Saturday, August 29, 2015

हरितक्रांती म्हणजे शेतक-यांची फसवणुकच !

शेतक-यांना उत्पादन वाढविण्यासाठी  रासायनिक खते व किटकनाशके, सुधारीत बियाणे वापरायला शासन व इत्यादींनी प्रोत्साहीत केले. पण याचा काय फायदा झाला ?
भरमसाठ उत्पन्न वाढले. पण भाव खर्चा तुलनेत कधीच मिळाले नाहीत. उलट  गुणवत्ता घसरली आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आता कळू लागले आहेत. शेवटी कोणाचा फायदा झाला ?
बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांचे धार्जिणे स्वतःची पाठ थोपटून घेणारे सरकार मात्र पोकळ विकास दाखवायला मोकळे ! जमीनीचा पोत घसरल्यामुळे नापीक जमीन झाल्यावर दक्षिण आफ्रिकेत शेतक-यांनी शेती करायची का ? त्यालाही शासन अनुदान देईल ? हरितक्रांती ही शेतक-यांची शुध्द फसवणुक आहे.
सरकारने करोडो रूपये अनुदान देण्यापेक्षा सेंद्रिय शेती व त्याला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. मधल्या दलांलाची गरज लागू नये यासाठी थेट ग्राहकापर्यंत माल पोहोचवायला हवा. हॉस्पीटल्सची वाढती संख्या म्हणजे आपल्या देशाचा खुप विकास झाला असा नव्हे. सगळी आरोग्यव्यवस्थाच केमीकलयुक्त अन्नामुळे सलाईनवर आहे.   

Sunday, August 16, 2015

मॅनेजमेंट शास्त्र - मानवी जीवनाला मिळालेले वरदान

प्रयत्नाबाबत विविध विद्याशाखा आपल्याला खालीलप्रमाणे शिकवितात.
अध्यात्म- प्रयत्न करणे हा धर्म आहे.
कला- प्रयत्न करणे कला आहे.
शास्त्र-प्रयत्न हे एक शास्त्र आहे.
कायदा- प्रयत्न करणे हा एक कायदा आहे.
मॅनेजमेंट- प्रयत्न हे मिळवायचे असेल तर जिथे जिथे शक्य आहे तिथे अध्यात्म ,कला, शास्त्र, कायदा उपयोगात आणा. जर ते उपयोगात न आणता मिळ्त असेल तरीही यश मिळवा. शेवटी तेच महत्वाचे आहे यामुळे मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे शास्त्र, विषय आहे.मराठी माणसाला लहानपणापासून डोक्यात बिंबवले जाते. खुप कष्ट करा आणि यश मिळवा. पण कष्ट खूप म्हणजे यश खूप... हे गणीत खरेच योग्य आहे का? केवळ ढोरमेहनत करून यश कधी व किती मिळणार आहे. कष्ट नुसतेच करा आणि फळाची अपेक्षा करू नका एवढेच आपल्या समजाविले जाते. जर फळ मिळत नसेल तर ते काम काय कामाचे ?पण मॅनेजमेंटमध्ये एवढेच शिकायला मिळते की ध्येय निश्चित करून योग्य व्यवस्थापनाने कष्ट करा. रिझल्ट ओरिएन्टेड वर्क करा असे शिकविले असते तर आयुष्याला चांगली दिशा मिळू शकते. पण आपल्यावर धर्मपगडा, भाबडेपणाने शिक्षण शिकविले जाते.प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर आपण दैवाला दोष देतो. पण ते खरेच योग्य आहे का ? सागरात असणा-या गलबताला किना-यावर नेमके कोठे जायचे निश्चित नसेल तर कोणतेही उपयोगी असणारे वारेही कसलेच फायद्याचे नसते. त्यामुळे निश्चित असणारा किनारा कधीही उपयुक्त असतो.  


Saturday, August 15, 2015

त्रिवार वंदन भारतमाते तुला !

त्रिवार वंदन भारतमाते तुला !

भारताचा आज ६९ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. लहानपणी आपल्याला १५ ऑगस्ट म्हणजे कडक इस्त्री केलेला युनिफॉर्म घालून कधी झेंडावंदन करतो असे वाटायचे. देश म्हणुन सगळेजण एकटवतात ही गोष्ट  रोमांचित करणारी वाटते. सगळ्यात जास्त महत्वाचे नव्या पिढीला उद्याच्या भविष्यासाठी असलेल्या जबाबदारीची नकळत जाणीव होते. आयुष्यभरासाठी मनावर ती कोरली जाण्याचा हा दिवस असतो.  
विविधतेने , उच्च मानवी मुल्ये यांचा संस्कार असणारी देशाची परंपरा , विविध भाषा, कला यांनी देश अत्यंत नटलेला आहे. सगळ्यात जास्त म्हणजे त्याग करून देशाच्या विकासात अमुल्य हातभार लावणारा सामान्य माणुस ते विविध थोर व्यक्ती तेजस्वी हि-याप्रमाणे भारतमातेच्या दिव्य अलकांरात शोभतात.
आजच्या स्वांतंत्र्यदिनासाठी लाखो लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे. अनेक क्रांतीकारांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत भाग घेतला. त्यांच्या त्याग व बलिदानामुळेच आपण स्वांत्र्य उपभोगु शकतो. याची किंमत अनमोल आहे. स्वांत्र्यदिनामुळेच आपण अभिव्यक्ती, संघटना स्थापन करणे, फिरणे, भाषण करणे अशा विविध स्वातंत्र्य उपभोगतोय.  निराशेचे मळभ झटकून टाका.
भारतात असणारी सुप्त शक्ती सगळया जगाला खुणावतेय. त्यासाठी आपण एका सच्चे भारतीय म्हणुन   सर्व जबाबदा-या व कर्तव्य पालन करु.
भारत २०२० ला भारत महाशक्ती २०२० होण्यासाठी तयार होवू...... भारतमातेला त्रिवार वंदन...!
========================================================================
भारत २०२० साली  महाशक्ती होण्याचे स्वप्न माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पाहिले आहे. तरी आपण यात सहभागी होवू. मराठी पत्रकारीता तुम्हाला सहभागी करत आहे. ब्लॉगवर प्रसिध्दीसाठी आपल्या कल्पना, विचार लेख ईमेलवर पाठवा. shrikantpawar15@gmail.com  


Monday, May 4, 2015

Buddha in Marathi

बुध्दं शरणं गच्छामि... .कारण हे सर्व प्राप्त करावे असेच आहे.....

पत्रकारिता करत असताना कधी कधी अधिकारीवर्गाशी वेगवेगळ्या विषयावर चांगलीच चर्चा होते. प्रशासन व माध्यम ही दोन्ही टोके जरी विरूध्द वाटत असली तरी ती माणसेच आहेत.
एका अधिका-याने बोलत बोलत मला सत्यनारायण गोएंका यांचे विपश्यनेवरील पुस्तक वाचले का असे विचारले ? मुळात वाचायची खूप आवड पण धार्मिक वाचन जरा जपूनच करत असतो.
कारण हिंदू धर्मातील उपनिषद वार्ता, कुंडलिनी शक्ती , पतंजली योग सुत्रे अशी असंख्य पुस्तके वाचून मी ठरवले की बास्स ! आता वाचन जास्त केल्याने विचारांची गुंतागुंत होत आहे.तरीही ते विपश्यनेवरील पुस्तक मी घेतले आणि धन्य पावलो. बुध्द धर्मामुळे माणसाला कसा विचार करावा हे शास्त्रोक्त पध्दतीने समजले.
आज बुध्द पौर्णिमा आहे. बुध्दाविषयी त्यांच्या विचाराविषयी मला खूप प्रेम आहे. माणुस मनाचा गुलाम असतो. मनाला जाणले तर माणुस चांगल्याप्रकारे आयुष्य जगू शकतो. त्यासाठी बुध्दधर्म प्रज्ञा, शील, करूणा याची शिकवण देते. जनसंज्ञापन शिकणा-या प्रत्येकाने विपश्यनेचे तत्वज्ञान माहित करून घ्यावे असे माझे मत आहे. वर्तमानकाळात जगणे सर्वात महत्वाचे असते. माणसाचे मन नेहमीच भूत-भविष्यात गढलेले असते. त्यामुळेच माणुस दुःखी होतो. आपण प्राप्त माहितीवर संवेदना काय देतो यावरच त्या माध्यमाचा परिणाम अवलंबून असतो. 
आपण या माध्यमांच्या प्रभावाखाली राहतो आणि गुलाम होतो. आपले विचार , भावना कधीच कोनाड्यात जावून बसलेल्या असतात.
 विपश्यना म्हणजे एक प्रकारे अन्टीव्हारसच आहे. डोक्यात येणारे असंख्य विचार , त्याकडे पहाणे, त्याला लेबल देणे, वर्गीकरण करणे, नको असलेले विचार काढून टाकणे, चांगल्या येणा-या विचारासाठी जागा ठेवणे यामुळे माणुस ताजा टवटवीत राहतो. बुध्द सर्वात आवडायचे कारण त्यांनी बुध्दीला आणि मनाच्या निर्मळतेला महत्व दिले आहे. बुध्दीला पटेल तेच स्विकारा. स्वतः अनुभवा. 
सगळ्यात जास्त इंटरेस्टींग म्हणजे नोटींग ! म्हणजे असे करायचे की आपल्या मनात येणा-या प्रत्येक विचाराची नोंद करायची. मी त्यासाठी युक्ती केली आहे की एक रफ पेपरवर डोक्यात विचार आला की उभी रेष मारतो. त्यामुळे येणारा विचार आपण नियंत्रीत करण्याचे कौशल्य मिळवू शकतो. ही खूप अफलातून कला आहे.
कुठेही कर्मकांड नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता नसते त्या विचारांचा फाफटपसारा याविषयी मौन बाळगले आहे. ही सुध्दा मला गोष्ट आवडते. उदा. पुनर्जन्म, आत्मा अशा गोष्टी कळाल्या किंवा नाही कळाल्या तरी तुम्हाला तुमचे कर्म करावेच लागते. उगाच गोंधळ उडविणा-या आणि ध्येयापासून विलग करणा-या कल्पना सोडून देणे इष्टच ! बुध्दांना विष्णुचा अवतार मानणे हे थोतांड आहे.  
बौध्द धर्मात जीवन दुःखमय आहे, असे सांगितले आहे. याबाबत मात्र मी पुर्णपणे सहमत नाही. जरी असले तरी दुःखात का जगायचे ? संगीत, कला, क्रीडा अशा विविध गुणांचा विकास करीत जगावे असे वाटते.बहुतेक बुध्दांना प्रथम टप्प्यात माणसाने मनावर विजय मिळवण्यात निपुण व्हावे असे अपेक्षित असावे आपण एकाच मार्गावरील प्रवासी आहोत. आपले जीवन मंगलमय होवो. 

कधी कधी बुध्दांचे विचार वाचून मी   डायरीत काही लिहतो.  त्यापैकी एक विचार!
राग व गर्व या दोन गोष्टी जगात सर्वात जास्त महागड्या आहेत.  जेव्हा आपण राग व गर्व बाळगतो आपल्याजवळील चांगले गुणही गमावून बसतो. अनेक कष्टानंतर प्राप्त झालेले यश व चांगले गुण हे अमुल्य असतात. त्याचा खर्च राग व गर्व एवढ्या सहजतेने करतात की महागड्या हि-याची किंमतही क्षुल्लक ठरावी. त्यामुळे माणसाने राग व गर्व बाळगून उधळपट्टी करू नये. राग व गर्व येत असल्यास थोडी कंजुषी दाखवावी.

Wednesday, April 29, 2015

लिंगायतधर्म एक परिपुर्ण विचार -





मित्रांनो, मी इयत्ता चौथीपासून ईश्वर आणि मानवाने कोणत्या धर्माचे आचरण करावे या विषयी वाचन करत आहे. या विषयी वाचनासाठी एवढा झपाटून गेलो होतो की पार वैदिक सिध्दांत, उपनिषद वार्ता,गीता,तसेच सर्वच कथासार आणि योगवसिष्ठ, पंतजली योगसुत्र असे ग्रंथ नववीपर्यंत वाचून काढले. कुंडलिनी शक्ती साठी तर मी जंगजंग पछाडले. 
अर्थात बुवा, महाराज नव्हे तर स्वतः अनुभवातून ज्ञान घ्या या विचाराप्रमाणेच अनुभव घेतला.मला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण अनेक प्रश्न निर्माण होवून गुंतागुंत निर्माण झाली.मनाला पडलेले प्रश्न हे शिक्षण सोडवू शकत नाही याचा रागच निर्माण झाला. सुरूवातीला हुशार असणारा मी हळूहळू अभ्यासात मागे पडू लागलो.
हिंदू शीख,मुस्लीम,ख्रिश्चन यांच्या धर्मग्रंथाचे मराठीतील भाषांतरे वाचूनही समाधान नव्हते. मुळात मी आस्तिक आहे, पण आंधळेपणाने भक्ती मला मान्य नाही. त्यामुळे प्रत्येक विचाराशी मी पुर्णपणे सहमत नव्हतो. कुणीतरी येवून परिपुर्ण विचार सांगावा ही इच्छा होती.....
महात्मा बसवेश्वरांच्या जंयतीनिमीत्त मी पुस्तके वाचायला घेतली आणि सुखद धक्का बसला. त्यांचे विचार व परिपुर्ण आहेत याची खात्री पटली.
महात्मा बसवेश्वरांनी भक्तीच्या कोंदणात कर्माचा हिरा बसवून त्यांनी सर्वसामान्य माणसाला आयुष्य उलगडून दाखविले आहे.देव हा सगुण की निर्गुण व जडत्व, चैतन्य म्हणजे काय अशा कल्पनामध्ये भक्तीलाच बांधून टाकण्यात आले. सहज भक्तीभाव , स्पष्ट विचार , व्यहारिक बुध्दीचा वापर करून कर्माचा कोणत्याही पध्दतीने त्याग न करता ईश्वरप्राप्तीचा सांगितलेला मार्ग कोणालाही हवाहवासा वाटणाराच आहे.
धर्मातील किचकट तत्वज्ञानाने गोंधळून गेलेल्या सामान्यांना सहज समजेल व त्याचे आयुष्य उत्तमरीत्या व्यतीत होईल असा लिंगायत धर्म आहे. त्यातील बसव वचन म्हणजे आपल्या मनातील आणि विचारातील जळमटे काढून टाकण्याचे काम करतात.
अश्या महात्मा बसवेश्वरांना मनोमन वंदन....!
====================================================
मुळात आपल्याकडे सर्वच जातीच्या संघटना समाजाला संकुचीत बनवत आहेत. एकप्रकारे संघटना मार्केटींग करणा-या एजन्सीप्रमाणे आपला विचार खपवू लागल्या आहेत. पुरोगामी, सनातनी, मुलनिवासी, विद्रोही सगळेच नुसते शो केस मधील डिस्प्ले खेळणी आहेत. त्यांचा तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात शून्य फायदा होतो. आजच्या युवकांना नवी आव्हाने पेलायची आहेत, जबाबदा-या पार पडायच्या आहेत. हे त्यांच्या खिजगणतीत हि नसते.. माणसाची जात वाईट नसते तर वृत्ती वाईट असते. ती बदलायची असेल तर आपण माणुस आहोत हे आधी लक्षात ठेवावे.  

Sunday, April 26, 2015

देशी विचार एक राम बाण उपाय .....!



परतलेला भूकंप

नेपाळमधील भूकंपानंतर भारतातील भुकंपप्रवण क्षेत्र आणि लातुरमधील किल्लारीसारख्या विनाशकारी भुकंपाच्या आठवणी जाग्या होत आहेत.  आपण भारतीय  हवामान बदलावे तसे आपले प्रश्न प्राध्यान्याने ठेवतो. प्रत्यक्षात त्याची कधीच तड लावत नाहीत.
मुंबईसारख्या ठिकाणी २० मजल्यापेक्षा परवानगी द्यायला तज्ञांचा विरोध आहे. तर अनेक ठिकाणी भुंकपरोधक घरे म्हणजे काय असतात भाऊ... असाच प्रश्न नागरीकांना पडलेला असतो. भुकंप मापन केंद्रे जर धुळखात पडू लागली तर कोणाच्या भरवश्यावर रहावे ? जिल्ह्याच्या आपात्कालीन यंत्रणाही अशाच कागदोपत्री बळकट आहेत. अशा कार्यालयात माजी सैनीकांना आपात्कालीन यंत्रणेत कायमस्वरूपी घ्यायला हवा. त्यांच्यासारखा अनुभव व ज्ञान नागरी सेवेतील कर्मचारी अधिका-यांना नसतो.

राहुल गांधी

कॉग्रेसचे (खरेतर सर्वेसर्वा ) राहूल गांधी दीर्घ सुट्टीनंतर त्यांनी केलेले आंदोलन हा केवळ आर्विभावच वाटत आहे. ज्यावेळीस भु-सपांदन करायला होता तेव्हा नॉट रिचेबल असणारे नेते केवळ चमकोगिरी करण्यासाठी आलेले आहेत ही गोष्ट सामान्यांच्या नजरेतून निसटलेली नाही. राहुल गांधी यांनी मुळात देशात समस्या आहेत, याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांना समस्या माहित असत्या तर त्यांची चमकोगिरी उघड झाली नसती.  

मराठी चित्रपट

मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले पारितोषिक मिळत आहे, ही खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे. पण केवळ कलात्मक चित्रपटाच्या भरवश्यावर लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगणे अव्यावसायीकतेचे   लक्षण आहे.
 कोर्टमधील शाहीर जसा कोर्टात लढतो, तसेच मराठी चित्रपट जनतेच्या दरबारात लढत आहेत. पण लोकाअनुनय करणे जमत नसल्यास जनता तुम्हाला न्याय देत नाही हे कटु सत्य आहे. 

शेतकरी

शेतीच्या समस्या व आत्महत्या यावर सतत  सामाजिक मंथन नेहमीच चालू असते. मुळात हरीत क्रांतीने शेतक-यांच्या माथ्यावर मारलेली कीटकनाशके आणि हायब्रीड बियाणे यामुळे कसदार उत्पादन हद्दपार झाले आहे.
शासनाने सरसकट रासायनीक शेतीवर बंदी घालावी. सामान्य माणसानेही दर्जेदार अन्न खाण्यावर जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बेभरवशामुळे शेती कायम नफ्यात राहणे शक्य नाही. पण मंगळावर जाणारा भारत शेतीत प्रगत तंत्रज्ञान का विकसीत करू शकत नाही? 

साहित्य

मराठी भाषेचे पंजाबमधील घुमान येथे नुकताच साहित्य संमेलन पार पडले. यामध्ये देण्यात आलेल्या साहित्यिकांच्या मानधनावरून वाद निर्माण होतो आहे.  आपली भाषा आपला बाणा आहे. चांगल्या साहित्यिकांना योग्य मानधन देणे आवश्यक आहे.
उगाच सांस्कृतिक दळभद्रेपणा आपला उघडकीस येत आहे. काही चुक झाली असल्यास त्याचा मनःस्ताप समस्त साहित्यिकांना होवू नये. आधीच लेखकांना मिळणारे मानधन खूप काही नसते. त्यापेक्षा आयपीएलमधील चिअरगर्ल्स मिळवीत आहेत.  यामुळे साहित्यिकांचा पर्यायाने मराठी भाषेचा मान राखणे आवश्यक आहे.   

देशी विचार

भालंचंद्र नेमाडे यांचा देशी विचार खरेच अफलातून आहे. जुनाट सर्दी किंवा तत्सम आजारावर जिंदा तालिस्मात ही रामबाण औषधी आहे , अशी जाहिरात पाहण्यात येते.देशी विचार आत्मसात करा आणि सगळ्याच समस्येवर रामबाण उपाय मिळवा असे म्हणायला कोणाची हरकत नसावी. ( असेल तरी आम्ही देशी बाणा असल्यामुळे फरक पडणार नाही.)
देशी विचार म्हणजे मनाचा सच्चेपणा. कुणाला पटो अथवा न पटो दुस-याचे विचार पटत नसल्यास का स्वीकारायचे ?  आपल्या विचारांची नाळ आपल्या राज्य , देश, भाषेशी राहिलीच नाही.यामुळे देशी विचार सगळ्याच क्षेत्रात लागू झाले तर कायम असलेले वैचारीक गोंधळ वगैरे संपून एकदिशा तर मिळेल.  

Monday, April 13, 2015

Ghuman Marathi Sahitya Sanmelan, घूमानच्या निमित्ताने मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट...


घूमानच्या निमित्ताने
 मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट...


१) गरीबाच्या घरचे लग्न असले कि एखादा श्रीमंत माणूसही तिथे होणारा पाहूणचार पाहण्यापेक्षा त्यांची आपुलकी व स्नेहाने भरून पावतो. भले तिथले जेवण खूप चविष्ट नसले तरी साधेपणातील गोडवा जेवणातही त्याला जाणवतो.
 २) श्रीमंताच्या घरचे लग्न असले की कितीही चांगला  मेनू दिला किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले तरी कमीच असल्याची कुरबुर असते. तिथेही आपुलकी व स्नेह असला तरी बहुतेकांचे लक्ष श्रीमंती थाटाकडे असते. 
साहित्य संमेलन म्हणजे लग्नसोहळ्यासारखे प्रतिभाशक्ती व वाचकांच्या आवडीचे असेच मनोमिलन होत असते.  मराठी साहित्यप्रेमी वाचकांना खरेतर काय हवे आहे ? चांगली पुस्तके पहायला मिळावीत... साहित्यप्रवाहात भर घालणारे नवीन तसेच जुन्या  नामवंत प्रकाशन स्टॉलला भेट द्यावी...
साहित्यावर काहीतरी चांगले कानावर पडावे...!  हे कधीच कुणी विचारत नाही. जो तो उठसूठ साहित्य संमेलनावर आणि अनेक हुशारमंडळी टीका करतात. सगळेच व-हाडी होत असल्याने मात्र प्रतिभाशक्ती व वाचकांच्या आवडीला कोणीच वाली राहत नाही....! 
साहित्यसंमेलनात प्रवासव्यवस्था झाली नाही किंवा वेळेवर बुकिंग झाले नाही असे मुलभुत समस्या चांगल्या व्यवस्थापनाने सोडवणे आवश्यक आहे.  याची चर्चा चव्हाट्यावर करून साहित्य संमेलनाचे अवमूल्यन रोखले पाहिजे. अन्यथा साहित्य रसिकांनाही गांभीर्यही राहत नाही व सगळी यंत्रणाच हास्यास्पद ठरण्याची भीती असते. प्रत्येक साहित्य संमेलनाला हे घडत आहे.घूमान साहित्यसंमेलन पंजाब मध्ये संत नामदेवांच्या कर्मभुमी घुमानमध्ये आयोजित केल्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.  भाषा ही माणसाला मिळालेले सर्वात श्रेष्ठ वरदान आहे. यामध्ये मिळालेले ज्ञान व अभिव्यक्ती, प्रतिभेतून खुललेला साहित्याचा खजिना हा अनमोलच असतो. मात्र आपण माणस ही भाषा संकुचित करून टाकतो.  मराठीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी  पुस्तके कसलेल्या राजदुताची भुमिका बजावत आहेत. त्यामुळे चांगल्या लेखकांना व प्रकाशनांना प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण व्हावे.यासाठी साहित्य संमेलन आवश्यकच आहेत. साहित्य संमेलनातून मात्र वाचकांच्या अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे. शेतात भाजीपाल्यांचे मळे पिकवत  साहित्य लेखन-वाचन करणारा वर्ग आहे. तसाच आयटीतील वाचकवर्ग आहे. पण याची दखल कोण घेणार ?   बुध्दीवादी म्हणवणारे अनेक लोक उगीच आपली मक्तेदारी दाखवितात.  त्यांनीही आपण केवळ साहित्याची पालखी वाहणारे भोई ( विनम्र सेवेकरी) आहोत अशी  भावना व्यक्त करायला हवी. 
अनेक वाचनालय अजूनही साठ-सत्तरच्या दशकात आहेत. हायटेकच्या जमान्यात ती बदलणे आवश्यक आहे . मराठी पुस्तकांची अनेक वाचनालये बहुतेक कागदोपत्रीच असून अनुदान लाटत आहेत.
वि.स.खांडेकर यांची ययाती चीनी भाषेतही भाषांतरीत केली तर त्यालाही चीनी जाणकार साहित्यिकातून स्वागतच केले जाईल. किमान भारतीय मातीत असणा-या भाषांना एकत्रित करणारे असे सशक्त व्यासपीठ का नाही ? ही खंत  एक भारतीय म्हणुन वाटते .  मराठी वाचवा ही मोहिम आवश्यक आहे. पण त्यातून केवळ वैफल्य दाखविण्यापेक्षा मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी पाऊले टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी साहित्य म्हणजे ललित, कथापुरते मर्यादीत राहू नये.अनेक  विषयावरचे ज्ञान उपलब्ध करून देणारे भांडार झाले तर मराठीचा कायापालट होईल.घूमानच्या निमित्ताने मराठी साहित्यसुगंधाचा घमघमाट अधिक पसरत जावा हीच सदिच्छा ! 

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....