाकाराच्या घटनेपासून मिडिया, राजकीय व्यक्ती, प्रशासन, पोलिस, न्याययंत्रणा, सर्वसामान्य माणुस एकदंरीत समाज काय शिकला आहे? बलात्काराच्या घटना आजही होत आहेत. पण गुन्हेगारांना शिक्षेचे भय नाही. कायद्याची पळवाट काढत जाणा-यांना अटकाव करणारी पोलादी व गतीमान न्याययंत्रणा नाही.देशातील समाज, नागरीक अस्वस्थ झाले तर त्यांना किमान हाताळायचे तरी कसे याचे राजकीय व्यक्ती, प्रशासन यांना अजूनही भान आले नाही. नुकताच पिंपरी चिंचवड शहरात पोलिसयंत्रणेने बलात्काराची केस
गांभीर्याने घेतली नसल्यामुळे बलात्कार झालेल्या मुलीने आत्महत्या केली आहे.मिडीयाला अजूनही लोकांच्या प्रक्षोभाचे रूपांतर सकारात्मक शक्तीत करता येत नाही. उलट लोकांच्या प्रक्षोभाला
पाहून ते गांगारून जात बघ्याची भूमिका घेत आहेत. ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे.
नेमका उपाय का आहे?
 परस्त्रीयाकडे कसे पहावे ? स्त्रीयांना सन्मानाची वागणुक देणे या गोष्टी प्रत्येकाला माहित करून देण्याची वेळ आली आहे. स्त्रीम्हणजे मातृत्वाची दैवी देणगी ! त्यामुळे  बलात्कार करणारे
आपल्या जन्मस्थानाचाच धिक्कार करत आहेत. अनेक चित्रपट, जाहिरातीतुन स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य व एखादी वस्तू आहे असे सादरीकरण केले जाते यावरही बंधन हवे आहे. सेन्सॉर तर केवळ नावालाच आहे.
बलात्कार घटनेसाठी न्यायतातडीने देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट व गुन्हेगार व्यक्तीचे पुरूषत्व नष्ट करणे अशा कठोर शिक्षेचा उपाय करणे.देशभरात अश्लील सीडीज, वेबसाईटज, व्हीडिओजवर बंदी घालणे.
नियम मोडणा-या व्यक्तीला कठोर शिक्षा व प्रचंड आर्थिक दंड असायला हवा.याउलट मातृसत्ताक पध्दतीचा स्त्रीत्वाचा आदर निर्माण करणारे संस्कार करणारी शिक्षणपध्दती हवी आहे.
युट्युब किंवा ब्लॉगर यावर शासनाने जागरूक नागरिकांचे स्वंयसेवक गट
निर्माण करायला हवेत. जे देशाबद्दल, समाजात वाईट गोष्टीचे उदात्तीकरण करेल त्याला त्वरीत उत्तर देईल. जागतीक पातळीवर भारताची बाजू मांडणारा व इतर देशातील सरकारची पोलखोल करणारा मिडिया असणे
आवश्यक आहे.

Friday, November 29, 2013

सायकलीवरचे जोडपे...

 वळणे घेत जाणारी पुण्यातील बाजीराव रोडवर एक जुनाट सायकल जात आहे.ही सायकल चालविणारा एक माणुस आणि मागे  कॅरेजवर  त्याची बायको बसली आहे.रस्त्यावरील गर्दीतुन वाहनातून मार्ग काढत असताना दोघे मस्त बोलत चालले आहेत.पुढे येणारा सिग्नलच्या भीतीने   दुचाकीचालक पुण्याच्या भाऊगर्दीतुन रस्ता काढत असताना एवढे चिंतातूर दिसत आहेत की अस्स वाटावे नुकताच पाकिस्तानने अणवस्त्राची दिशा पुण्याकडे वळविली आहे.काही चारचाकी थाटात तर मध्येच दुचाकी चालविणा-या बांधवांच्या   वाकुल्या कम कट मारलेले सोसत जात आहे.
जुनाट सायकल आणि त्यावरील जोडपे आरामात जात आहे. 
रस्ता दुरचा आहे...पण आयुष्यात सगळे सुखी पायी लोळण घेतली तरी आपले मन हे कायम नसलेल्या गोष्टीसाठी दु:खी होते. ज्या गोष्टी आपल्या जवळ आहेत त्यामुळे आनंद घेण्याचे मात्र विसरत जातो.
शेवटी   आपण समाधान मानले तर आयुष्यात सुखी होण्यासारखे आपल्याकडे बरेच असते.मला तर पायी चालताना दिसणारे ,भासणारे पुणे सर्वात सुंदर भासते... 
  सर्वात समाधानी मनाचे चेहरे  हे बहुतेक हावरट नसणारे माणसाचेच असतात 

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....